Next
‘जातिअंताची विश्लेषक मांडणी डॉ. आंबेडकरांनी केली’
डॉ. बालाजी केंद्रे यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, May 02, 2019 | 04:04 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘भारतीय समाजाच्या जडणघडणीत जाती व्यवस्था ही केंद्रीय स्थानी राहिली असून, दुर्दैवाने ती समाजस्वास्थास मारक ठरली. यासाठी जातीच्या निर्मितीपासून तिचा विकास आणि जातिअंत या विषयाची विश्‍लेषक मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली,’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. बालाजी केंद्रे यांनी केले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी भूषविले. 

आपल्या चिकित्सक विश्‍लेषणात डॉ. केंद्रे पुढे म्हणाले, ‘जातीअंतर्गत विवाहाच्या नियमांनी जातीबर्हिगट विवाहावर वर्चस्व मिळविले. प्रत्येक जातीने संकर आणि साधनसूचितेच्या दृष्टीकोनातून स्वत:च्या जातीगटावर बंधने घातली. त्यामुळे प्रत्येक जात एक बंदवर्ग बनली आणि तिच व्यवस्था पुढे ताठर होत गेली. अशा जातीव्यवस्थेला ताठर करण्यामध्ये मनुस्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली. जातीव्यवस्था ताठर करण्याच्या उद्देशानेच सतीप्रथा, केशवपन यासारखी बंधने स्त्रियांवर लादली गेली. त्यामुळेच स्त्रिया या जातीव्यवस्थेच्या प्रवेशद्वार आहेत असा सिद्धांत बाबासाहेबांनी पुढे मांडला.’

लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने आयोजित केलेल्या परंतू न झालेल्या बाबासाहेबांच्या व्याख्यानाचा दाखला देत बाबासाहेबांची जातिअंताची भूमिका किती व्यापक होती यावर डॉ. केंद्रे यांनी प्रकाश टाकला. ‘सहभोजनाच्या प्रस्थापित पर्यायांतून जातिअंत शक्य नसून तो आंतरजाती विवाहानेच शक्य होईल यावर बाबासाहेबांचा विश्‍वास होता.  राज्यघटनेच्या माध्यमातून मूलभूत अधिकार, वेगवेगळी कलमे आणि रायांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वातून जातीव्यवस्थेने शोषण केलेल्या समाजास केंद्रस्थानी ठेऊन बाबासाहेबांनी समताधिष्ठीत समाजनिर्मितीसाठी मोठे योगदान दिले आहे,’ असे डॉ. केंद्रे यांनी सांगितले.
 
प्राचार्य डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीव्यवस्थेची घट्ट चौकट शिथिल होण्यास मदत होईल म्हणून शासन, सामाजिक संस्था या पातळीवर प्रयत्नशील आहेत. समाजातील सर्वच सदस्यांनी या बाबीचा गांभीर्याने व मनमोकळेपणे विचार केल्यास या स्थितीत सुधारणा होईल.’
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शाहू मधाळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब जयंती महोत्सवाचनिमित्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना कार्यक्रमादरम्यान सन्मानित करण्यात आले; तसेच विज्ञान विभागात कार्यरत असलेल्या डॉ. सोनाली कदम यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. डॉ. रामा सरतापे यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search