Next
शेगाव, लोणार आणि अकोला
BOI
Wednesday, May 09, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this storyमहाराष्ट्रातील घराघरांत ज्यांच्या चरित्राची पारायणे केली जातात, त्या गजानन महाराजांचे शिस्तबद्ध शेगाव, एक नैसर्गिक आश्चर्य असलेले लोणार येथील अद्भुतरम्य सरोवर आणि कापूस उत्पादक अकोला जिल्ह्यातील सर्व प्रकारची पर्यटनस्थळे यांची सफर.... ‘करू या देशाटन’च्या आजच्या भागात...
............
गजानन महाराजशेगावचे श्री गजानन महाराज माहिती नाहीत, असा एकही माणूस महाराष्ट्रात तरी नक्की सापडणार नाही. या गजानन महाराजांच्या शेगावपासून आजच्या भागातील भ्रमंतीची सुरुवात करू या. व्हीआयपी अर्थात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि सामान्य माणसे यांना एकाच रांगेतून देणगीशिवाय देवदर्शन होते, अशा भारतातील अत्यंत कमी तीर्थस्थळांपैकी एक स्थळ म्हणजे शेगाव. शेगाव हे मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील, बुलढाणा जिल्ह्यातील एक रेल्वेस्थानक आहे. १८७२ पूर्वी कोणासही माहीत नसलेले शेगाव आज तीर्थक्षेत्र, तसेच एक आदर्श पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा संच, स्वच्छता, उत्कृष्ट व्यवस्थापन या कारणांमुळे हे सर्वांचे आवडते ठिकाण झाले आहे. मी प्रथम १९७१ साली येथे आलो होतो. त्यानंतर अनेकदा येथे आलो आणि प्रत्येक वेळी या क्षेत्राचा चढत्या कमानीने विकास झालेला अनुभवता आला. शेगाव संस्थानच्या वतीने महाविद्यालये, धर्मार्थ दवाखाने, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालय आदी उपक्रम चालविले जातात. आदिवासींसाठीही विशेष उपक्रम राबविले जातात. भक्तगणांसाठी अल्प दरात सुग्रास जेवण आणि निवासाची सोयही उपलब्ध करून दिली जाते. संस्थानाच्या शेतीमधूनच स्वयंपाकघरात लागणारा भाजीपाला, अन्नधान्य उपलब्ध होते. तसेच गोशाळेतून दूधही उपलब्ध होते. असे स्वयंपूर्ण तीर्थक्षेत्र विरळाच.

२३ फेब्रुवारी १८७८ रोजी बंकटलाल यांना गजानन महाराजांचे दर्शन झाले, त्या दिवसापासून हळूहळू शेगावची कीर्ती सर्वदूर पसरली. महाराजांचे जीवनचरित्र मी येथे देत नाही. कारण महाराष्ट्रातील घराघरात त्याचे रोज पारायण होते. त्या गावातील प्रमुख ठिकाणांबद्दल पाहू या.

बंकटलाल सदनबंकटलाल सदन : श्री गजानन महाराजांनी पहिल्यांदा येथेच बंकटलाल यांना दर्शन दिले. हे ठिकाण शहराच्या मध्यवस्तीत असून, बंकटलाल यांच्या कुटुंबीयांनी ही जागा शेगाव संस्थानाच्या ताब्यात दिली आहे. तेथे तीन मजली भव्य अशी स्मारकवजा इमारत बांधण्यात आली आहे.


आनंदसागरआनंदसागर : भक्तांचा आनंद द्विगुणित करणारा आनंदसागर १२० एकर जागेवर उभा आहे. येथे कन्याकुमारीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तसेच संतांच्या प्रतिमांचे दर्शनही घडविण्यात आले आहे. आकर्षक तलाव, सुंदर लॉन्स, फुलझाडे यांनी वेढलेला परिसर आणि सर्व बघता बघता संध्याकाळी शीण घालविणारे रंगीत संगीतमय कारंजे हे येथील वैशिष्ट्य. आनंदसागर हे ठिकाण मुख्य मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे; पण तेथे येण्या-जाण्यासाठी संस्थानामार्फत बससेवाही उपलब्ध आहे.

