दक्षिणेतील सुपरस्टार एन. टी. रामाराव यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाविषयी सध्या चित्रपट वर्तुळात भरपूर चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. तो चेहरा म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर. चित्रपटात सचिन खेडेकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक क्रिश जे. दिग्दर्शित या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिका आणि त्या साकारणार असलेल्या कलाकारांची नावे जवळपास निश्चित झालेली असताना यांत अभिनेत्री विद्या बालन एन. टी. रामाराव यांच्या पत्नीच्या भूमिकेत असल्याचे समजते. तर एन. टी. आर. यांच्याविरोधात बंड पुकारून मुख्यमंत्रीपद पटकावलेले राजकीय नेते भास्करराव यांची व्यक्तिरेखा सचिन खेडेकर साकारणार आहेत. तसेच ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबत्ती हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची भूमिका साकारणार आहेत.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते एल. व्ही. प्रसाद यांच्या भूमिकेत बंगाली चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय चेहरा जिसू हे दिसणार आहेत. ‘ही एक खूप महत्त्वाची भूमिका आहे. या भूमिकेसाठी मला विचारण्यात आल्यानंतर मी लगेचच माझा होकार दिला. माझ्या या भूमिकेचा सध्या मी अभ्यास करत आहे. त्यासाठी काही संदर्भ, छायाचित्रे मला देण्यात आली आहेत, त्यांचे मी निरीक्षण करत आहे’, असे अभिनेते सचिन खेडेकर यांनी सांगितले.