Next
पाठकजी कुटुंबीयांकडे यंदा ‘अर्थ’गणेश!
BOI
Tuesday, September 03, 2019 | 01:25 PM
15 0 0
Share this article:

सातारा येथील पाठकजी कुटुंबीयांनी गणेशोत्सवात गेली तीन वर्षे अनुक्रमे ज्ञानगणेश, संगीतगणेश आणि क्रीडागणेश अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित सजावट केली होती. यंदा त्यांनी आर्थिक विषयाला वाहिलेली सजावट केली आहे. देवघेव पद्धतीपासून ऑनलाइन व्यवहारापर्यंतचे अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे टप्पे आणि विविध पैलू त्यांनी या सजावटीत दर्शविले आहेत. या ‘अर्थ’गणेशाचा अर्थ उलगडून सांगत आहेत पद्माकर पाठकजी...
.......
ज्ञानगणेश, संगीतगणेश, क्रीडागणेश या सलग तीन वर्षांच्या सजावटीनंतर यंदा आमच्या साताऱ्याच्या घरात ‘अर्थ’गणेश ही संकल्पना घेऊन गणेशापुढे आरास केली आहे. प्रत्येकाला जगण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या ‘अर्था’चा अर्थपूर्ण प्रवास थोडक्यात मांडायचा असे काही महिन्यांपूर्वी ठरले. आर्थिक मंदीच्या बातम्या आता येऊ लागल्या आहेत. मंदीच्या पार्श्वभूमीवर ही आरास केली, असे मात्र अजिबातच नाही, हे आधीच स्पष्ट करावेसे वाटते. अनेक आर्थिक तज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे जर खरेच मंदी असेल, तर ती लवकरात लवकर लवकर दूर व्हावी, हीच गणेशाचरणी प्रार्थना. देवघेव पद्धतीपासून ते ‘ऑनलाइन’ व्यवहारापर्यंतचे महत्त्वाचे टप्पे, विविध देशांची चलने, बँकिंगचा प्रवास आदी गोष्टी अधोरेखित करून ही सजावट करायचे ठरले. साताऱ्यातील ज्येष्ठ संग्राहक शशिकांत पिंपळखरे यांचा अप्रकाशित संग्रह या सजावटीसाठी वापरायचे ठरवले. त्यांनीही आनंदाने त्यांचा संग्रह दिला. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेली विशेष नाणी, चिंतामणराव देशमुखांची स्वाक्षरी असलेली नोट, विविध संस्थानांची नाणी, प्राचीन काळातील नाणी अशा विविध दुर्मीळ गोष्टी या सजावटीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या. याशिवाय परिचितांपैकी अनेकांकडे विविध नाणी, नोटांचा संग्रह होता. आमच्याकडेही काही चलनसंग्रह होता. त्याचा वापर करून ही सजावट आकाराला आली. सोबत अर्थविषयक वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके, विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले यांचे चरित्र यांचीही मांडणी केली. नोटाबंदी, अर्थसंकल्प, बँकांचे विलिनीकरण या मुद्द्यांचा अंतर्भाव केला. एक रुपयाच्या नाण्याच्या पार्श्वभूमीवर गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली. मोठी व्याप्ती असलेल्या या विषयातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर ‘फोकस’ करून ही आरास अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

ही सजावट पूर्ण करण्यासाठी नेहमीप्रमाणेच अनेक हातांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांबद्दल कृतज्ञता. या ‘अर्थ’गणेशाच्या दर्शनासाठी दर वर्षीप्रमाणे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

- पद्माकर पाठकजी, सातारा  
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(पाठकजी कुटुंबीयांनी याआधी साकारलेल्या संगीतगणेशाविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यंदाच्या सजावटीचा सोबतचा व्हिडिओही जरूर पाहा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search