सिंदखेडराजासिंदखेडराजा : आज महाराष्ट्र ज्यांच्यामुळे उभा आहे, त्या शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मगाव म्हणजे सिंदखेडराजा. त्यामुळे मराठी माणसाच्या दृष्टीने हे एक तीर्थक्षेत्रच आहे. जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा जुन्या काळात बांधलेला वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजीराजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणी तलाव, मोती तलाव अशी इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे या गावामध्ये आहेत. जिजाऊंचे उचित स्मारक आणि संग्रहालय येथे उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

लोणार सरोवरलोणार सरोवर : प्रत्येक भारतीयाने भेट द्यावे असे ठिकाण म्हणजे लोणार सरोवर. हे बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती उल्कापातामुळे झाली. १८२३मध्ये अलेक्झांडर या ब्रिटिश माणसाने हे सरोवर जगासमोर आणले. अर्थात स्कंदपुराण, तसेच ऐन-ए-अकबरी यांमध्येही त्याचा उल्लेख आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून, ते साधारण ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे अस्तित्वात आले. विवर म्हणजे मोठ्या आकाराचे प्रचंड खोल असे निसर्गनिर्मित सरोवर. हे जगातील पाचव्या क्रमांकाचे विवर आहे. परदेशातून पर्यटक येथे येतात; पण शेगावला जाणारे भाविक इकडे फिरकत नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे. या सरोवराच्या काठावर जाईपर्यंत हे दिसत नाही. साधारण १.५ किलोमीटर व्यास आणि ४५० फूट खोल असे हे सरोवर खुरट्या जंगलाने वेढलेले आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी, असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या संशोधनामुळे सापडला आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वीच्या या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला असून, ‘बॅसिलस ओडिसी’ असे त्याचे नाव आहे. इ. स. २००४मध्ये ‘नासा’च्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्व शोधले होते. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.

दैत्य सुदान विष्णू मंदिरदैत्य सुदान विष्णू मंदिर : हे खजुराहो शैलीतील मंदिर आहे. हेमाडपंती प्रकारातील हे मंदिर इ. स. १२००मधील असावे. यातील मूर्ती धातूची असून, ती दगडात बनविली आहे, असे वाटते.


मारुती मंदिर : तेथील मारुती मंदिरातील मारुती हा उल्केचा तुकडा असावा, असे म्हणतात. तेथे होकायंत्र चालत नाही, असे म्हणतात; मात्र मी गेलो त्या वेळी माझ्याकडे होकायंत्र नसल्याने मला त्याची सत्यता पडताळता आली नाही.


पौराणिक आख्यायिकेनुसार, लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवराला व या परिसराला लोणार हे नाव मिळाले. ब्रिटिश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ. स. १८२३मध्ये या विवराची नोंद केली. प्राचीन काळी या सरोवराचा उल्लेख विराजतीर्थ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. लोणार हे ठिकाण औरंगाबाद शहरापासून १५० किलोमीटरवर, तर शेगावपासून १०० किलोमीटरवर आहे. अकोला येथूनही लोणारला दोन तासांत जाता येते. येथे ‘एमटीडीसी’तर्फे निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. (लोणारविषयी सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नांदुरानांदुरा : अकबराच्या ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये या गावाचा उल्लेख आहे. हे गाव श्री हनुमानाच्या गगनचुंबी मूर्तीमुळे प्रसिद्ध झाले आहे. येथे असलेल्या १०५ फूट उंचीच्या मारुतीची शेपूट ७० फूट लांबीची आहे. त्याचे हात २५ फूट, तर गदा ३० फूट लांब आहे. हा मारुती रेल्वेतून, तसेच मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळूनही बघता येतो. शेगाव, सिंदखेडराजा, तसेच नांदुरा ही ठिकाणे एका दिवसाच्या ट्रिपमध्ये पाहता येतात.

