Next
समाजाचं वास्तव चित्रण करणारा चित्रकार!
BOI
Thursday, March 29, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सामान्यांच्या जीवनसंघर्षाबरोबरच त्यांच्या जगण्यातले अर्थपूर्ण क्षण मूकपणे दाखवणारी बोलकी चित्रं काढणारा चित्रकार म्हणजे अन्वर हुसेन. खरा कलावंत आणि खरा माणूस तोच, ज्याला समाजातल्या विसंगती, दुःख, दाहकता या गोष्टी दिसतात. अन्वर हुसेन यांच्यामध्ये ही सगळी वैशिष्ट्ये आहेत आणि ती त्यांच्या चित्रांत उमटलेली दिसतात. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या लेखमालेत आज अन्वर हुसेन या चित्रकाराची गोष्ट...
..........
बिन कुछ कहे, बिन कुछ सुने
हाथों में हात लिए
चार कदम... बस चार कदम 
चल दो ना साथ मेरे

काही माणसं अशी असतात, की त्यांच्यावर कुठलाही शिक्का मारता येत नाही. त्यांच्याबरोबर मूकपणे चार पावलं चाललो, तरी त्यांचं जगणं कळत जातं. त्यांची कृती खूप काही बोलत असते. हे सगळं सांगायचं कारण असं, की साधारणतः वर्षभरापूर्वी बारामतीला गेले असताना तिथे नीलेश देशमुख या अधिकाऱ्याची ओळख झाली. गप्पा रंगल्या आणि निरोप घेताना त्यांनी त्यांच्या कवितासंग्रहाची काही पुस्तकं भेट दिली. ती पुस्तकं हातात येताच त्यावरच्या मुखपृष्ठांनी मला आकर्षित केलं. अॅब्स्ट्रॅक्ट शैलीतली ती चित्रं पुस्तकाबद्दल खूप काही सांगू पाहत होती. पान उलटवलं, तेव्हा चित्रकाराचं नाव दिसलं - अन्वर हुसेन! त्यांच्याविषयी कुतूहल वाढलं. जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा चित्रमय प्रवास समोर आला. 

अन्वर हुसेनअन्वर हुसेन यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली शहराजवळ असलेल्या बुधगाव नावाच्या छोट्याशा गावी झाला. आई शिक्षिका, तर वडील प्राध्यापक! घरातलं वातावरण सुधारकाचं. घरात पुस्तकंही खूप असायची. याचं कारण अन्वरच्या वडिलांना अनेक गोष्टींची आवड होती. वाचनाबरोबरच त्यांना कविता, शेरोशायरी लिहायला आवडायचं. त्यांना संगीताची आवड असल्यामुळे चांगल्या संगीतरचनांचा संग्रह त्यांनी केला होता. ज्ञान आणि कला अशा समृद्ध वातावरणात वाढत असलेल्या अन्वरवर या सगळ्यांच गोष्टींचा प्रभाव पडत होता. 

बुधगाव हे संस्थानिकांचं गाव होतं. तिथले संस्थानिक पटवर्धन होते. बुधगावमध्ये राजवाड्याची दूरवर पसरलेली तटबंदी इतिहासाच्या आठवणी सांगायची. गावातल्या ब्रिटिश शैलीतल्या दगडी इमारती अन्वरला आपल्याकडे बोलावून घ्यायच्या. त्या इमारतींना न्याहाळताना, त्यांच्यातली भव्यता बघताना त्याचं मन त्यात रमून जात असे. नंतर अन्वर शिकायला सांगलीत आला. बारावीत असताना घरची, गावची आठवण आली, की गावाबरोबरच गावातले रस्ते, राजवाडा, तटबंदी, दगडी इमारती सगळं काही जसंच्या तसं अन्वरच्या डोळ्यांसमोर उभं राहत असे. 

