Next
डॉ. पठाण यांचा अभीष्टचिंतन कार्यक्रम उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, July 06, 2019 | 12:48 PM
15 0 0
Share this article:


पुणे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. एस. एन. पठाण यांच्या वयाच्या सत्तरीपूर्तीनिमित्त पुण्यात आयोजित केलेला अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात झाला. दिग्गज शिक्षणतज्ज्ञांच्या जीवन शिक्षणविषयक चिंतनामुळे हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला.

हा कार्यक्रम चार जुलैला पुणे कॅम्पमधील अल्पबचतभवन सभागृहात सायंकाळी सहा वाजता झाला. या सोहळ्याला  राज्यभरातून शिक्षणक्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. याच कार्य्रक्रमात कृष्णा मेडिकल अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे ‘आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून  भारतीय शिक्षणपद्धती’ या विषयावर व्याख्यान झाले; तसेच ‘समृद्ध मातृभूमी’ या मासिकाच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. सर्जेराव निमसे, एन. सी. जोशी, पं. वसंत गाडगीळ, डॉ. संजय अडसूळ, मौलाना मुफ्ती शाकीर खान, लतीफ मगदूम हे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतील यशस्वी प्रेरणादायक व्यक्तिमत्वांचा सत्कार या कार्य्रक्रमात करण्यात आला. यात जिल्हाधिकारी अय्याझ तांबोळी, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, डॉ. तौसिफ मलिक, गीतांजली शेळके, डॉ. संजीव खुर्द, मारुती भांडकोळी, आकांक्षा चव्हाण यांचा समावेश होता. ग्लोबल हेल्थकेअर अँड एज्युकेशन फाउंडेशन, महा फेडरेशन ऑफ मायनॉरिटीज एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘शिक्षण हेच या देशाच्या प्रगतीचे माध्यम आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याची क्षमता शिक्षणात आहे. हे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम डॉ. एस. एन. पठाण यांनी केले. ते समाजाला प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहेत. समता, समवेदना आणि समानुभूती या महान व्यक्तींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया या वेळी सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली. 

या प्रसंगी बोलताना डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘डॉ. पठाण यांनी कर्तृत्त्वातून किमया करून दाखवली. शिक्षण हे व्यक्ती, समाज आणि देशाचा विकास करते. शिक्षण हा प्रगतीचा प्राणवायू आहे. पठाण यांचा सत्कार हा शिक्षण मार्गाचा सत्कार आहे. शिक्षणाची गुणवत्ता विकसित झाली, तरच देशाचा विकास होईल.’

डॉ. कराड म्हणाले, ‘डॉ. पठाण हे पवित्र कुराणाचा संदेश आहे. त्यांचे अंत:करण शुद्ध आहे. जगात धर्माच्या नावावर हिंसाचार फोफावत असताना शुद्ध माणुसकीची जपणूक करणारी डॉ. पठाण यांच्यासारखी माणसे हवी आहेत.’

डॉ. इनामदार म्हणाले, ‘स्वातंत्र्योत्तर काळात जी प्रगती झाली, ती पाच हजार वर्षें झाली नव्हती. आपला भूतकाळ चांगला असल्याने, वर्तमानात कष्ट करीत असल्याने भविष्यकाळ उत्तम आहे. कष्टातून पुढे आलेल्या व्यक्तींमुळे जग घडत असते. डिजिटल दरीमुळे होणाऱ्या दुष्परिणामातून हे जग बाहेर काढण्याचे प्रयत्न आता जुन्या जाणत्यांनी केले पाहिजेत.’
 
डॉ. पठाण म्हणाले, ‘माझ्या कष्टाची फुले झालेली आहेत. मन साफ असल्याने प्रवासात ईश्वराची मदत मिळाली. भारतीय संस्कृतीने मला मोठे केले. त्या संस्कृतीचा विश्वात्मक संदेश पुढे नेण्याचे काम करीत राहीन.’

डॉ. सर्फराज पठाण यांनी प्रास्ताविक केले. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. जी. पठाण यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search