शारंगधर बालाजी मंदिर
मेहकर : पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले हे गाव शारंगधर बालाजी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथील बालाजी मूर्ती ही आशियातील सर्वांत मोठी बालाजीची मूर्ती समजली जाते. बालाजींच्या शिल्पासोबत सापडलेल्या तांबे, पितळ, सोने या धातूंमध्ये कोरलेले शिलालेख व जडजवाहीर आता इंग्लंडमधील ब्रिटिश संग्रहालयात आहेत. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे दर्शन होते. विष्णूचे दशावतारही येथे पाहता येतात. तसेच येथे विष्णू आणि लक्ष्मी दोघेही एका ठिकाणी पाहायला मिळतात. या गावात श्री गजानन महाराज यांचेही सुंदर मंदिर आहे.

सैलानी : हे ठिकाण सैलानी बाबा दर्ग्यासाठी प्रसिद्ध आहे.

देऊळगावराजा : येथे पुरातन बालाजी मंदिर असल्याने हे ठिकाण महाराष्ट्राचे तिरुपति म्हणूनही ओळखले जाते. राजे जगदेवराव जाधव यांनी हे मंदिर १६६५मध्ये बांधले आहे. या मंदिराचा सभामंडप सागवानाच्या लाकडापासून बनविलेल्या खांबांवर असून, प्रत्येक खांबाची उंची ३० फूट आहे.

बुलढाणाबुलढाणा : हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथे राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात बौद्ध स्तूप आहे.

क्षेत्र नागझरी : येथे पुंडलिक महाराज यांची समाधी आहे. त्यांचा कार्यकाल १८७०च्या सुमारास होता. ते गजानन महाराजांचे समकालीन होते.

विवेकानंदनगर, हिवरा : येथे एक मोठा मठ असून, तेथे अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत असतात. येथील भंडारा (महाप्रसाद) शिस्तबद्ध असतो. एकाच वेळी लाखो लोक भोजन घेतात, तरीही भोजनानंतर लगेचच इतकी स्वच्छता केली जाते, की तेथे आत्ताच एवढे लोक जेवून गेले असतील, यावर विश्वास बसत नाही. येथे धर्मार्थ दवाखाना, शैक्षणिक संस्थाही चालविल्या जातात.

खामगावखामगाव : शेगाव जवळच नागपूर महामार्गावर हे ठिकाण आहे. १८५६ साली येथील नगरपालिका अस्तित्वात आली. तसेच १८६५ साली येथे शाळाही सुरू करण्यात आली. खामगावचा पाणीपुरवठा १५० वर्षांपूर्वी रावबहादूर देशमुख यांच्यामुळे सुरू झाला. त्यांनी त्यासाठी आपली जमीन तर दिलीच; पण तलावही बांधून दिले. या तलावातूनच खामगावला पाणीपुरवठा होत आहे. कापूस उद्योगामुळे जलंब ते खामगाव अशी रेल्वेलाइनही त्या वेळी टाकण्यात आली. त्यावरून गतकाळात येथील उद्योग कसे भरभराटीला आले होते, याची कल्पना येते. बुलढाणा व अकोला हे दोन्ही जिल्हे कापसाचे आगरच. खामगावमध्ये पूर्वी जिनिंग मिल्स होत्या. कापूस एकाधिकार योजनेनंतर यावर परिणाम झाला, असे लोकांचे म्हणणे आहे. आता येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हिंदुस्थान लिव्हरचा साबण कारखाना आहे. तसेच सोयाबीन प्रक्रिया उद्योग, तसेच सरकीपासून तेल काढण्याचे कारखानेही आहेत. शेगावला जाताना रात्री उशीर झाल्याने मी दोन वेळा खामगाव येथे मुक्काम केला होता. येथील माझे स्नेही आणि आमच्या निवृत्त कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष निवृत्त अभियंता अरविंद देशमुख यांनी अकोला व बुलढाणा जिल्हा यांची बरीच माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यात थळ, गरदगाव ही अन्य धार्मिक ठिकाणेही आहेत.

