Next
मुलींच्या शिक्षणासाठी ‘महिंद्रा समूहा’चा पुढाकार
प्रेस रिलीज
Friday, August 03, 2018 | 05:06 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुलींच्या शिक्षणासंबंधी समाजात असणारी नकारात्मक भावना दूर करण्याच्या हेतूने महिंद्रा समूह आणि ‘नन्ही कली’ या प्रकल्पाने विशेष कार्यक्रम आखला आहे. शिक्षणामुळे '#LadkiHaathSeNikalJayegi' हा गैरसमज घालवण्यासाठी याच वाक्प्रचाराच्या नावाने विशेष मोहीम ‘हॅशटॅग’च्या स्वरूपात ‘महिंद्रा’तर्फे सादर करण्यात आली आहे.

मुलींच्या शिक्षणामुळे त्यांना समाजात अनेक संधी मिळतात, हे दाखवून देणारा कार्यक्रम महिंद्रा राइजच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर प्रसारीत करण्यात येत आहे. या उपक्रमाचा योग्य तो प्रसार व्हावा आणि तिला चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिक्षणाचे पहिले पाऊल टाकून आयुष्यात नंतर मोठे यश मिळवणाऱ्या महिलांचे यात कौतुक करण्यात आले आहे. महिंद्रा उद्योग समुहातील, तसेच ‘नन्ही कली’ उपक्रमातील प्रेरणादायी यशोगाथांमधील महिलांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.

या मोहिमेच्या उद्दिष्टाविषयी सांगताना सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आणि के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका शीतल मेहता म्हणाल्या, ‘नन्ही कली हा प्रकल्प गेली दोन दशके कार्यान्वित आहे. केवळ शिक्षणानेच गरिबी दूर करता येते व सन्मानाने जगता येते हे ‘नन्ही कली’च्या माध्यमातून आम्ही सिद्ध केले आहे. मुलींविषयीचा दृष्टीकोन बदलण्याचा हेतू बाळगून आम्ही ‘लडकी हाथसे निकल जायेगी’  (#LadkiHaathSeNikalJayegi) या संकल्पनेला सकारात्मक रूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही तयार केलेले लघुपट प्रत्येक भारतीयाने, विशेषतः तरुणांनी पाहावेत, किंबहुना या मोहिमेचा प्रसारही त्यांनी करावा आणि या विधायक कार्यात सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.’

‘महिंद्रा हा सामाजिक बांधिलकी मानणारा ब्रॅंड आहे. इतकेच नव्हे, तर ‘राइज’च्या माध्यमातून आम्ही समाजहिताची कामे करतो व इतरांनाही प्रोत्साहन देतो. ‘लडकी हाथसे निकल जायेगी’ (#LadkiHaathSeNikalJayegi) या उपक्रमातून आम्ही समाजधारणेची दिशाच बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच मुलींच्या शिक्षणातून त्यांचे सबलीकरण व्हावे, याचा प्रचारही करणार आहोत,’ अशी माहिती महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या ग्रुप कॉपोर्रेट ब्रॅंड विभागाचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी विवेक नायर यांनी दिली.

या मोहिमेची आखणी करताना महिंद्रा समूहाने ‘स्ट्रॅटेजिक डिजिटल इंटेलिजन्स’ विभागाची मदत घेतली; तसेच गटचर्चा केली. यात जे महत्त्वाचे पहिले पाच विषय चर्चिले गेले, त्यांत महिलांची सुरक्षा आणि मुलींचे शिक्षण यांचा समावेश होता. या चर्चांमध्ये मुद्दे असे : मुलींच्या सुरक्षेविषयी बहुसंख्य पालक चिंतीत असतात. अगदी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांनादेखील आपल्या मुलींवर निर्बंध हवे असतात. महिलांना संरक्षण देण्यात पुरुषांचाच स्वतःहून पुढाकार असतो. नोकऱ्यांची काही क्षेत्रे ही महिलांचीच असतात व काही क्षेत्रांमध्ये महिलांनी अजिबात येऊ नये, हा दृष्टीकोन अजूनही समाजात कायम आहे.

लघुपट बनविताना समाजातील या दृष्टीकोनांचा विचार करण्यात आला. या लघुपटासाठी निमशहरी वातावरणात चित्रिकरण करण्यात आले. मुलींविषयीच्या गैरसमजुती या केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांमध्येही असतात, हे यातून दाखविण्यात आले. एक मुलगी व तिचे वडील यांच्यात घडणारे संभाषण ही या लघुपटाची संहिता आहे. ‘लडकी हाथ से निकल जायेगी’ या संकल्पनेवर नव्याने दृष्टीकोन निर्माण करण्यासंबंधी हे संभाषण आहे.

‘एफसीबी इंटरफेस’ या संस्थेने या लघुपटाची संहिता बनवली व निर्मिती केली. ‘एफसीबी इंटरफेस’चे मुख्य निर्मिती अधिकारी रॉबी मॅथ्यू म्हणाले, ‘आपल्या समाजातील विचित्र व नकारात्मक परंपरा नाकारणाऱ्या व आपल्या मुलींच्या स्वप्नांचा बळ देणाऱ्या अनेक अज्ञात नायकांवर आधारीत हा लघुपट आहे. एका मुलीचे स्वप्न व ते साकार करण्याचा तिच्या वडिलांचा निर्धार हा यातून आम्ही दाखविला आहे. ‘लडकी हाथ से निकल जायेगी’ या संकल्पनेतील शब्दांचा अर्थ बदलून हेच शब्द नव्या सकारात्मक अर्थाने वापरण्याचे, तसेच या मुलीचे भविष्य तिच्याच हाती राहील, याचे हे प्रयोजन आहे.’

‘नन्ही कली’ हा प्रकल्प १९९६मध्ये सुरू करण्यात आला. आतापर्यत साडेतीन लाख मुलींना या माध्यमातून सक्षम बनविण्यात आले. गेल्याच वर्षी एक लाख ५३ हजार ९९९ इतक्या मुलींना या प्रकल्पाचा लाभ झाला. या प्रचंड मोठ्या उपक्रमात चार हजार २३२ स्वयंसेवक काम करतात. मुलींना दररोज दोन तास ते मार्गदर्शन करतात. आठवड्याचे सहा दिवस, वर्षभर हा प्रकल्प चालतो. देशातील ११ राज्यांमध्ये शहरी झोपडपट्ट्या आणि दुर्गम खेडी येथे विशेषकरून या प्रकल्पाची पाच हजार २६२ केंद्रे उभी आहेत. प्रत्येक भारतीयाला मुलींच्या सक्षमीकरणाबाबत जागरूक करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search