
परदेशात आज हिंदी बऱ्यापैकी सुस्थापित झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हिंदीतून साप्ताहिक बातमीपत्र, तसेच हिंदीतून ट्विटर खातेही सुरू केले आहे. ‘युनो’च्या संकेतस्थळावर प्रमुख दस्तऐवज हिंदीत उपलब्ध आहेत. इंग्लंड व कॅनडाचे नेते निवडणूक प्रचार करताना हिंदी वापरतात. विश्वाच्या अंगणात हिंदीचा गाडा जोराने धावत असताना देशात मात्र ‘हिंग्लिश’मुळे राष्ट्रभाषेचा दर्जा खालावतो आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या जागतिक हिंदी संमेलनाच्या निमित्ताने विशेष लेख........
‘हिंग्लिश म्हणजे काय? ही कुठून आली? लोकं योग्य हिंग्लिशसुद्धा बोलत नाहीत. कारण ही भाषाच नाही. हिंग्लिश हा केवळ बहाणा आहे. अन् आपण आपल्या मुलांना हिंदी का शिकवू शकत नाही. मला अलीकडे चांगली इंग्रजीसुद्धा बोललेली ऐकू येत नाही,’ प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी याने १५ दिवसांपूर्वी व्यक्त केलेले हे विचार. बाजपेयी आणि आशुतोष राणा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील (बॉलिवूड!) उत्तम हिंदी येणाऱ्या दुर्मीळ अभिनेत्यांपैकी मानले जातात. दोघांचेही आपल्या मातृभाषेवर प्रेम आहे आणि म्हणूनच तिच्या घटत्या दर्जाबाबत त्यांना तळमळही आहे. एरव्ही म्हणायला हिंदी चित्रपटसृष्टी असली, तरी बॉलिवूड ही आता बऱ्यापैकी आंग्लाळलेल्या लोकांची मिरासदारी झाली आहे. त्यांमध्ये बाजपेयी व राणा म्हणजे भांगेतील तुळसच!
जे चित्रपटांच्या बाबतीत तेच माध्यमांच्या बाबतीत. हिंदी भाषेतील वृत्तपत्रे आणि वाहिन्या ही भ्रष्ट भाषांची उदाहरणे बनली आहेत. खासकरून वृत्तवाहिन्यांच्या भाषेचा दर्जा अत्यंत खालावला आहे (अन् दुर्दैवाने आपल्या मराठी वाहिन्यांनी त्यांच्या भ्रष्टतेचे आणखी भ्रष्ट अनुकरण करण्याचा विडा उचलला आहे). त्यामुळे हिंदीच्या प्रादेशिक बोलीभाषांचे महत्त्व कमी होत असल्याचे हिंदी भाषकांना जाणवत आहे. या वाहिन्यांनी हिंग्लिश हीच आपली भाषा बनविली आहे आणि राष्ट्रीय भाषा म्हणून तिची प्रतिष्ठापना करण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे एकीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का नाही, म्हणून डोकेफोड होत असताना त्या हिंदीला धक्का देणारी तिची सवत आली आहे. अन् या पार्श्वभूमीवर भारत सरकार हिंदीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती, त्या वेळी त्यांनी धडाक्याने काही गोष्टी केल्या होत्या. त्यातील एक गोष्ट होती हिंदीच्या प्रसाराला उत्तेजन देणे. सोशल मीडियावर हिंदीचा वापर वाढविण्याची आपल्या सहकाऱ्यांना केलेली सूचना असो किंवा हिंदी सप्ताहाची कठोर अंमलबजावणी करण्याचा फतवा असो, अशा अनेक गोष्टी त्यांनी रेटून नेल्या होत्या. त्यावर साहजिक प्रतिक्रियाही उमटल्या आणि तमिळनाडूतील द्रविड पक्षांसारख्या अनेकांनी आपल्या ठेवणीतील हिंदी विरोधही त्यानिमित्त बाहेर काढला होता. त्यानंतर सुशासनाच्या मोदी यांच्या आश्वासनांवर आणि त्यांच्या परदेशी दौऱ्यांवरच प्रसिद्धीचा झोत फिरत राहिला आणि हिंदीच्या प्रसारासाठीच्या त्यांच्या पावलांकडे फारसे कोणासे लक्ष जाईनासे झाले. हिंदीचे कामचलाऊ ज्ञान असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचे सगळे कामकाज हिंदीतच करण्यास समर्थ बनवावे, यासाठी केंद्राने एक अभ्यासक्रम तयार केला असून, ‘पारंगत’ असे नाव त्याला दिले आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचाही हिंदीच्या वापरावर कटाक्ष आहे. तीन वर्षांपूर्वी दहाव्या विश्व हिंदी संमेलनाच्या संकेतस्थळाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या, की एखादा परदेशी प्रतिनिधी त्यांच्याशी बोलतो, त्या वेळी त्या इंग्रजीत बोलतात. परंतु एखादा चिनी प्रतिनिधी चिनी भाषेत किंवा जपानी प्रतिनिधी जपानी भाषेत बोलत असेल, तर त्या हिंदी भाषेतच बोलतात. वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाला परकीय भाषेतून हिंदी भाषेत अनुवादक तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. एवढेच कशाला, परराष्ट्र खात्यात स्वतंत्र हिंदी विभाग काढून त्याच्या प्रमुखपदी आयएफएस सेवेतील सहसचिवाला नेमले आहे.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात परत झालेले
जागतिक हिंदी संमेलन. यंदाचे हे हिंदी संमेलन मॉरिशस येथे झाले. अशा प्रकारचे हे अकरावे संमेलन होते आणि १८ ते २० ऑगस्ट असे तीन दिवस ते चालले. या संमेलनाच्या सांगता सत्रात बोलताना मॉरिशसचे मार्गदर्शक मंत्री अनिरुद्ध जगन्नाथ म्हणाले,
‘मॉरिशस पुत्र आहे आणि भारत आई आहे. हा पुत्र मॉरिशस संयुक्त राष्ट्रात हिंदी भाषेला तिची ओळख मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडील. अन्य भाषांप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदीला तिचे स्थान मिळण्याची वेळ आली आहे. भारताला आम्ही माता म्हणतो त्यामुळे या नात्याने मॉरिशस हा पुत्र होतो. अन् हा पुत्र मॉरिशस आपले कर्तव्य पुरेपूर जाणतो.’