अकोलावनश्रीने नटलेला अकोला : काळ्या मातीत पांढरे सोने देणारा अर्थात कापूस उत्पादक जिल्हा म्हणून अकोला प्रसिद्ध आहे. अकोला शहर हे ‘कॉटन सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे नावाजलेल्या शैक्षणिक संस्थाही भरपूर आहेत. या शहराला महानगरपालिका आहे. अकोला परिसराचा महाभारतात विदर्भ म्हणून उल्लेख सापडतो. इ. स. पू. २७२ ते २३१ मध्ये या भागात बेरार राजवटीची स्थापना मौर्यकाळात झाली. त्यानंतर सातवाहन राजवट आली. दुसऱ्या शतकात वाकाटक राजवट आली. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, परत चालुक्य, देवगिरीचे यादव आणि १२व्या शतकात हा प्रदेश खिलजीच्या ताब्यात गेला. त्यानंतर मुघल, बहामनी अशा अनेक राजवटी या भागाने बघितल्या. १७ व्या शतकात हा भाग शाहू महाराजांच्या ताब्यात आल्यावर मराठा अंमल सुरू झाला. दुसऱ्या बाजीरावाबरोबर झालेल्या लढाईत हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, तो १९४७मध्ये भारत स्वतंत्र होईपर्यंत.

असदगडअसदगड : अकोला शहरामध्ये असदगड नावाचा भुईकोट किल्ला असून, ख्वाजा अब्दुल लतीफ याने असदखाँच्या देखरेखीखाली १६९८मध्ये तो बांधून पूर्ण केला, असा उल्लेख असलेला शिलालेख तेथील ईदगाहवर आहे. किल्ला भग्नावस्थेत असून, त्याचे दोन बुरुज आणि दोन दरवाजे शिल्लक आहेत. त्यातील आगर वेस गोविंद आप्पाजी याने १८४३ साली बांधली. असद बुरुजावर हवामहल म्हणून एक अर्धवट पडकी इमारत आहे. अकोला हे शहर सुरत-नागपूर महामार्गावर वसले आहे. तसेच मुंबई-हावडा या रेल्वे मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे.

नरनाळा किल्लानरनाळा किल्ला व अभयारण्य : या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही; पण मध्ययुगात उत्तरेतून दक्षिणेला जाताना हा किल्ला लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा असावा, असे त्याच्या बांधणीवरून वाटते. हा किल्ला गोंड राजांनी बांधला असावा. त्यानंतर निजाम व नंतर नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेला, असे दिसून येते. हा किल्ला जमिनीपासून ३१६१ फूट उंचीवर असून, ३८२ एकर जागेवर आहे. गडाची तटबंदी भक्कम असून, त्याला ६४ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करताना पाच दरवाजे लागतात. प्रथम शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा आणि त्यानंतर इतर दोन दरवाज्यांतून गेल्यावर आपण किल्ल्यात येतो. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडावर नागपूरकर भोसलेकालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे.

हा किल्ला तीन भागांत विभागाला गेला आहे. पूर्वेकडील जाफराबादचा किल्ला, मध्यभागातील नरनाळा आणि पश्चिम बाजूला तेलिया गड आहे. यातील जाफराबाद किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर एरिया’त समाविष्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हा एक मोठा किल्ला समजला जातो. वनविभाग आणि पुरातत्त्व खाते यांच्यामुळे किल्ल्यावर फिरण्यात आता बरीच बंधने आली आहेत. लवकरच नरनाळा किल्ल्याचे संपूर्ण क्षेत्र ‘कोअर झोन’मध्ये जाण्याची शक्यता आहे.
 
नरनाळा अभयारण्यनरनाळा अभयारण्यात सकाळी आठ ते दुपारी तीन याच वेळेत प्रवेश दिला जातो. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर नरनाळा अभयारण्यात थांबता येत नाही. हे अभयारण्य दर मंगळवारी व राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बंद असते. किल्ल्यावर आजही राणी महाल व बाजूची मशीद अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला, तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराची कल्पना देतात. येथे जवळच तेला-तुपाच्या टाक्या दिसतात. या टाक्या खोल असून, त्यात विभागणी केलेली आहे. युद्धकाळात तेल-तूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असत. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विस्तीर्ण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर ‘नऊगजी तोफ’ दिसते. ही तोफ अष्टधातूची असून, इमादशहाच्या काळात गडावर आणली गेली, असे म्हणतात. त्यावर फारसी लिपीत लेख कोरलेला आहे. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदनाची व सागाची झाडे फार दाटीने वाढलेली आहेत. हे ठिकाण अकोल्यापासून ६६ किलोमीटर अंतरावर आहे.