अशा वेळी अन्वर अस्वस्थ होई. अभ्यासातही मग लक्ष लागत नसे. अशा वेळी एके दिवशी ही गावाकडली सगळी दृश्यं त्याच्या वहीत उतरत गेली. खरं तर इंजिनीअर होण्याची स्वप्नं बघणाऱ्या अन्वर हुसेनला आपण चित्रकार होऊ ही गोष्ट ध्यानी, मनी, स्वप्नीही नव्हती; मात्र नकळत झालेल्या कृतीनं अन्वरला जगण्याची दिशा सापडली. आपल्याला काय करायचंय याचं उत्तर मिळालं. आपण इंजिनीअर होणार नसून, आपल्याला चित्रकला शिकायचीय हे त्यानं निश्चित केलं. पुण्यात अन्वरनं ‘जीडी आर्टस्’चा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवलं. चित्रांचा, त्यातल्या प्रकारांचा, रंगसंगतीचा, चित्रकलेच्या इतिहासाचा, त्यातल्या प्रमुख शिलेदारांचा अभ्यास सुरू झाला. या अभ्यासात अन्वरला व्हॅन गॉघनं प्रेमात पाडलं. व्हॅन गॉघची चित्रं अन्वरला खूप जवळची वाटू लागली. व्हॅन गॉघच्या चित्रांमधली पिवळी शेतं, पिवळ्याधम्मक इमारती, पिवळसर प्रकाश पडलेली त्याची खोली त्याला स्वप्नातही खुणावू लागली. व्हॅन गॉघचं आयुष्य, त्याचं झपाटलेपण आणि त्याची चित्रं यांनी अन्वरला वेड लावलं. कळत-नकळत त्याच्या चित्रांवर व्हॅन गॉघचा प्रभाव पडला. पोटॅटो इटर्स, विणकरांची चित्रं, खाणकामगारांची चित्रं, लॉटरीच्या दुकानासमोरच्या गर्दीचं चित्र, कष्टकऱ्याच्या बुटाचं चित्र, अशी व्हॅन गॉघने काढलेली चित्रं अन्वरच्या मनात जागा करून बसली. याचाच परिणाम असा झाला, की अन्वरचा साधा स्वभाव आणि व्हॅन गॉघची चित्रं यांनी त्याला आजूबाजूच्या समाजाचं चित्रण करायला भाग पाडलं. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह अन्वर हुसेन

अन्वर हुसेन याच्या चित्रांमध्ये कष्टकऱ्यांचं, सर्वसामान्य माणसाचं आयुष्य दिसतं. त्याची चित्रं दारिद्र्याचं दर्शन करत नाहीत, मात्र त्या जगण्यातला ताठपणा, स्वाभिमान त्या त्या चित्रांमधून दाखवतात. मग त्याचा उभा असलेला ट्रक का असेना, तो आता जुना झालाय. त्याचं आयुष्य संपत आलंय; पण तरीही तो आपल्या इतिहासाचं दर्शन घडवत दिमाखात उभा असून, त्याच्या आसऱ्याला, त्याच्याशी हितगूज करायला आलेली कबुतरेही आपल्यालाही काही सांगू पाहतात. अन्वर हुसेन यांच्या चित्रातली टपरीवरची चहाची किटली तिची कहाणी रसिक आस्वादकाला सांगायला लागते. त्यानंतर तिथंच उभी असलेली ऑटो रिक्षा ‘चला लवकर’ अशी घाई करत आपल्याला बोलावते. आताशा फारसा दिसत नसलेला टांगाही आपल्याला ‘चलो सवारी है?’ असं विचारत आपल्याला हाक देताना दिसतो. 

