Next
खडकवासला धरणाच्या काठावर नंदनवन
BOI
Thursday, June 21, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : धरणात गाळ साठणे ही स्वाभाविक क्रिया आहे. तो गाळ काढल्यावर धरणाची साठवणक्षमता तर वाढतेच; पण तो काढलेला गाळ अत्यंत सुपीक असल्याने त्याचा योग्य वापर केल्यास नंदनवन फुलू शकते. निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पुढाकार घेऊन २०११पासून लोकसहभागातून राबविलेली पुण्यातील खडकवासला धरणातील गाळ काढण्याची मोहीम हे त्याचे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आता राज्य सरकारनेही या मोहिमेसाठी बांबूची रोपे दिली असून, त्यांची लागवड केली जाणार आहे.

निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाला विविध सामाजिक संस्था, खासगी कंपन्या, राज्य सरकार, संरक्षण दल यांनीही हातभार लावला. आतापर्यंत खडकवासला धरणाच्या पंधरा किलोमीटर परिसरातील बारा लाख ट्रक गाळ काढण्यात आला. गाळ काढल्यानंतर धरणाच्या किनाऱ्यावर विविध झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले. तिथे भेट देणारे नागरिक आवर्जून या झाडांच्या सान्निध्यात वेळ घालवत आहेत. 

या प्रकल्पातील दुसरा टप्पा नुकताच सुरू करण्यात आला आहे. गोऱ्हे खुर्द, गोऱ्हे बुद्रुक, खानापूर, मालखेड या गावांमध्ये धरणाच्या किनाऱ्यावरील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकरिता राष्ट्रीय बांबू मिशनअंतर्गत बांबूची एक लाख रोपे यासाठी दिली आहेत. रोपांची लागवडही सुरू करण्यात आली आहे. खडकवासला गाळ उपसा प्रकल्पामध्ये २२ किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील गाळ काढण्याचे नियोजन आहे. त्यापैकी १५ किलोमीटर परिसरातील गाळ काढण्यात आला असून, भविष्यात ही माती परत वाहून धरणात जाऊ नये, यासाठी शेकडो झाडे लावण्यात आली आहेत.

‘या उपक्रमाचे अनुकरण राज्यातील इतर धरणांवरही झाले, तर धरणांची साठवणक्षमता वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल. तसेच गाळातून नंदनवन फुलवता येईल. मत्स्यपालनाचे उपक्रम राबवता येतील,’ असा विश्वास निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केला.

(खडकवासला धरणाच्या काठावर ‘ग्रीन थंब’ संस्थेने राबविलेल्या उपक्रमाची झलक, तसेच निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचे मनोगत... पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link