Next
‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी अनेकांचे जीवन घडवले’
BOI
Friday, April 28, 2017 | 02:23 PM
15 5 0
Share this article:

मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना डॉ.हिंदुराव पाटीलकोल्हापूर : ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था निर्माण करून, अनेक विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध बनवले आहे. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांचे कुशल नेतृत्व व कर्तृत्वसंपन्न शैक्षणिक कार्याने विवेकानंद कॉलेजने यशाचे शिखर गाठले. हा बहुमान केवळ एका शिक्षकाचा नसून संपूर्ण संस्थापरिवाराचा आहे,’ असे विचार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील सेवागौरव समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. 

‘एखादे झाड आपण लावले तर त्याला फळे आल्यानंतर फार मोठा आनंद होतो. तसेच आपण केलेल्या कार्याचा कोणीतरी गौरव केला, तर मनाला समाधान वाटते. शिक्षकाने समाजाशी संवाद साधणे आणि विद्यार्थ्यांची जडणघडण करणे हे त्याचे कर्तव्य आहे. विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ध्येयविचाराने प्रेरित होऊन ही संस्था नावारूपाला आणली आहे. त्याग, सेवा, जिद्द, चिकाटीने सतत कार्यरत राहिल्याने संस्थेचा विकास साधला जाणार आहे,’ असे विचार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. 

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजींनी ज्ञानाची गंगोत्री गोरगरिबांच्या मुलांपर्यंत पोहोचवली. उत्तम शिक्षकांची नेमणूक करून या शिक्षणव्यवस्थेतून संस्थात्मक कार्य अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांच्यासारखे कुशल नेतृत्व या संस्थेला लाभले. त्यांचा सेवागौरव करताना शिक्षकांप्रती असणारा आदर व संस्थेविषयी असणारे अपरंपार प्रेम व्यक्त होताना दिसते. बापूजींचे शैक्षणिक कार्य अधिक जोमाने पुढे नेणारी अशी कर्तृत्ववान माणसेच संस्थेत निर्माण व्हावीत.’ 

आपल्या मनोगतामध्ये खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील हे एक कुशल व कर्तव्य दक्ष नेतृत्व करणारे उत्तम प्रशासक आहेत. त्यामुळेच विवेकानंद कॉलेजची शैक्षणिक यशस्वी घोडदौड साध्य झाली आहे. जीवनामध्ये परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान गुरूचे असते. ते ज्ञानदान करतात. गुरुपेक्षा श्रेष्ठ आईवडिलांचे स्थान असते. ते पालनपोषण करतात. जीवनाला यशस्वी करण्यासाठी या सर्वांचा आदर्श घेऊनच पुढे जायचे असते.’ 

प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘साताऱ्यातील कुठरे या दुर्गम खेड्यामध्ये मी शिक्षण घेतले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजींचे माझ्यावर अखंड उपकार आहेत. त्यांच्यामुळेच या संस्थेत मला नोकरी मिळाली. कष्ट करण्याची जिद्द निर्माण झाली. खडतर परिश्रमातून जीवन उभे राहिले. धामणी हायस्कूलमध्ये सहशिक्षकाच्या नोकरीपासून विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदापर्यंतचा प्रवास जीवनामध्ये बरेच काही देऊन गेला. सहकाऱ्यांची मिळालेली साथ व अभयकुमार साहेबांची पाठीवर मिळालेली थाप, यामुळे जीवनात यशस्वी होत गेलो.’ 

या वेळी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, स्नेहल भोसले, सदानंद आग्रे, महापौर हसीना फरास यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले. प्राचार्य पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘ध्यासपर्व’ या गौरविकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी प्राचार्य पाटील यांनी काकासाहेब चव्हाण तळमावले महाविद्यालयास ५० हजार रुपयांची देणगी आणि ५० हजार रुपयांची पुस्तके भेट स्वरूपात दिली. तसेच कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजलाही त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली. त्या देणगीच्या व्याजातून एका आदर्श विद्यार्थ्यास दर वर्षी पारितोषिक द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन व संस्थेच्या प्रार्थनागीताने करण्यात आली. या वेळी स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील सेवागौरव समितीचे अध्यक्ष डॉ. डी. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. ए. देसाई व प्रा. व्ही. बी. सुतार यांनी केले. आभार डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी मानले. 

या समारंभासाठी संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. अशोक करांडे, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. राजन गवस, प्रा. डॉ. नागेश नलवडे, प्राचार्य भाऊ शेवाळे, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, प्राचार्य डॉ. गवळी, सुरेश कुराडे, शाहीर कुंतीनाथ करके, कवी अशोक भोईटे, प्रा. नंदकुमार रानभरे, तसेच प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांचे नातेवाईक, हितचिंतक, संस्थेचे पदाधिकारी,  विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
15 5 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
swipnil lokare About 231 Days ago
एकच नंबर आहे
3
0
Mr.Balasaheb Patil About
आपणाला बापूजीना अभिप्रेत असलेला गुरूदेव कार्यकर्ता म्हणून काम करायला मिळाले हे आपले भाग्य ,असे भाग्य फार कमी लोकाना मिळते ,आपण संधीचे सोने केला आपले हार्दिक अभिनंदन.
15
2
S Y Hongekar About
Excellent. The news flashes the highlights of the function and the outstanding efforts of Prin Dr Hindurao Patil. It is an energetic news for others.
16
1

Select Language
Share Link
 
Search