Next
कोण म्हणते भाषा मरते?
BOI
Monday, April 15, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:‘युनायटेड किंग्डम’अंतर्गत येणाऱ्या वेल्स या देशाची वेल्श ही भाषा काही दशकांपूर्वी लुप्त होण्याच्या मार्गावर होती; मात्र आज सुमारे पाच लाख जण ही भाषा बोलतात. हे केवळ एका दिवसात घडलेले नाही. यामागे अनेक जणांचे प्रयत्न आहेत, तपश्चर्या आहे. कोणत्याही भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी कार्यरत असणाऱ्यांसाठी उमेद देणारी ही गोष्ट आहे.
..........
आपल्या आजूबाजूच्या भाषा नष्ट होण्याबाबत सातत्याने चर्चा सतत होत असते. जगातील अनेक भाषा एक तर मृत झाल्या आहेत किंवा त्या मृत होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक भाषा अशा आहेत, ज्या अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी माणसे बोलू शकतात. ते गेले, की या भाषाही राम म्हणतील, असे वारंवार बोलले जाते. भाषेच्या संदर्भात या वक्तव्यांना वास्तवाची किनार आहे, नाही असे नाही.

नुसती आकडेवारी पाहायची झाली, तर जगभरात ५९२ भाषा धोक्यात आहेत आणि ६४० भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नष्ट झालेल्या भाषांची संख्या थोडीथोडकी नव्हे, तर २२८ एवढी आहे. त्यातील काही भाषा तर निव्वळ गेल्या अर्धशतकात नामशेष झाल्या आहेत. म्हणूनच स्वदेशी भाषांबद्दलची जागरूकता वाढावी आणि या भाषांचे महत्त्व पुढच्या पिढीवर बिंबावे, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. या संबंधात राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या निवेदनात, १७०० भाषा धोक्यात आलेल्या भाषा म्हणून जाहीर केल्या आहेत. या भाषा संपुष्टात येण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. या स्वदेशी भाषा लुप्त झाल्या, तर ती संस्कृती आणि त्या त्या भाषांमधील ज्ञान संकटात येण्याचा धोका संभवत असल्याचेही राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

...मात्र या परिस्थितीतही अशा संकटात असलेल्या भाषांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांना अनुकूल फळेही आली आहेत. काही भाषा या मृत्युंजय ठरल्या असून, त्या बोलणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा भाषांमध्ये असलेली एक प्रमुख भाषा म्हणजे वेल्श भाषा. ‘युनायटेड किंग्डम’अंतर्गत येणाऱ्या वेल्स या देशाची असलेली ही भाषा काही दशकांपूर्वी लुप्त होण्याच्या मार्गावर होती; मात्र आज सुमारे पाच लाख जण ही भाषा बोलतात. हे केवळ एका दिवसात घडलेले नाही. यामागे अनेक जणांचे प्रयत्न आहेत, तपश्चर्या आहे. अनेक संघटना, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोहिमेच्या पाठीमागे आपले बळ उभे केले, तेव्हा कुठे त्याचे परिणाम आज जगासमोर आहेत. आपल्याकडेही भाषेच्या अवस्थेबद्दल नकारात्मक सूर लावणारे चिंतातूर जंतू काही कमी नाहीत; मात्र त्यांनाही उमेद येईल अशी कामगिरी वेल्श लोकांनी केली आहे.

अन्य भाषांप्रमाणे वेल्शलाही साम्राज्यवादी अत्याचारांना सामोरे जावे लागले. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी १९व्या शतकात जाणीवपूर्वक या भाषेचे खच्चीकरण केले. ब्रिटनला लागूनच असल्यामुळे ब्रिटिश साम्राज्य व इंग्रजीचा वर्चस्ववाद या दोहोंचा वरवंटा या चिमुकल्या देशावर चालला. वेल्श भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात लाकडाच्या फळ्या अडकवल्या जात. विद्यार्थ्यांनी केवळ इंग्रजी बोलावे, असे प्रयत्न करण्यात आले. परिणामी वेल्श बोलणाऱ्यांचा टक्का घसरला आणि आता आपली भाषा काळाच्या उदरात गडप होणार, अशी भीती वेल्श लोकांना वाटू लागली.

