Next
‘बाबूजींना भारतरत्न मिळावा’
दिल्लीतही पाठपुरावा करणार असल्याची श्रीधर फडके यांची माहिती
BOI
Thursday, December 27, 2018 | 04:11 PM
15 0 0
Share this story

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक रोड शाखेच्या वतीने ‘बाबूजींच्या आठवणी’ या विषयावर बोलताना ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके.नाशिक : ‘सुधीर फडकेंचा (बाबूजी) शास्त्रीय गायनाचा पाया भक्कम होता. कोणत्याही रागातील गाणे ते भाव ओळखून गात. बाबूजींनी पद्मश्री किताब दोन वेळा नाकारला. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही मागणी रसिकांनी करायला हवी. मीदेखील केंद्र सरकारला विनंती केली आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार, गायक श्रीधर फडके यांनी केले.

बाबूजींचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नाशिक रोड शाखेतर्फे २३ डिसेंबरला श्रीधर फडके यांनी गंधर्वनगरीतील ताराराणी सभागृहात बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड अॅड. नितीन ठाकरे, शिवाजी म्हस्के, आरजे भूषण मतकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

फडके म्हणाले, ‘बाबूजी माणूस म्हणून शिस्तप्रिय, हळवे, परोपकारी होते. रस्त्यावरील गाणाऱ्या भिकारी माणसाला बोलावून त्यांनी त्याचा सत्कार केला, तर दलित महिलेवर अत्याचाराच्या निषेधार्थ त्यांनी उपोषण केले. दादरा नगर हवेली संग्रामात त्यांनी भाग घेतला. पिता म्हणून बाबूजींना मला सर्वांत श्रेष्ठ देणगी दिली असेल, तर ती आहे माणुसकी. नम्रता, प्रेमळपणा, एकोपा आपुलकी आत्मविश्वास सामाजीकरण हे गुण त्यांनी मला दिले.’

‘बाबूजींची आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांची विचारधारा वेगवेगळी होती; मात्र मतभेद कधीच नव्हते. त्यांनी एकमेकांवर कधीच कुरघोडी केली नाही. बाबूजी हिंदुत्ववादी होते; पण जास्त धार्मिक नव्हते. त्यांना कर्मकांड मान्य नव्हते. श्रीरामामुळे देश मुक्त झाला अशी त्यांची धारणा होती. ‘गदिमां’च्या निधनप्रसंगी बाबूजी म्हणाले, ‘मी कोल्हापूरहून पुण्याला आलो नंतर तुम्ही पुण्याला आलात. मी पुण्याहून मुंबईला आलो, नंतर तुम्ही मुंबईला आलात. मग माझ्या आधी कसे निघून गेलात?’ स्वातंत्र्यवीर सावरकर हे बाबूजींचे दैवत होते. त्यांच्यावर चित्रपट काढणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. मोठा संघर्ष करून त्यांनी संकल्प सिद्धीस नेला. चित्रपटाने रौप्यमहौत्सव साजरा केल्यावरच बाबूजींचे निधन झाले. ‘गदिमां’चे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत बाबूजींनी सावरकरांना एकवले तेव्हा सावरकरांच्या डोळ्यांत अश्रू आले होते,’ अशा आठवणी फडके यांनी सांगितल्या.

‘बाबूजींनी १८ हिंदी चित्रपटांना संगीत दिले. ‘खूश हे जमाना आज पहिली तारीख’ या गाण्याला त्यांचेच संगीत आहे; मात्र चित्रपटसृष्टीत स्थैर्य नसल्याने बाबूजींनी मला इंजिनीअर केले. मला गाण्याची आवड नव्हती; पण घरात सतत गाणे कानावर पडत राहिल्याने मी घडत गेलो. संगीत ही निर्मिती असते. ते मनातून उमटते. चाल लावण्यासाठी प्रतिभाशक्ती लागते. हे गुण बाबूजींकडे होते म्हणून त्यांची सर्व गाणी गाजली. गीतरामायण हे शिवधनुष्य आहे. ते गाणे म्हणजे पावित्र्य जपणे होय. गीतरामायण हिंदी, संस्कृती, बंगाली, तेलुगू, कन्नड आदी अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झाले. याचे श्रेय गदिमा-बाबूजींच्या जोडीला आहे,’ असे फडके यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे संयोजन सुदाम सातभाई, प्रसाद पवार, दशरथ लोखंडे, संजय लोळगे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, राहुल बोराडे, महेश वाजे, हर्षल भामरे, सुशांत उबाळे, राधाकृष्ण कुंदे, मंगला सातभाई, रवींद्र मालुंजकर रेखा पाटील, अलका अमृतकर, जयंत गायधनी आदींनी केले. शिवाजी म्हस्के यांनी स्वागत केले. अॅड. ठाकरे यांनी प्रास्तविक, तर प्रशांत केंदळे यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता हिंगेंनी परिचय करून दिला. कामिनी तनपुरे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link