एखाद्या कट्ट्यावर बसलेले काही लोक आपल्याला भेटतात, तर काही जण सायकलवर टांग मारून गप्पा मारत चाललेले दिसतात. काही ठिकाणी ही माणसं कोंडाळं करून गप्पा मारताना दिसतात, तर कधी उंचशा पिवळ्या गवतानं आच्छादलेल्या टेकडीवर बसून बोलताना एखादं कुटुंब आपल्याला भेटतं. कधी एखाद्या हातगाडीवर निवांत बसून, तर कधी कँटीनच्या मोकळ्या जागेत खुर्च्या टाकून बसलेली मंडळी आपल्याला अन्वर हुसेनच्या चित्रांमधून भेटत राहतात. कधी ही मंडळी वर्तमानपत्रं वाचत असतात, तर कधी एकमेकांशी न बोलताही केवळ एकमेकांची अबोल सोबत घेऊन चालताना दिसतात. 

नंतर अन्वरची चित्रं एखाद्या मालिकेसारखी तयार होऊ लागली. म्हणजे एकाच विषयावर अनेक चित्रं आकार घेऊ लागली. थोडक्यात ‘थीम’ तयार होऊ लागली आणि मग त्यातली चित्रं! अन्वरला लहानपणापासून मुंबई शहराचं खूप आकर्षण वाटायचं. आपल्याला कधी मुंबई बघायला मिळेल असं त्याला वाटायचं. त्याचे आजोबा त्याला मुंबईचं वर्णन करून अनेक गोष्टी सांगत. तसंच गावातले जे लोक मुंबईला जाऊन यायचे, तेही मुंबईचं विराट रूप अन्वरला आपल्या शब्दांतून सांगत. कॉलेजला असताना अखेर अन्वरला मुंबईला जाण्याची संधी मिळाली आणि आजोबांच्या नजरेतून बघितलेली, गावकऱ्यांच्या नजरेतून बघितलेली मुंबई त्याला दिसू लागली. शिवाय त्याला दिसत असलेली मुंबई आणखीच वेगळी होती. या सगळ्यांच्या मिश्रणातून ‘मुंबई डायरी’ नावाची थीम तयार झाली आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांची अनेक चित्रं कॅनव्हासवर अलगद उतरली. 

ज्याप्रमाणे आपल्या मनातल्या भावना उतरवण्यासाठी आपली डायरी असते, त्या डायरीतले शब्द आपल्याजवळ असतात, तशीच अन्वरचीही एक डायरी आकाराला येत होती. ती म्हणजे त्याचं स्केचबुक! हीच त्याची डायरी होती. त्याचे शब्द म्हणजे त्याची चित्रं होती. मनात जे येईल, जो अनुभव व्यक्त करावासा वाटेल, तो या स्केचबुकमध्ये आकाराला येऊ लागला. ‘माझं आत्मवृत्त म्हणजे माझी चित्रं’ हे पिकासोनंदेखील म्हणून ठेवलंय!

अन्वर हुसेनच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या चित्रांनी त्याचं घर गजबजून गेलं असतानाच त्याच्या मनात ‘कपाट’ या विषयानं घर केलं. मग काय ‘कपाट’ या एका थीममधून अनेक चित्रांनी जन्म घेतला. ही कपाटं जुनी होती. त्यांच्या मागच्या भिंती रंग उडालेल्या होत्या. या कपाटांमध्ये कोणाच्या बालपणाची खेळणी आठवणीदाखल ठेवलेली होती, तर काही कपाटांमध्ये दुर्मीळ पुस्तकं जपून ठेवलेली होती. काही कपाटांमध्ये कधी काळी जपलेला चित्रकलेचा छंद रंगांमधून, ब्रशमधून आणि चित्रांमधून दिसत होता. काही कपाटांमध्ये लोणच्याची बरणी आपलं अस्तित्व दाखवून देत होती, तर काही कपाटांवरची जागा वर्तमानपत्रांपासून अनेक वस्तूंसाठी गरजेची बनून राहिली होती. हीच कपाटं माणसाचं मन दाखवत होती. माणसाच्या मनात, त्याच्या आठवणीत - त्याचा भूतकाळ - ती गाठोडी जतन केलेली दिसत होती. या कपाटांमधलं सामान असं बाहेर काढणं तितकं सोपं नाही. ही कपाटं आहेत, म्हणून त्या आधारानं माणूस उभा आहे. ही कपाटं नसतील, त्यातलं सामान नसेल, तर माणूस त्याचं रिकामं आयुष्य कदाचित जगू शकणार नाही. 

