Next
गुंतवणुकीची सहा तत्त्वे
BOI
Monday, January 08, 2018 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

चांगल्या प्रकारे गुंतवणूक होण्यासाठी प्रत्येकाने सहा तत्त्वे लक्षात ठेवायला हवीत. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या हीच सहा तत्त्वे...
......
माणसाने सहा नोकर आपल्या पदरी ठेवावेत आणि त्यांची सर्व कामांसाठी मदत घ्यावी, असा सल्ला एका तत्त्ववेत्त्याने दिला आहे. WHO, WHEN, WHERE, WHY, WHAT आणि HOW असे ते सहा नोकर होत. प्रत्येक काम कुणी करावे, कुठे करावे, का करावे, कुठले करावे, कसे आणि किती अशी त्यांची फोड करता येईल. गुंतवणुकीच्या संदर्भात ते आपल्याला कसे उपयोगी पडतात व त्यांची उत्तरे काय हे आपण बघू या! 

गुंतवणूक कुणी करावी? 
अगदी नव्या जन्मलेल्या बालकांपासून सर्वांनी गुंतवणूक करावी. कारण त्याच्या नावे त्याचे पालक, आई-वडील ती करू शकतात.
कुठे करावी?
गुंतवणूक सोने, चांदी, अन्य धातू, किमती पुराणकालीन वस्तू, जमीन, बँकेतील ठेवी, कंपन्यातील ठेवी, सरकारी कर्जरोखे, कंपन्यांचे रोखे, म्युच्युअल फंड्स, सार्वजनिक भविष्यनिर्वाह खाते, पोस्टातील बचत योजना, राष्ट्रीय बचत पत्रे, बँकांतील बचत, मुदत व चालू ठेवी, कंपन्यांतील ठेव योजना, प्राथमिक भाग विक्री व शेअर बाजारातील नोंदणी झालेल्या कंपन्यांचे समभाग इतक्या ठिकाणी करता येते. यापैकी आपण या लेखमालेत शेअर्सबाबत विचार करीत आहोत. 

गुंतवणूक म्हणजे उत्पन्नातून बाजूला संचय म्हणून टाकलेल्या रकमेचे अंतिम रूपांतर असते. संसारात आपल्या दैनंदिन गरजांपासून, नैमित्तिक (लग्न, मुंज, परदेश प्रवास, घर घेणे) गरजा, आजारपण, देणीघेणी यांसारख्या बाबी अशा आकस्मिक गरजा यांसाठी असते. 

गुंतवणूक का करावी याचीही कारणे आहेत.ती कशी करावी, याचे अनेक पर्याय आहेत. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना, प्रथम डी-मॅट खाते उघडून, एक चांगला दलाल बघून त्यांच्यामार्फत आपल्याला मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून, वर्तमानपत्रे, मासिके वाचून निश्चित शेअर्स ठरवून सुरुवात करावी. तज्ज्ञ मंडळी सल्ला देतात. त्याचा अभ्यास करून आपले आडाखे बांधून मग वेळोवेळी केलेली गुंतवणूक योग्य ठरते. 

काही जण दरमहा ठराविक रक्कम अशा प्रकारे गुंतवत असतात. पद्धतशीर गुंतवणूक योजना (Systematic Investment Planning) म्हणून ही पद्धत ओळखली जाते. म्हणजे दरमहा ‘टाटा स्टील’चे १० किंवा  ‘जिंदाल सॉ पाइप्स’चे १०० शेअर्स घेण्याचे उद्दिष्ट ठरवून १२ महिने, २४ महिने अशा कालावधीसाठी ही योजना पूर्ण केली, तर ती फलद्रूप होते. हॉटेलिंग, सिनेमा, चैन, करमणूक यासाठी जशी दरमहा दोन-पाच टक्के रक्कम खर्च होते तशी टक्केवारी गुंतवणुकीसाठी काढावी. त्याचा फायदा कसा होतो, यासाठी ‘७२चा नियम’ म्हणून एक नियम सांगितला जातो. त्याचा परामर्श पुढील लेखात घेऊ या.

गुंतवणूक किती करावी, या प्रश्नाचे उत्तर जमेल तितकी करावी, असे आहे. आपल्याला शक्य असेल तितकी रक्कम गुंतवता येऊ शकते. ‘स्काय इज दी लिमिट’ असे त्याबाबत म्हणता येईल. हे सहा प्रश्न प्रत्येकाने रोज लक्षात ठेवायला पाहिजेत. त्यांची एकदा सवय लागली, की गुंतवणूक आपोआप होऊन दीर्घ कालावधीत त्याचा फायदा पदरात पडतो.

- डॉ. वसंत पटवर्धन
 
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि सोमवारी प्रसिद्ध होईल. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search