Next
मध्य भारतातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणामध्ये ‘सह्याद्री’चा सहभाग
प्रेस रिलीज
Tuesday, June 11, 2019 | 02:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सच्या टीमने नागपूर येथील न्यू एरा हॉस्पिटलमधील एका २८ वर्षीय रुग्णावर नुकतेच हृदय प्रत्यारोपण केले. हे मध्य भारतातील पहिले हदय प्रत्यारोपण असून, पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील ब्रेनडेड झालेल्या एका ३२ वर्षीय दात्यामुळे या रुग्णाला नवजीवन मिळाले. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांच्या टीममध्ये ह्रदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज, भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, प्रशांत धुमाळ, मुकेश अढेली यांचा समावेश होता.

याबाबत माहिती देताना ‘सह्याद्री’चे ह्रदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. दुराईराज म्हणाले, ‘मला न्यू एरा हॉस्पिटलमधील ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांचा काल फोन आला होता आणि त्यांनी नागपूरमधील रुग्ण आणि ‘केईएम’मधील दात्याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार आम्ही वेळेचे नियोजन करून सात जून २०१९ रोजी सकाळी ७.२० वाजता दात्याच्या शरीरातील ह्रदय काढण्याची प्रक्रिया सुरू केली आणि ती सकाळी १०.३०पर्यंत सुरू राहिली. त्यानंतर पुणे विमानतळावरून एका व्यावसायिक विमानसेवेद्वारे ११ वाजता नागपूरला निघालो आणि साधारण १२.३० वाजता नागपूरला पोहचलो. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरद्वारे केवळ सात मिनिटांत नागपूरमधील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहचलो आणि लगेचच ह्रदय प्रत्यारोपण सुरू केले आणि दुपारी २.३० वाजेपर्यंत ते करण्यात आले. यामुळे गंभीर ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्या या २८ वर्षीय रुग्णाला नवे जीवन मिळाले आहे.’ 

वेळेचे अचूक व्यवस्थापन, केईएम हॉस्पिटलमधील सामाजिक कार्यकर्ते व इतर कर्मचार्‍यांचे प्रयत्न, झेडटीसीसीचा मोलाचा सहभाग, वाहतूक पोलिसांमुळे शक्य झालेला ग्रीन कॉरिडॉर, सह्याद्री हॉस्पिटल्सची असलेली इन हाउस टीम आणि न्यू एरा हॉस्पिटलमधील ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांचे नेतृत्व अशा व्यापक सांघिक कार्यामुळे हे शक्य झाल्याचे डॉ. दुराईराज यांनी सांगितले.

या प्रसंगी बोलताना ‘सह्याद्री’चे युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘सुमारे ७०० किमीच्या अशा प्रवासाला लागणार्‍या वेळेचे अचूक नियोजन, डॉक्टरांची टीम आणि सुविधांची यावेळेस उपलब्धतता ही महत्त्वाची ठरते. त्यामुळे फक्त सह्याद्री हॉस्पिटल्ससाठी नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी या प्रत्यारोपणामध्ये झालेले सांघिक कार्य दिशादर्शक ठरेल. आरती गोखले यांच्या नेतृत्वाखाली झेडटीसीसीतर्फे समन्यवन, केईएम हॉस्पिटलमधील सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य, न्यू एरा हॉस्पिटलचे व्यवस्थापन, वाहतूक पोलीस आणि सह्याद्री हॉस्पिटल्समधील डॉक्टरांची टीम या सर्वांमुळे हे शक्य झाले आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search