Next
रमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग सात (खेड, मंडणगड)
BOI
Wednesday, June 12, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:‘करू या देशाटन’
सदरात आज रत्नागिरी जिल्ह्याबद्दलचा शेवटचा भाग. त्यात पाहू या खेड व मंडणगडच्या आसपासची ठिकाणे....
.............
सह्याद्रीचे खरे स्वरूप पाहायचे असेल, तर खेडला जायलाच हवे. खेडच्या पूर्वेस महाबळेश्वरपासून पाटणपर्यंत सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण दोन समांतर रांगा आहेत. त्यातच कोयनेचे खोरे आहे. सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस येथे पडतो. घनदाट जंगल, उत्तुंग कडेकपाऱ्या, त्यात दडलेले किल्ले यांमुळे ट्रेकर्सची पावले इकडे वळणारच. सावित्री नदी ओलांडली, की रायगड जिल्हा सुरू होतो. मंडणगडची उत्तर सीमा सावित्री नदी आहे. या नदीत मगरींचे अस्तित्व आहे. 

खेडची लेणी

इ. स. २०० ते इ. स. ३०० म्हणजे साधारण १७०० वर्षांपूर्वी या परिसरात बौद्ध वस्ती असल्याच्या खुणा खेडजवळ लेणी सापडल्यामुळे दिसून येतात. मंडणगड परिसरातील मंदिरात असलेल्या मूर्ती शैव व वैष्णव मंदिरातील मूर्ती ८०० वर्षांपूर्वीच्या आहेत. शिलाहार राजवटीनंतर आदिलशाही, त्यानंतर जंजिऱ्याचा सिद्दी, नंतर मराठे, नंतर इंग्रज अशा राजवटी या भागाने पाहिल्या. हा परिसर जणू सह्याद्रीच्या कुशीतच विसावल्यासारखा आहे. बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन होते. लाल माती आणि सदाहरित वृक्षांनी हा प्रदेश खुलून दिसतो. खेड हे जणू दापोलीचे प्रवेशद्वाराच आहे. मुंबई-गोवा महामार्ग येथून जातो. त्यामुळे दळणवळणाची कमतरता नाही. वनसंपदेचे जवळून दर्शन घ्यायचे असेल, तर खेडच्या आसपास असलेल्या सह्याद्री परिसराला भेट द्यायलाच हवी. 

खेडची लेणी

खेडची लेणी

खेड :
हे मुंबई-गोवा महामार्गावरील एक प्रमुख ठिकाण असून, रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसलेला हा तालुका आहे. येथील जगबुडी नदीमध्ये गोड्या पाण्यातील मगरींचे अस्तित्व आहे. खेड येथील लेणी प्राचीन असून, बौद्धकालीन शिल्पांशी साम्य असलेली ही लेणी खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. लेण्यांचे काम अर्धवट असून, त्यामधे दोन स्तंभ, एक अर्धस्तंभ आणि एक चैत्य आहे. लेण्यांमध्ये तीन कक्ष असून, खूप पूर्वी ही लेणी वाटसरूंसाठी विश्रांतीस्थान म्हणून वापरत असत. रसाळगड, महिपतगड, सुमारगड, पालगड, महिमंडणगड असे अनेक डोंगरी किल्ले जवळपास आहेत. 

सुसेरी : हे खेडजवळ असलेले गाव फारसे परिचित नाही; पण येथे २०० वर्षांपूर्वीचा साठे यांचा एक चौसोपी वाडा आहे. साठे वाईचे होते. यांच्या पूर्वजांनी पेशव्यांकडे दस्त भरून त्या गावाची खोती मिळविली. तेथे त्यांनी भव्य वाडा बांधला. नदीच्या बाजूने वाड्यापर्यंत रस्ता आहे. वाड्याला मोठी दिंडी आहे. वाड्याजवळ पूर्वी पागाही होती. तसेच मोठी विहीरही असून, विहिरीच्या पाण्यापर्यंत जाता येईल, असे भुयारही आहे. वाडा आता पडक्या अवस्थेत आहे. साठे यांचे दोन वाडे होते. त्यातील एक वाडा त्यांनी कालांतराने मोडक यांना विकला. तो वाडा आता अस्तित्वात नाही. हा वाडाही फार दिवस तग धरेल असे वाटत नाही. येथे डागडुगजी करून छान पर्यटनस्थळ होऊ शकेल. नवीन फ्लॅट संस्कृतीत वाढणाऱ्या पिढीला गतवैभवाची ओळख त्यातून होऊ शकेल. 

