Next
केदार शिंदे
BOI
Tuesday, January 16 | 03:45 AM
15 0 0
Share this story

पहिल्या प्रयोगापासून ‘हाउसफुल’चा बोर्ड घेणाऱ्या आणि ३६५ दिवसांत ५६७ प्रयोगांचा उच्चांक गाठणाऱ्या ‘सही रे सही’ या नाटकाचा तरुण लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे याचा १६ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....
..........
१६ जानेवारी १९७३ रोजी मुंबईत जन्मलेला केदार शिंदे म्हणजे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि स्वतः उत्तम कलाकार म्हणून लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्त्व! मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका आणि मराठी सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपला जबरदस्त ठसा उमटवला आहे. 

सैन्यात जाण्याचं स्वप्न पाहणारा केदार साताऱ्याच्या मिलिटरी स्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. नाशिकच्या मिलिटरी स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्याला त्याच्या चारुशीला मावशीने ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये सामील होण्यासाठी बोलावून घेतलं आणि आपल्या आजोबांच्या, शाहीर कृष्णराव साबळेंच्या या तुफान लोकप्रिय कार्यक्रमातून त्याच्यामधला रंगकर्मी घडत गेला. 

तिथेच त्याची ओळख भरत जाधवशी झाली आणि नंतर पुढे या मित्रांच्या जोडीने रंगभूमीवर इतिहास घडवला. केदारनेच लिहून दिग्दर्शित केलेल्या ‘सही रे सही’ नाटकाने पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल्लचा बोर्ड घेत ३६५ दिवसांत ५६७ प्रयोगांचा उच्चांक नोंदवला आणि केदारला लेखक, दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली. पाठोपाठच त्याने लिहिलेली श्रीमंत दामोदरपंत, तू तू मी मी यांसारखी नाटकं लोकांच्या पसंतीला उतरली. त्याने दिग्दर्शित केलेली लोच्या झाला रे, गेला उडत, गोपाळा रे गोपाळा, ढ्यँ टॅ ढ्यँ, आमच्यासारखे आम्हीच ही नाटकं तुफान मनोरंजन करणारी होती आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

टीव्हीसाठी त्याने दिलीप प्रभावळकरांच्या ‘अनुदिनी’वर आधारित ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही अफलातून मालिका त्यांनाच प्रमुख भूमिकेत घेऊन दिग्दर्शित केली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. हसा चकट फू, घडलंय बिघडलंय, मधु इथे आणि चंद्र तिथे, साहेब, बीबी आणि मी, अशा त्याच्या सर्वच मालिका धमाल विनोदी होत्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरल्या. 

अंकुश चौधरी या आपल्या दुसऱ्या जवळच्या मित्राला घेऊन त्याने रसिका जोशीसह लिहून दिग्दर्शित केलेला ‘यंदा कर्तव्य आहे’ हा सिनेमा लक्षणीय होता.  त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘अगं बाई अरेच्चा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘जत्रा’ हे चित्रपट तुफान लोकप्रिय झाले आणि त्याचा असा एक ब्रँड बनला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link