केंद्र सरकारने जागतिक हिंदी सचिवालयाच्या स्थापनेसाठी मॉरिशसचीच निवड केली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सचिवालयाची पायाभरणी केली होती. हाच धागा पकडून या संमेलनात परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी विश्वास व्यक्त केला, की हिंदी अत्यंत गुपचूपपणे विश्व भाषा बनली असून, आपल्याला जे दिसत नाही ते संपूर्ण देश पाहत आहे. ‘जगातील अनेक देशांतील विमानतळांवर टीव्हीवर हिंदी चित्रपट, हिंदी मालिका पाहायला मिळतात. बगदाद आणि दमिश्क येथे मला हा अनुभव आला आहे. मॉरिशसमध्येही हिंदीचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतो,’ असे ते म्हणाले.

या संमेलनाचे उद्घाटन करताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या,
‘विविध देशांमध्ये हिंदीला वाचविण्याची जबाबदारी भारताने उचलली आहे. भाषा आणि संस्कृती या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. भाषेला वाचविण्याची, तिला पुढे नेण्याची आणि तिची शुद्धता टिकविण्याची आज गरज आहे.’
याचाच अर्थ बाजपेयी आणि त्यांच्यासारखे हिंदीप्रेमी स्वदेशातील हिंदीच्या स्थितीबाबत चिंतातुर झालेले असताना विश्वाच्या अंगणात हिंदीचा गाडा जोराने धावत आहे. परदेशात आज हिंदी बऱ्यापैकी सुस्थापित झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हिंदीतून साप्ताहिक बातमीपत्र सुरू केले आहे. हे बातमीपत्र प्रत्येक शुक्रवारी प्रसारित होते. त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून ते दररोज करण्यात येईल, अशी शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने
हिंदीतून ट्विटर खातेही सुरू केले आहे. तसेच ‘युनो’च्या संकेतस्थळावर प्रमुख दस्तऐवजही हिंदीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इंग्लंड व कॅनडाचे नेते निवडणूक प्रचार करताना हिंदी वापरतात.
चालू महिन्यात या संदर्भात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पहिली म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पहिल्यांदाच हिंदीतून मांडणी केली. भारतातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमेरिकेच्या या महिला प्रवक्त्यांनी हिंदीतून सुरुवात केली. त्यासाठी विषयही कोणता, तर पाकिस्तानातील निवडणुकीचा! ‘पाकिस्तानातील निवडणुकीच्या निकालांची अमेरिकेला जाणीव आहे. या निवडणुकीत काही सकारात्मक पावले उचलण्यात आली, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे त्यात उल्लंघन झाले,’ असे या प्रवक्त्यांनी सांगितले... हिंदीतून अन् तेही एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना!
दुसरी घटना पहिल्या घटनेचाच पुढचा भाग होती. ती म्हणजे या मंत्रालयाने थेट
हिंदीतून ट्विटर खाते सुरू केले. ‘यह अमरीकी विदेश विभाग का आधिकारिक ट्विटर हैंडल है, जो अंतरराष्ट्रीय संबंध पर सरकार की स्थिति व्यक्त करने के लिए समर्पित है,’ असे या खात्याच्या माहितीत लिहिले आहे.
ही एक ऐतिहासिक घटना होती. अशा प्रकारे हिंदीला जागतिक पातळीवर मान्यता मिळणे हे कोणत्याही भारतीयासाठी अभिमानास्पद असायला हवे. परंतु देशात हिंग्लिशच्या नावाखाली हिंदीची कत्तल होऊ नये, हीसुद्धा चिंता आहे. ‘पारिजात फुलला दारी, फुले का पडती शेजारी’ अशी सत्यभामेची तक्रार होती. हिंदीचा पारिजात आज इतरांच्या अंगणात फुलताना दिसतो. त्याची फुले आपल्या अंगणात कधी पडतील, ही खरी आपली चिंता असायला हवी!