Next
सभ्य गृहस्थहो!
BOI
Tuesday, November 20, 2018 | 05:24 PM
15 0 1
Share this article:

५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीत १९ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘सभ्य गृहस्थहो’ हे नाटक सादर झालं. जयवंत दळवी यांनी लिहिलेलं हे नाटक गुहागरच्या कलाविकास रंगभूमीच्या कलाकारांनी सादर केलं होतं. उदय सावरकरांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेलं या नाटकाचं हे परीक्षण...
..............
साठच्या दशकात मुंबईतली चाळ संस्कृती आणि पुण्यातली वाडा संस्कृती ऐन बहरात होती. चाळीतली किंवा वाड्यातली भाडेकरू मंडळी साधारणपणे समान वर्गातली असत. म्हणजे कधी ती मध्यमवर्गीय पांढरपेशा समजाची, तर कधी श्रमजीवी गिरणी कामगार अशा प्रकारची. अशा एका चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय पांढरपेशा मंडळींच्या जीवनात आलेल्या एका छानशा वादळाची कथा राज्य नाट्य स्पर्धेतल्या ‘सभ्य गृहस्थहो’च्या प्रयोगातून सोमवारी (१९ नोव्हेंबर २०१८) सादर झाली. या नाटकाचे लेखक होते जयवंत दळवी. गुहागर येथील कलाविकास रंगभूमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं उदय सावरकर यांनी.

पडदा उघडल्यापासून प्रेक्षकांना हसवण्याचं काम करणाऱ्या या नाटकात ११ पात्रं प्रत्यक्ष रंगमंचावर येतात. त्यात एक चांगला गुटगुटीत घरमालक आहे. अगदी काही मिनिटंच येऊन जाणारा आणि फक्त एकच वाक्य तोंडी असणारा मालकाचा हरकाम्या नोकर आहे, आणि जिच्याभोवती हे सार नाटक अडीच तास फिरत राहतं, ती चंद्रिका नावाची युवती अगदी पडदा पडण्यापूर्वी पाच-सहा मिनिटांच्या भूमिकेत आहे. उरलेल्या आठांपैकी तीन जोडपी, एका जोडप्याचा मुलगा गोपीनाथ आणि ज्याची पत्नी प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाही असा एक विवाहित अशी मंडळी आहेत. यांपैकी गोपीनाथ या १७ वर्षांच्या मुलाचे वडील गजाभाऊ गोखले आहेत सचिवालयातले अधिकारी. त्यांच्या शेजारचे पोस्टमास्तर आहेत. वरच्या मजल्यावर डॉक्टर आणि सौभाग्यवती मुसळे राहतात आणि त्यांच्या शेजारी जोशी हे शाळामास्तर राहतात.

यांच्या चाळीत चंद्रिका नावाची युवती रहायला येते. अर्थातच सगळ्या पुरुषांच्या नजरा तिच्याकडे. मग त्यांचं गॅलरीत उभं राहणं वाढतं. आयुष्यात कधी ‘साऽ’ही न उच्चारलेल्यांना एकदम ‘चंद्रिका...ही जणू’ सारखं गावंसं वाटतं. रेडिओवरसुद्धा नेमकी ‘सखी, शेजारिणीऽऽ’ सारखी गाणी लागतात. आणि हे सगळं होताना नेमक्या त्यांच्या ‘सौ’ त्या त्या वेळी अचानक प्रकट होऊन दोन्ही हात कमरेवर घेऊन उभ्या राहतात. मग यांची भंबेरी!

त्यातच डॉक्टर मुसळे प्रौढांसाठी शक्तिवर्धक शक्तिवर्धक कंदर्पपाकाचे डबे आणतात. एकदा एक अंबाड्याचं गंगावन सापडतं. त्यावरून गृहिणीवर्गात पुन्हा प्रक्षोभ! असा सगळा मध्यमवर्गीय हास्यरस!! 

या अर्धा वयाच्या पुरुषांची इष्कबाजी पाहून गोखल्यांचा गोपीनाथ छान गंमत करतो. एक प्रेमपत्र लिहून त्याच्या चार कार्बन कॉप्या काढतो. चार पत्रं या चौघांना आणि एक घरमालकाला अत्तर लावलेल्या पाकिटातून पाठवून देतो. ती पत्रं मिळताच ‘बोल राधा बोल संगम’ हे गीत प्रत्येकाच्या ओठांवर येतं; विशिष्ट अत्तराचा घमघमाट प्रत्येकाच्या घरातून येऊ लागतो, पुन्हा एकदा गृहिणींचा प्रक्षोभ......! 

मग ‘त्या’ बाईला चाळीतून काढून टाकण्यासाठी हे चौघे शिष्टमंडळ घेऊन मालकाच्या घरी जातात. तिथंही तोच सुगंध, मालकांच्या ओठांवर तीच गाणी.... अरेच्या! शेवटी तिला काढून टाकणं दूरच. अविवाहित घरमालक तिच्याबरोबर लग्न करून मोकळा होतो! 

त्यानंतर आपापल्या नवऱ्यावर सगळ्या गृहिणी विश्वास प्रकट करतात. इतक्यात चंद्रिकेच्या रिकाम्या झालेल्या खोलीत दोन-तीन स्त्रिया बिऱ्हाडकरू म्हणून येतात. त्यांना पाहायला पुन्हा सगळे पुरुष गॅलरीत! 

हलक्याफुलक्या... पण सर्वव्यापी विषयावरचं हे नाटक पूर्ण वेळ प्रेक्षकांना हसवत ठेवतं. ‘कलाविकास’च्या चमूनं ते ताकदीनं सादर केलंय. ५० वर्षांपूर्वीची मध्यवर्गीय पांढरपेशी जोडपी, त्यांची वेशभूषा, बोलणं-चालणं या गोष्टी या माध्यमातून परिणामकारक आणि वास्तव बनवल्यात. 

चाळीचा देखावा उभं करणारं नेटकं नेपथ्य आणि साजेसं, आवाजांची पातळी नेमकी राखणारं पार्श्वसंगीत या गोष्टी लक्षात येतात; मात्र प्रवेश बदलतात तेव्हा अंधारात करावयाची मांडामांड प्रेक्षकांच्या लक्षात येऊ न देण्याचं कसब नेपथ्यकारांना साधलेलं दिसत नाही. 

(२० नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सात वाजता पु. ल. देशपांडे लिखित ‘सुंदर मी होणार’ हे नाटक रत्नागिरीतली ‘खल्वायन’ ही संस्था सादर करणार आहे. संपूर्ण वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा. अचानक’ या नाटकाचे परीक्षण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search