याची प्रतिक्रिया म्हणून १९६२मध्ये वेल्श लँग्वेज सोसायटी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने लोकशाही आणि हिंसक अशा दोन्ही मार्गांनी आपल्या भाषेच्या रक्षणाची चळवळ सुरू केली. केवळ इंग्रजी भाषेत असलेले फलक उद्ध्वस्त करणे, धरणे आंदोलन करणे अशा पद्धतीने आंदोलने केली. त्यापायी अनेकांना तुरुंगात जावे लागले. वेल्श भाषेतील सरकारी दूरचित्रवाणी वाहिनी सुरू करण्यासाठी त्यांनी मोहीम राबविली. परिणामी वेल्शमधील पहिली वाहिनी १९८२ साली सुरू झाली.

विसाव्या शतकाच्या शेवटी राजकीय वारे वेल्श भाषेच्या बाजूने वाहू लागले. वेल्स सरकारला १९९७ साली ब्रिटनकडून (युनायटेड किंग्डम) आंशिक स्वायत्तता मिळाली. त्यानंतर सरकारने आपल्या भाषेचा प्रसार करण्यासाठी हिरीरीने प्रयत्न केले. न्यायालयात आणि सर्व सार्वजनिक सेवांसाठी इंग्रजीच्या बरोबरीने वेल्श भाषेच्या वापराला परवानगी देणारा कायदा १९९३मध्ये मंजूर करण्यात आला. देशभरात वेल्शच्या शिक्षणाला उत्तेजन देण्यात आले आणि अगदी अलीकडे, २०११मध्ये ती देशाची अधिकृत भाषा बनली. दुसरीकडे सामाजिक पातळीवर आपल्या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आवाहने व विनंत्या सुरूच होत्या.

या भगीरथ प्रयत्नांची फळे आता दिसू लागली आहेत. वेल्समधील १९९१च्या जनगणनेनुसार केवळ १८.५ टक्के लोक ही भाषा बोलत होते. आता एक दशकानंतर ही संख्या २० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. इंग्लंड आणि इतर देशांमध्ये कायमचे वास्तव्य करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतानाही ही वाढ दिसत आहे. म्हणजेच भाषेची घसरण नुसती थांबली नाही, तर वाढ दिसू लागली आहे. वेल्सची लोकसंख्या २०५०पर्यंत ३५ लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून, त्यापैकी किमान १० लाख जण वेल्श बोलणारे असावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे. विलुप्त व्हायचे सोडा, तळागाळातील जनतेचे प्रयत्न आणि सरकारचे साह्य यांमुळे एखादी भाषा पुनरुज्जीवित कशी होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून आज वेल्शचा निर्देश केला जातो.

वास्तविक जागतिकीकरणाच्या काळात घडत असलेली एक विचित्र प्रक्रिया भाषातज्ज्ञांनी नोंदविली आहे. ज्या मोठ्या भाषा आहेत, त्यांच्या भाषकांमध्ये वाढ होत आहे, तर लहान भाषा लुप्त होत आहेत. ‘युनेस्को’च्या अहवालानुसार, जगातील ४०.५ टक्के लोक केवळ आठ भाषा बोलतात. या भाषांना सुपर लँग्वेजेस असे म्हटले जाते आणि त्या बोलणाऱ्यांची संख्या २८३ कोटी एवढी आहे. उरलेली ५९.५ टक्के जनता सात हजारांहून जास्त असलेल्या स्वभाषेपैकी एक भाषा बोलते. मग यात आपली मराठीही आली. आपल्या भारतीय भाषांना जतन करणे आणि केवळ जतन नव्हे, तर त्या वाढवणे, याची चर्चा आपल्याकडे होत असते. एक भाषा मरते, तेव्हा संपूर्ण संस्कृती मरण पावते. त्यामुळे मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपल्यालाच पावले टाकावी लागणार आहेत, हेही सांगितले जाते; मात्र त्यासाठी काय करायचे, याची फारच थोडी चर्चा होते.

अन् त्या वेळेस वेल्श भाषेसारखी उदाहरणे आपल्या कामी येतील. वेल्समध्ये घडले तसे जनता आणि सरकार या दोन्ही पावलांचा वापर करूनच भाषेची वाटचाल होणार आहे. भाषा मरणार नाही, तर तरारून उठणार!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षानिमित्त 
‘बाइट्स ऑफ इंडियाने राबविलेल्या बोलू ‘बोली’चे बोल! या मराठीच्या बोलीभाषांसंदर्भातील उपक्रमाबद्दल वाचण्यासाठी आणि विविध बोलीभाषांचा आस्वाद घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 130 Days ago
A language dies if people stop using it . This has happened , and is Happening even now , all over the world .
0
0

Select Language
Share Link
 
Search