Next
‘देशात २८ ठिकाणी ‘एक्सलन्स सेंटर्स’ उघडणार’
माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे महाराष्ट्र-गोवा संचालक संजय गुप्ता यांची माहिती
प्रेस रिलीज
Monday, April 01, 2019 | 02:43 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘केंद्राच्या सॉफ्टवेअर पार्कतर्फे देशात २८ ठिकाणी ‘एक्सलन्स सेंटर्स’ उघडण्यात येणार आहेत,’ अशी माहिती सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया या केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विभागाचे महाराष्ट्र-गोवा संचालक संजय गुप्ता यांनी दिली.

भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘भारतीयम् २०१९’ हे राष्ट्रीय पातळीवरील वार्षिक टेक फेस्ट आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या टेक फेस्टचे उद्घाटन धनकवडी कॅम्पसमध्ये २७ मार्च २०१९ रोजी झाले. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आनंद भालेराव होते. सी-टेक इंजिनीअर्स प्रा. लि.चे संचालक अविनाश चाबुकस्वार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘भारतीयम् २०१९’मध्ये एकाच ठिकाणी १९ विविध प्रकारचे तंत्रविषयक कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले आहेत. त्यात हॅकेथॉन, प्रकल्प प्रदर्शन, पेपर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, गटचर्चा यांचा समावेश आहे.

गुप्ता म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञानाला वाव मिळून रोजगारवृद्धी व्हावी हे केंद्र सरकारचे धोरण आहे. इंटरनेट ऑन थिंग्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्लाउड, ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्चुअल रिअलिटी, ब्लॉक चेन या अत्याधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी केंद्राच्या सॉफ्टवेअर पार्कतर्फे देशात २८ ठिकाणी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उघडली जाणार आहेत. त्यातून स्टार्टअप्स आणि नव्या उद्योजकांना मदत होईल. यासाठी राज्य सरकार, शैक्षणिक संस्था, उद्योगक्षेत्र यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. भविष्यातील ही आव्हाने लक्षात घेऊन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी तयार व्हावे.’

‘भारतात १६७ अब्ज डॉलर्स व्यवसाय असलेला माहिती-तंत्रज्ञान उद्योग उभा राहिला आहे; मात्र सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स तयार करण्याचा उद्योग सात अब्ज डॉलर्स इतकाच आहे. ते वाढविण्याचे केंद्राचे धोरण आहे. त्यातून  सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स निर्मितीचा उद्योग २०१५पर्यंत सात अब्ज डॉलर्सवरून ८० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. साडेतीन  दशलक्ष रोजगार निर्माण होतील. यामध्ये ही ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सहाय्य्यकारी ठरतील,’ असे गुप्ता यांनी सांगितले.     

डॉ. भालेराव यांनी भविष्यातील आव्हानांना कल्पक उत्तरे शोधणारे विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असून, विद्यार्थ्यांनी प्रचलित ज्ञानालाही आव्हान देऊन नवे शोध लावण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रवीण भामरे, मुकुल जोशी, गिरीश बिडानी, बख्तियार खान, संतोष ओसवाल, रवी वर्मा आदी विविध कंपन्यांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. डॉ. संदीप वांजळे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search