काटेपूर्णा अभयारण्य : या अभयारण्यात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. जंगलामध्ये विविध प्रकारची हरणे, अस्वले, रानडुकरे, नीलगायी, मोर पाहायला मिळतात. विविध प्रकारचे पक्षी हेदेखील येथील आकर्षण आहे. काटेपूर्णा जलाशयाभोवतीच हे अभयारण्य आहे.

बाळापूरबाळापूर : महामार्ग क्रमांक सहावर हे ऐतिहासिक ठिकाण असून, ते मुघल काळातील बुऱ्हाणपूर-हैदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे लष्करी केंद्र होते. येथे एक किल्ला असून, दुहेरी तटबंदीने जागोजागी बुरुज बांधलेले दिसतात. अतिशय देखणा असा हा किल्ला हमरस्त्यावरूनही दिसतो. बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे.

मूर्तिजापूर : हे अकोला जिल्ह्यातील एक कापूस उत्पादक, व्यापाराचे, तसेच औद्योगिक ठिकाण आहे.

पारस औष्णिक केंद्रपारस औष्णिक केंद्र : २५० मेगावॉट क्षमतेच्या या केंद्रातील जनित्रे चालू आहेत; पण हे केंद्र अजून पूर्ण क्षमतेने चालू नाही. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या न्यायालयीन प्रकरणामुळे हा प्रकल्प २०११पासून रखडला आहे.

प्रवास आणि निवास :
शेगावसाठी जवळचा विमानतळ औरंगाबादला आहे. अकोला/अमरावती येथेही विमानतळ झाला आहे; पण स्थायी सेवा सुरू नाही. शेगाव, अकोला ही ठिकाणे मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर आहेत. तसेच धुळे-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरही ही गावे जोडलेली आहेत. शेगावला खामगाववरून गाडीने जाता येते. शेगाव रेल्वे स्टेशनला सर्व मेल व एक्सप्रेस गाड्या थांबतात. अकोला, शेगाव, खामगाव येथे राहण्याची व्यवस्था आहे. लोणार येथे ‘एमटीडीसी’मार्फत राहण्याची व्यवस्था होऊ शकते. या भागात जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी चांगला असतो. अकोला किंवा शेगाव येथे मुक्काम करून लोणार – सिंदखेडराजा -नांदुरा - मेहेकर एका दिवशी आणि अकोला, नरनाळा दुसऱ्या दिवशी अशी ट्रिप करणे शक्य आहे. औरंगाबादहूनही लोणार, सिंदखेडराजा येथे जाता येते. कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे व मुंबई येथून तेथे थेट रेल्वे उपलब्ध आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
anand g mayekar About 56 Days ago
Madhavaji, tumche manave tevadhe abhar kamich ahet. Dar athavadyala tumhi anek sthalanchi mahiti deta, tyache amchyasarakhya samanya mansana nehamich aproop asate. Pratyek thikanchi mahatvapoorna mahiti vachun aplyala deshatil/rajyatil baryach thikanchi maitich nahi yachi janiv hote. Dnyan vruddhisathi anek Dhanyawad.
0
0
Anagha Melag. About 56 Days ago
Akolyala amhi adhi hotoch. Shegaola tar nehami jato. Baki mahiti chhan ani upukta ahe.
0
0
जयश्री चारेकर About 56 Days ago
यातील अभयारण्य ,किल्ला माहिती मस्त .आता शेगाव ला गेलो की नक्कीच बघायला आवडेल
0
0
SANTOSH D PATIL About 256 Days ago
अतिशय सुंदर माहिती! सर्वच भाग पाहण्यासारखा आहे.
0
0
Ajay Raut About 268 Days ago
छानच माहिती .. 👍👍👍
0
0
जयश्री चारेकर About 279 Days ago
अप्रतिम , २/३नविन ठिकाणे कळाली .
0
0
सुधीर बोकील About 284 Days ago
अतिशय सुंदर माहिती! सर्वच भाग पाहण्यासारखा आहे.
0
0
Shreyas Joshi About 285 Days ago
सुंदर माहिती
0
0
Samadhan kalange About 285 Days ago
छान माहिती
0
0

Select Language
Share Link