सवाई माधवराव यांच्या पत्नीचे हे माहेर. या घराण्याचा इतिहासही रोचक आहे. या कुटुंबातील भास्करराव साठे हे पानिपतच्या मोहिमेसाठी विश्वासरावांच्या फौजेसोबत १७६१ साली उत्तरेत गेले. पानिपतच्या पराभवानंतर सैन्याची पांगापांग झाली. साठे जीव मुठीत घेऊन जम्मूजवळच्या रामगड येथे पोहोचले. तिथे महाराज रणजितसिंह यांना भेटले. त्यांच्या आदेशानुसार तेथील शिवमंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक म्हणून राहिले. त्यांच्या पुढच्या पिढ्या मात्र लष्करात रमल्या. महादेवभटांचे नातू सोनूसिंग हे ब्रिटिश फौजेत लेह लडाख सीमेवर लेफ्टनंट होते. त्यांच्या पुढच्या पिढ्या काश्मीरच्या राजाकडे लष्करात तैनात होत्या. त्यांच्यापैकी कर्नल साठे हे पुण्यात असतात. ते उत्सवाच्या निमित्ताने येथे येतात. 

लोटे : येथे औद्योगिक वसाहत असून, रासायनिक उद्योग आहेत. ‘नोसिल’सारखा कीटकनाशकांचा बहुराष्ट्रीय उद्योगही येथे आहे. ही वसाहत चिपळूणजवळ आहे. 

जगबुडी नदी

नारिंगी नदीजगबुडी नदी : दर वर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो. खेड परिसरातील या नदीत मगरींचे वास्तव्य आहे. ही नदी वाशिष्ठी नदीला जाऊन मिळते. जगबुडीला मिळणारी नारिंगी नदीही खेडजवळून वाहते. 

रघुवीर घाट : सातारा व महाबळेश्वर या ठिकाणांना खेड-दापोलीशी जोडणारा रघुवीर घाट म्हणजे निसर्गप्रेमींसाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे. पावसाळी पर्यटनाची ओढ असलेल्या पर्यटकांना वेड लावणारा हा घाट काही दिवसांनी गजबजून जाणार आहे. सध्या खेड-उचाट-आकल्पे असा रस्ता वाहतुकीसाठी चालू असून, एसटी व खासगी वाहतूक चालू आहे. घाटाची रुंदी अधिक असणे गरजेचे वाटते. तसेच संरक्षक कठडे मजबूत हवेत. अर्थात अजूनही कामे चालू आहेत. महाबळेश्वरला जोडणारा पूलही पूर्ण झाला आहे. त्यामुळे पोलादपूरऐवजी या घाटातून खेड-दापोलीला जाणे सुलभ होणार आहे. 

रघुवीर घाट

कोयनेच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये खेड तालुक्यातील वडगाव, कांदोशी आणि बिरमणी या गावांचा बफर झोनमध्ये समावेश झाला असून, जंगलात श्वापदांचा वावर मुक्तपणे पाहायला मिळतो. रघुवीर घाटाचे काम साधारण १९९०च्या सुमारास चालू झाले. अनेक अडचणींवर मात करून घाटाचे काम चालूच आहे. छोट्या गाड्यांतून हौशी लोक या घाटातून प्रवास करीत आहेत. खोल दरी आणि नागमोडी वळणांच्या या घाटातून प्रवास करताना काळजाचा ठोका चुकतो. 

या घाटातील रस्ता प्रचंड पावसामुळे सतत नादुरुस्त होत असतो. या परिसरातच खेडच्या जगबुडी नदीचा उगम आहे. त्यामुळे येथे पडणाऱ्या पावसाची कल्पना वाचकांना येईलच. या घाटावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. बिजघर येथील ३७५ वर्षांपूर्वीचे पुरातन शंकर-पार्वती-काळकाई-मानाई स्वयंभू देवस्थान, बिजघरचे साईबाबा मंदिर, खोपी येथील श्रीराम मंदिर, पायथ्याच्या बाजूकडे दिसणारे शिरगाव पिंपळवाडी धरणातील पाणी, माथ्यावर घनदाट जंगल, कोयनेचा विस्तीर्ण जलाशय, मधुमकरंदगड, फेसाळत येणारे धबधबे असे सगळे चित्र आहे. ऐन पावसाळ्यात येथे मिळणारा ढगातून जाण्याचा अनुभव घ्यायलाच हवा. 

