Next
पाणी फाउंडेशनतर्फे तिसरी वॉटर कप स्पर्धा जाहीर
प्रेस रिलीज
Monday, January 15, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जनता, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, सेलिब्रिटी, शासन एकत्र आले असून, याद्वारे जलसंधारणाची कामे होतील.  महाराष्ट्रात मोठे परिवर्तन घडविणारे काम होत आहे. वॉटर कप व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून २०१९पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्याकडे वाटचाल करत आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या स्पर्धेसाठी राज्य सरकार सर्व सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने अभिनेता आमीर खान व किरण राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिसरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१८’ स्पर्धा जाहीर केली. या वेळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, रिलायंस फाउंडेशनचे प्रमुख मुकेश अंबानी, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था आदी उपस्थित होते. 

जलसंधारणानंतर पाणीसाठ्याचे बदललेले चित्र

मुख्यमंत्री म्हणाले, ‘पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने सर्वसामान्यांना वेड लावले आहे. एखाद्या कामासाठी झपाटलेली, सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी व त्यातून आनंद घेणारी माणसे असे चित्र पहायला मिळते आहे. या स्पर्धेमुळे स्वावलंबी, एकसंघ झालेली गावे पहायला मिळाली आहेत. लोकचळवळ असेल तर परिवर्तन घडत असते, हे गेल्या दोन वर्षात दिसले आहे. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेला सरकारच्या योजनांची जोड दिल्यास हे परिवर्तन अधिक वेगाने करता येईल.’

उद्योगपती रतन टाटा आणि मुकेश अंबानी यांनी पाणी फाउंडेशनला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल, असे सांगितले.

पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान या वेळी म्हणाले, ‘संपूर्ण महाराष्ट्राचे पाण्याबाबतचे चित्र बदलायचे असेल, तर प्रत्येकाने यासाठी श्रमदान करणे गरजेचे आहे. गावागावात पाणी पोहोचवणे आणि संपूर्ण महाराष्ट्र जलसमृद्ध करणे हेच आपले प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे.’ 


सत्यमेव जयते वॉटर कप ही जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा होय. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थींना पाणी फाउंडेशन पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण देते. त्यानंतरच हे गावकरी स्पर्धेत भाग घेतात. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने, तसेच मशीनच्या साह्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारुन, पाणी साठवण क्षमता निर्माण करतात.

यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये व ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. त्याखेरीज स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांपर्यंत विस्तारली आहे.

निवडलेल्या तालुक्यांतील प्रत्येक गाव स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असून, त्यांना आमीर खान यांच्या सहीचे आमंत्रण पत्र पाठवले गेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वॉटर कप स्पर्धेचा प्रवास व हेतू स्पष्ट करणारे भव्य छायाचित्र प्रदर्शन या सर्व ७५ तालुक्यांत भरवले गेले असून, त्याला लाखो ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. स्पर्धेची प्रवेशिका दोन भागांत आहे. आतापर्यंत साधारणपणे सात हजार दोनशे गावांनी प्रवेशिकेचा पहिला भाग सादर केला आहे. 

अर्जाच्या दुसऱ्या भागात गावाने ग्रामसभा घेऊन पाणी फाउंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या चार दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाच प्रशिक्षणार्थींची निवड करायची आहे. दुसऱ्या भागाची प्रवेशिका पूर्ण करुन पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१८ आहे. निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन पाणी व समृद्धीकरिता आपला प्रवास सुरू करावा, असे आवाहन पाणी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरलेल्या ७५ तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे : 

उत्तर महाराष्ट्र विभाग 
जिल्हा : जळगाव, तालुका : अमळनेर, पारोळा 
जिल्हा : नंदुरबार, तालुका : शहादा, नंदुरबार
जिल्हा : धुळे, तालुका : धुळे, सिंदखेड 
जिल्हा : नाशिक, तालुका : चांदवड, सिन्नर
जिल्हा : अहमदनगर, तालुका : जामखेड, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, कर्जत

पश्चिम महाराष्ट्र विभाग
जिल्हा : सातारा, तालुका : माण, खटाव, कोरेगाव
जिल्हा : सोलापूर, तालुका : सांगोला, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी, माढा, मंगळवेढा
जिल्हा : सांगली, तालुका : आटपाडी, जत, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव
जिल्हा : पुणे, तालुका : बारामती, इंदापूर, पुरंदर

विदर्भ विभाग
जिल्हा : बुलढाणा, तालुका : मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर
जिल्हा : अकोला, तालुका : अकोट, पातुर, बार्शी टाकळी, तिल्हारा
जिल्हा : वाशिम, तालुका : कारंजा, मंगरुळ पीर
जिल्हा : अमरावती, तालुका : धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव 
जिल्हा : यवतमाळ, तालुका : राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा
जिल्हा : वर्धा, तालुका : अर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू
जिल्हा : नागपूर, तालुका : नरखेड

मराठवाडा विभाग
जिल्हा : औरंगाबाद, तालुका : खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर
जिल्हा : बीड, तालुका : केज, धारुर, अंबाजोगाई, अष्टी, परळी वैजनाथ
जिल्हा : उस्मानाबाद, तालुका : कळंब, भूम, परांडा, उस्मानाबाद
जिल्हा : हिंगोली, तालुका : कळमनुरी 
जिल्हा : परभणी, तालुका : जिंतूर
जिल्हा : नांदेड, तालुका : भोकर, लोहा
जिल्हा : जालना तालुका : जाफराबाद
जिल्हा : लातूर तालुका : औसा, निलंगा, देवणी

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kapil naik About
Mere Gaon Mein Pani ki bahut samasya hai Tu Paani Foundation se ek request hai ki help kare . Malkheda ,tal.. Jamner.. district.. Jalgaon
0
0

Select Language
Share Link
 
Search