Next
ज्येष्ठ नागरिक ठेव योजना
BOI
Saturday, March 10 | 03:45 PM
15 0 0
Share this story

बँका, पोस्टातील गुंतवणुकीवरील ठेवींवरील व्याजाचे दर, जास्त व्याजदर देणाऱ्या खासगी संस्थांमधील गुंतवणुकीच्या सुरक्षेची जोखीम या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी ‘ज्येष्ठ नागरिक ठेव योजना’ सरकारने आणली आहे. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात....
........
सुमारे दीड वर्षापासून, विशेषत: निश्चलनीकरणानंतर ठेवींवरील व्याजाचे दर वेळोवेळी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही चिंतेची बाब झाली आहे. या वयात जास्त जोखीम घेणेसुद्धा योग्य वाटत नाही. ‘डीएसकें’सारख्या घटनांमुळे खासगी कंपनीत गुंतवणूक करणेही आता धोकादायक वाटू लागले आहे. सहकारी बँका, पतपेढ्या, खासगी कंपन्या, चिट फंड यांमध्ये सकृतदर्शनी अर्धा ते एका टक्का दराने जास्त व्याज मिळू शकते. तथापि, अशा गुंतवणुकीत मुद्दलाची शाश्वती नसते. अशी जोखीम ज्येष्ठांनी घेणे निश्चितच हितावह नसते.सध्या राष्ट्रीयीकृत अथवा नामवंत खासगी बँका ज्येष्ठांना केवळ ६.५ ते ७.२५ टक्के इतकाच व्याजदर देऊ करत आहेत, तर पोस्टाच्या विविध योजनांचे व्याजदर ६.६० ते ७.४० टक्के इतकेच आहेत.या पार्श्वभूमीवर ‘ज्येष्ठ नागरिक ठेव योजना’ (सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम) हा एक उत्तम पर्याय आहे. 

या योजनेची वैशिष्ट्ये :
- ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणीही व्यक्ती हे खाते उघडू शकते.
- ५५ ते ६० वयात रिटायर होणारी (स्वेच्छानिवृत्तसुद्धा) व्यक्तीही या योजनेत गुंतवणूक करू शकते. सेवानिवृत्तीनंतर रक्कम मिळाल्यावर ३० दिवसांच्या आत गुंतविणे आवश्यक असते. तसेच गुंतविलेली रक्कम सेवानिवृत्तीमुळे मिळालेल्या रकमेपेक्षा अधिक असता कामा नये.
- खाते एकट्याच्या अथवा पती/पत्नी यांच्या संयुक्त नावाने उघडता येते. अन्य संयुक्त नाव घेता येत नाही. (उदा. मुलाच्या/मुलीच्या/भावाच्या/बहिणीच्या अथवा अन्य नातेवाईक किंवा मित्राच्या संयुक्त नावाने खाते उघडता येत नाही.) संयुक्त खात्यातील पहिले नाव असणारी व्यक्ती गुंतवणूकदार समजली जाते व त्यानुसार मिळणारी व्याजाची रक्कम पहिल्या व्यक्तीच्या उत्पन्नात समाविष्ट होते. खात्याची मुदत पाच वर्षे असून, त्यानंतर तीन वर्षांसाठी मुदत वाढविता येते. असे मुदत वाढविलेले खाते एक वर्षानंतर कधीही विनाशुल्क बंद करून रक्कम घेता येते.
- ६० वर्षावरील एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतविता येतात. दोघांचेही वय ६०हून अधिक असेल तर प्रत्येकी जास्तीत जास्त १५ लाख असे एकूण ३० लाख रुपये गुंतविता येतात.
- दोघांपैकी एकाचा मुदतीपूर्वी मृत्यू झाल्यास मुदत संपेपर्यत रक्कम खात्यावर ठेवता येते; मात्र मुदतीनंतर जास्तीत जास्त १५ लाख रुपये ठेवता येतात.
- खात्यावर किमान एक हजार रुपये ठेवावे लागतात. नंतर भरावयाच्या प्रत्येक रकमेसाठी वेगळे खाते उघडावे लागते; मात्र अशा सर्व खात्यांची एकत्रित रक्कम प्रत्येकी १५ लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
- खात्याला नामांकनाची (नॉमिनेशन) सुविधा असून, ही सुविधा खाते उघडताना अथवा मुदतीच्या आत कधीही वापरता येते.
- खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयीकृत बँका, आयसीआयसीआय, आयडीबीआय यांसारख्या बँकांमध्येदेखील उघडता येते व गरज पडल्यास दुसऱ्या शाखेत वर्ग करता येते.
- व्याज दर तिमाहीस दिले जाते. हे व्याज खातेदाराच्या सोयीनुसार कुठल्याही बँकेत ईसीएस पद्धतीने तिमाहीच्या पहिल्या दिवशी जमा केले जाते.
- यातील गुंतवणूक प्राप्तिकर ‘कलम ८० सी’नुसार करसवलतीस गुंतवणूक केलेल्या वर्षात पात्र असते.
- एक जानेवारी २०१८पासून व्याजाचा दर ८.३० टक्के असून, ठेव ठेवताना असणारा व्याजदर ठेव तारखेपासून पुढील पाच वर्षे बदलत नाही. यापेक्षा जास्त व्याज दर अन्य कुठल्याही अल्पबचत योजनेस सध्या मिळत नाही. वर्षाला ८.३ टक्के म्हणजे दर तिमाहीस १५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस ३१ हजार १२५ रुपये इतके व्याज पुढील पाच वर्षे मिळत राहील.
- मिळणारे व्याज करपात्र असून, नियमानुसार टीडीएस कपात केली जाते.
- खाते उघडताना एक लाखापर्यंत रोख रकमेने उघडता येते; मात्र एक लाखापेक्षा जास्त रक्कम भरावयाची असल्यास चेकने अथवा खात्यातून रक्कम ट्रान्स्फर करावी लागते.
- गरज पडल्यास खाते एक वर्षानंतर मुदतपूर्व बंद करता येते; मात्र यासाठी ठेव रकमेच्या १.५ टक्के दंड भरावा लागतो. दोन वर्षांनंतर खाते बंद केल्यास एक टक्का दंड भरावा लागतो, हे लक्षात असणे आवश्यक आहे. ठेव तारणावर बँक अथवा पोस्ट कर्ज देत नाही.

या सर्व बाबींचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खूपच उपयुक्त आहे. कारण केंद्र सरकारची योजना असल्याने शंभर टक्के सुरक्षितता आहे. यापेक्षा जास्त व्याज अन्य कोणत्याही सुरक्षित योजनेत मिळू शकत नाही. तसेच व्याज नियमितपणे दर तिमाहीला परस्पर खात्यात जमा होते. यासाठी बँकेत अथवा पोस्टात प्रत्यक्ष जावे लागत नाही. गरज पडल्यास एक वर्षानंतर रक्कम मुदतपूर्व परत घेता येते.

सद्य परिस्थितीत अन्य सुरक्षित पर्याय नाही, हे विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जरूर विचार करावा, असे वाटते.


- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link