अन्वरची चित्रं अशीच... खूप काही बोलत जातात. सामान्य माणसांच्या जगण्यातल्या संघर्षाबरोबरच त्यांच्या जगण्यातले काही अर्थपूर्ण क्षण मूकपणे दाखवत राहतात. म्हणूनच अन्वर हुसेनची चहाची किटलीही आपला इतिहास सांगत राहते. अन्वर हुसेननं आपल्या लहानपणचा - आपल्या गावातला - आठवणींचा - दोर पकडून ठेवला असता, तर त्याची चित्रं राजवाडे, राण्या, राजकन्या, दरबार यात अडकून पडली असती; पण तसं झालं नाही. त्याच्यातल्या संवेदनशील मनानं त्याला त्या इतिहासातून बाहेर काढून वास्तवाचं भान दिलं. त्याला आजूबाजूच्या लोकांच्या जगण्यातलं वास्तव सतावू लागलं. त्यांचे छोटे छोटे आनंदही त्याला टिपता येऊ लागले. त्याची चित्रं त्याच्या जगण्याचा एक आवश्यक भाग बनत राहिली. स्पेनचा फान्सिस्को गोयासारखा जगप्रसिद्ध चित्रकार सुरुवातीच्या काळी राजाश्रयामुळे राजा-राणी यांची चित्रं काढण्यात धन्यता मानायचा; मात्र युद्धं, क्रांती, असंतोष, बंड हे सगळं बघितल्यावर त्याची चित्रं बदलली. त्याची चित्रं समाजातल्या दाहक परिस्थितीबद्दल बोलू लागली. त्याचं ‘३ मे १८०८’ हे चित्र भीषण हत्याकांडाविषयी भाष्य करतं. त्याची ‘कॅप्रिस’ ही चित्रमालिका समाजातल्या वाईट रूढी, भोंदूपणा, भोळेपणा, फसवणूक आणि भ्रष्टाचार या गोष्टींबद्दल बोलू लागली. पिकासोचं ‘गेर्निका’ हे चित्रही युद्धाच्या भीषणतेचं प्रतीक होतं. खरा कलावंत आणि खरा माणूस तोच, ज्याला समाजातल्या विसंगती, दुःख, दाहकता या गोष्टी दिसतात. अन्वर हुसेन हा व्हॅन गॉघ, गोया आणि पिकासो यांचाच वारसा चालवणाऱ्यांपैकी एक संवेदनशील कलाकार!

अतिशय साधा राहणारा, जात-धर्म-पंथ-गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद न मानणारा हा कलाकार आपल्या कलेला सोबत घेऊन अनवट वाटेवरचा प्रवास करतो आहे. त्याच्यासोबत चार पावलं चालून बघायचंय? त्याच्याशी संपर्क साधायचा असल्यास -
संपर्क : अन्वर हुसेन
मोबाइल : ९१५६० ९५५६०, ९८५०९ ६५३८३
ई-मेल : anwarhusain02@gmail.com

(अन्वर हुसेन यांच्या चित्रांचं प्रदर्शन सध्या पुण्यातल्या भांडारकर रोडवरील आर्ट टू डे गॅलरीत भरले असून, ते ३१ मार्च २०१८पर्यंत खुले राहील. अन्वर यांच्या काही चित्रांचा आस्वाद ‘फेसबुक कॅनव्हास’च्या माध्यमातून घेता येईल. त्यासाठी https://fb.com/canvas_doc/600321340310483 या लिंकवर क्लिक करा. हा कॅनव्हास फक्त मोबाइलवरच दिसेल. कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून दिसणार नाही. त्यांच्याबद्दलचा एक व्हिडिओही सोबत देत आहोत.)

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
shrirang prabhune About 360 Days ago
धम्माल ...बस्स और क्या !
0
0

Select Language
Share Link