लाल खेकडे हे येथील विशेष आकर्षण आहे. १२ किलोमीटर लांबीच्या या घाटातील प्रवास लक्षात राहील असाच आहे. कोयना जलाशयामुळे संपर्क तुटलेले चकदेव-शिंदी भागातील ग्रामस्थ पूर्वी खेडला येण्यासाठी शिड्यांचा वापर करून खाली येत असत. 

खोपी येथील राम मंदिर

खोपी :
या गावाच्या पुढेच रघुवीर घाट चालू होतो. या गावात सुंदर राम मंदिर आहे. जवळच्या शिरगावजवळ एक छोटे धरण असून, त्यामुळे या भागाचे सौंदर्य अधिक वाढले आहे. रघुवीर घाटातून याचे विहंगम दृश्य दिसते.

रसाळगड

रसाळगड :
हा गड पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. जुना दरवाजा पूर्णपणे उतरवून आता तिथे नवीन दरवाजा बांधला आहे. या उत्तराभिमुख दरवाज्यातून पायऱ्या चढून जाताना वाटेत हनुमानाची मूर्ती दिसते. शौर्याचे प्रतीक असलेला खंजीर या मूर्तीच्या कमरेला असून, मूर्तीच्या ओठावर मिशीदेखील आहे. गडावरील झोलाई मंदिराच्या मागे तटावर ब्रिटिश बनावटीच्या दोन तोफा आहेत. झोलाई मंदिराचा परिसर रम्य आहे. मंदिरात झोलाई देवी, शिव-पार्वती, भैरव, नवचंडी अशा अनेक मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. मंदिरासमोर भव्य दीपमाळ असून, तेथून पुढे गेल्यावर पूर्व टोकाकडे वैशिष्ट्यपूर्ण असे पाण्याचे टाके आहे. टाक्याजवळ एक तोफ असून टाक्याच्या खांबावर श्री गणेशाची प्रतिमा आणि उत्तम कोरीव काम केलेले आढळते. या खांबांच्या कोरीव कामावरून हे टाके किल्ला बांधायच्या आधीपासून अस्तित्वात असावे असे म्हणतात. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत रसाळगड दुरुस्त केला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. गडावर मोठी लढाई किंवा एखादी ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद नाही. 

रसाळगडावरील हनुमानाची मूर्ती

पावसाळ्यात भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी रसाळगड हे एक उत्तम ठिकाण आहे. गर्द धुक्याने वेढलेला गड अधिकच सुंदर दिसतो. किल्ला पाच एकरावर पसरलेला आहे. गडाच्या माथ्यावरून पूर्वेकडे सह्याद्रीची लांबवर पसरलेली रांग, पश्चिमेकडे पालगड, दक्षिणेकडे जगबुडी नदीचे खोरे, मधुमकरंदगड असा परिसर नजरेत भरतो. इथूनच पुढे सुमारगड, महिपतगड अशी सफरही करता येते. 

सुमारगड : रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्यभागी असणारा हा किल्ला फक्त ट्रेकर्ससाठीच आहे. आजूबाजूला फक्त जंगलच आहे. मानवी वस्ती आसपास कोठेही नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी व गुहा आहे. गडावर राहण्याची, जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय बारमाही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी महिपतगडामार्गे अडीच तास लागतात. 

महिपतगड : ३०९० फूट उंचीवरील हा किल्लाही फक्त ट्रेकर्सनाच जाण्यासारखा आहे. खेड तालुक्याच्या पूर्व बाजूस १८ किलोमीटरवर रसाळगड-सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. यातील उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वांत उंच आणि विस्ताराने मोठा असलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे. तुटलेल्या कड्यामुळे नैसर्गिक तटबंदी झाली आहे. पारेश्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या किल्ल्यातील पठार जंगलाने वेढलेले आहे. 

पालगड येथील तोफ

पालगड : साने गुरुजी यांचे हे गाव. पालगड हे दापोली तालुक्यातील एक छोटेसे टुमदार गाव आहे. गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पालगड किल्ला आहे. साने गुरुजी यांचा जन्म पालगड येथे झाला. त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळतो. आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. पालगड गावात इ. स. १८९६ साली बांधलेले गणपती मंदिर आहे. हे गाव दापोली तालुक्यात असले, तरी खेडला जवळ आहे. 

आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकआंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मूळ गाव. त्यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. मंडणगडपासून हे गाव १८ किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर रम्य असून, स्मारक परिसरात व वास्तूमध्ये बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. 

मंडणगड : मंडणगड गावातील एसटी स्थानकापासून किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. हा रत्नागिरीतील सर्वांत प्राचीन किल्ला आहे. किल्ल्यावर वरपर्यंत वाहन जाण्यासाठी उत्तम डांबरी सडक आहे. राजा भोज याच्या कारकिर्दीत या किल्ल्याची उभारणी (१२व्या शतकात) झाली असावी. किल्ल्यावरील वास्तूंची पडझड झाली आहे. आजही त्याचे काही अवशेष गडावर दिसून येतात. किल्ल्यावर दोन सुंदर तलाव असून, त्यांच्या भोवती कुलपाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण दगड आहेत. तिथे असलेली कबर ही शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सेनानी दर्यावर्दी दौलतखान यांची असावी असे म्हणतात. आठ एकर क्षेत्रावर या किल्ल्याचा विस्तार आहे. मंडणगडला वरंधा घाटातून थेट जाता येते पुणे-शिरवळ-वरंधा-शिवथर मार्गे मुंबई-गोवा महामार्ग चौकातच ओलांडून जाता येते. 

मंडणगड

१६६१ साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदाराच्या ताब्यात होता. विशाळगडाच्या लढाईत जसवंतराव आदिलशहाकडून लढत होता. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवी आपली जहागिरी व मंडणगड सोडून शृंगारपूरला पळून गेला. महाराजांना हा किल्ला न लढताच मिळाला. काही काळ हा किल्ला सिद्दी व नंतर आंग्र्यांकडे होता. १८१८ साली इंग्रजांनी तो जिंकला. 

श्री केशरनाथ

मंडणगड - कुलपाच्या आकाराचे  दगडशेडवईचे श्री केशरनाथ मंदिर : कोकणात दिवेआगरपासून सिंधुदुर्गापर्यंत विष्णूच्या अनेक मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. अशीच एक मूर्ती श्री केशरनाथ नावाने मंडणगड तालुक्यात शेडवई येथे आहे. हे ठिकाण पर्यटकांपासून दुर्लक्षित आहे. शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी कोकणात अशी भरपूर ठिकाणे आहेत. शेडवईला साडेतीन फूट उंचीची श्री केशरनाथाची अप्रतिम अशी सालंकृत (विष्णुरूप) मूर्ती दिसते. या मूर्तीचा रंग थोडासा हिरवी झाक असलेला आहे. मूर्तिशास्त्रानुसार या मूर्तीच्या हातात पद्म-शंख-चक्र-गदा अशी आयुधे असल्यामुळे ती केशवाची मूर्ती समजली जाते. मूर्तीच्या डाव्या बाजूला लक्ष्मी आहे, तर उजवीकडे गरुडशिल्प दिसते. शेडवई मंदिर परिसर अत्यंत रम्य आहे. भरपूर झाडी, बाजूलाच असलेला बारमाही वाहणारा ओढा, नीरव शांतता आणि इथे आढळणारे विविध जातींचे पक्षी यामुळे वनविहार होतो. 

कसे जाल खेडला?
खेडला रेल्वे स्टेशन आहे. जवळचा विमानतळ - पुणे १८२ किलोमीटर. मुंबई - २२७ किलोमीटर. खेड हे मुंबई-गोवा महामार्गावरच आहे. भरणा नाक्यावरून खेडला जाण्यासाठी फाटा फुटतो. वरंधा घाट, कुंभार्ली घाट या मार्गांनीही जाता येते. राहण्यासाठी चांगली हॉटेल्स येथे आहेत. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जाता येते. 

(या लेखातील काही फोटो ratnagiritourism.in या वेबसाइटवरून घेतले आहेत.)

- माधव विद्वांस

ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sulbha Wagh About 124 Days ago
Very nice and important Information
0
0
Pankaj Patil About 125 Days ago
नमस्कार माधव विध्वंसजी, आपलं सदर अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे!
1
0

Select Language
Share Link
 
Search