Next
साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे पाच कलाकारांना ‘तेंडुलकर-दुबे शिष्यवृत्ती’
BOI
Thursday, February 14, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:

पुणे : साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारी ‘तेंडुलकर-दुबे मेमोरिअल फेलोशिप इन परफॉर्मिंग आर्ट्स’ शिष्यवृत्ती या वर्षी सायली फाटक, अभिनव ग्रोव्हर, सुयोग देशपांडे, नचिकेत देवस्थळी आणि नील सेनगुप्ता यांना जाहीर झाली आहे. 

‘रंगभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या युवा रंगकर्मींना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी ‘तेंडुलकर-दुबे मेमोरिअल फेलोशिप इन परफॉर्मिंग आर्ट्स’ ही शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा सायली फाटक, अभिनव ग्रोव्हर, सुयोग देशपांडे, नचिकेत देवस्थळी आणि नील सेनगुप्ता यांची या शिष्यवृत्तीकरता निवड झाली आहे,’ अशी माहिती साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक कुलकर्णी यांनी दिली. 

सायली फाटक
‘प्रत्येकी एक लाख रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप असून, प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक महिन्याचा आगाऊ धनादेश कलाकारांना सुपूर्द करण्यात येईल. येत्या २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर असलेल्या घरकुल लॉन्स येथे ज्येष्ठ समीक्षक आणि नाटककार रामू रामनाथन यांच्या हस्ते एका कार्यक्रमात ही शिष्यवृती या पाच रंगकर्मींना प्रदान करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

 नचिकेत देवस्थळी‘शिष्यवृती वाटपाचे हे सलग १४ वे वर्ष असून, गेल्या १३ वर्षांत एकूण ५७ रंगकर्मींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे,’ अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली. 

‘साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीवरील ताकदीची अधिकाधिक नाटके रसिक प्रेक्षकांसमोर यावीत, नवोदित कलाकार समोर यावेत, त्यांना प्रोत्साहन आणि हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दहा वर्षांपासून विनोद दोशी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. या वर्षीपासून हा महोत्सव ‘सारंग थिएटर नाट्यमहोत्सव’ या नवीन नावासह कलाकार आणि रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याखेरीज प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही प्रायोगिक नाटकांची निर्मिती देखील करण्यात येते. याबरोबरच गरजू व ज्येष्ठ कलाकारांचा वैद्यकीय व देखभाल खर्चदेखील केला जातो,’ असेही कुलकर्णी यांनी सांगितले. 

नील सेनगुप्ता
अभिनेत्री सायली फाटक हिने विविध नाटकांसह दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘अ फ्रेंडस स्टोरी’, ‘महानिर्वाण’, ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’, ‘गेली एकवीस वर्षे’ ही नाटके, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांबरोबरच तिने ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ या काही चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.

सुयोग देशपांडे
अभिनेता नचिकेत देवस्थळी यानेही ‘महानिर्वाण’, ‘चारशे कोटी विसरभोळे’, ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकांमध्ये, तसेच दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो ‘सुखन’ या उर्दू रचनांच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

नील सेनगुप्ता हा दिल्ली येथील अभिनेता व दिग्दर्शक आहे. त्याने ‘ग्रूसम प्लेग्राऊंड इंज्यूरीज’, ‘रावण आया’, ‘लव्ह, प्रूफ्रॉक’ अशा विविध नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

अभिनव ग्रोव्हर
अभिनेता, दिग्दर्शक व निर्मिती सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या सुयोग देशपांडे याने ‘सीझन एक्स एपिसोड वाय’, ‘हॅशटॅग’, ‘तळ्यात-मळ्यात’, ‘दशानन’, ‘ती आणि आपण’ या व इतरही नाटकांसाठी काम केले आहे.

अभिनव ग्रोव्हर हा अभिनेता व ‘द ड्रामा स्कूल ऑफ मुंबई’चा माजी विद्यार्थी आहे. त्याने मुंबई, दिल्ली आणि उडुपी येथे प्रायोगिक व व्यावसायिक नाट्यक्षेत्रात काम केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search