मुंबई : ‘राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा अहवाल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्य सरकारला सादर केल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’ असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ‘भाजप’ सरकारने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ‘भाजप’ सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘भाजपने २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर दोनच महिन्यात ‘भाजप’ सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा विधिमंडळात मंजूर केला; पण त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात मंजूर होण्यासाठी भाजप सरकारने अनेक पुरावे गोळा केले व अडीच हजार पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले; तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून आयोगाकडून या विषयातील अहवाल सादर होईल यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा केला. या सर्वांचा परिणाम म्हणून आयोगाचा अहवाल गुरुवारी सादर झाला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक फार महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला.’
‘मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी ‘भाजप’ सरकारने राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे व त्याचा लाभ लाखो विद्यार्थ्यांना झाला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची योजना सुरू झाली आहे. त्या सोबतच मराठा समाजातील तरुणांनी व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे,’ अशी माहिती दानवे यांनी या वेळी दिली.