Next
‘नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय’
प्रेस रिलीज
Tuesday, June 12 | 05:06 PM
15 0 0
Share this story

मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित मार्गदर्शन सत्रात डावीकडून डॉ. सुलभा विधाते, डॉ. स्नेहा जोशी, शकुंतला काळे, डॉ. अ. ल. देशमुख व डॉ. शिवानी लिमये.

पुणे : ‘दहावीच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षापद्धतीत होणारे बदल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन केले आहेत. कृतिशील, सर्जनशील, वैचारिक, उपयोजित ज्ञानावर आधारलेला हा अभ्यासक्रम आहे. आकलन आणि उपयोजन पद्धतीला अधिक महत्त्व दिले असून, त्यातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती विकसित होईल. नवा अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थी गुणार्थी नव्हे, तर गुणवान व्हावा, यावर भर देणारा आहे,’ असे प्रतिपादन माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून शालेय अभ्यासक्रमात होत असलेले आमूलाग्र बदल समजून घेण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजिलेल्या मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, मंडळाच्या अभ्यास समिती सदस्य डॉ स्नेहा जोशी (मराठी), डॉ. शिवानी लिमये (इतिहास), डॉ. सुलभा विधाते (विज्ञान), मराठी विज्ञान परिषदेचे ज्येष्ठ सभासद डॉ. विद्याधर बोरकर, कोषाध्यक्ष भालचंद्र अत्रे, कार्यवाह प्रा. नीता शहा, अॅड. अंजली देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मराठी विज्ञान परिषद आयोजित मार्गदर्शन सत्रात बोलताना शकुंतला काळे. डावीकडून डॉ. सुलभा विधाते, डॉ. स्नेहा जोशी, डॉ. अ. ल. देशमुख व डॉ. शिवानी लिमये.काळे म्हणाल्या, ‘तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती विद्यार्थी विविध मार्गाने घेतात. अशावेळी त्यांना माहिती आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचे ज्ञान देण्याची गरज आहे. आकलन आणि उपयोजन होईल आणि त्यातून मिळणाऱ्या कौशल्याचा लाभ त्यांना भविष्यात होईल, यावर आपला भर असावा. आता मूल्यमापन बदलले असून, कृतिपत्रिका आल्या आहेत. त्यामुळे आकलन आणि उपयोजन शक्ती वाढेल. स्वानुभव, स्वविचार, स्वकल्पना आणि स्वकृती या चतुःसूत्रीवर आधारित येणारा अभ्यासक्रम आहे. हा बदल कालसुसंगत असून, तो आनंदाने स्वीकारायला हवा. विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्याला हे जमेल की नाही, ही भीती काढून टाकायला हवी.’

‘नवी पाठ्यपुस्तके ज्ञान प्रगल्भ करणारी आहेत. अनेक लिंक आणि संदर्भ दिलेले असून, त्याआधारे विद्यार्थी एखाद्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. घेतलेल्या माहितीचा उपयोग व्यावहारिक जगात कसा करावा, याचा प्रयत्न आहे. परीक्षा पद्धती बदलली आहे. मूल्यांकनाच्या निकष बदलले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी अतिरिक्त ताण न घेता हे बदल समजून घ्यावेत. घरातील वातावरण हसतखेळत राहील, याची काळजी घ्यावी,’ असा सल्ला त्यांनी दिला.

‘ग्रामीण भागातील पालक निश्चिंत असतात, तर शहरी भागातील पालक अतिकाळजीवाहु असतात. काळजी घ्यावी पण करू नये. आपल्या पाल्याला नकारात्मक सूचना करू नयेत. हे करू नको, ते करू नको यामुळे मुले खेळ, हसणे, गप्पा मारणे विसरतात. व्यवस्थित आहार-विहार करायला हवा. नियमित आणि एकाग्र अभ्यास केला, तर तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा सहज देता येते. केवळ गुणांवर भर न देता चांगला नागरिक घडविण्यावर भर द्या. वाचन मनन आणि चिंतन या पद्धतीने अभ्यास करावा,’ असे काळे यांनी सांगितले.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘उपयोजित, आकलनशील, पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे, सर्जनशील, व्यक्तिमत्त्व विकास अशा गोष्टी समोर ठेऊन हा अभ्यासक्रम तयार केला आहे. पुस्तके वाचविशी वाटतील, अशी त्याची मांडणी आहे. नव्या पुस्तकांत नाविन्यपूर्ण स्वाध्याय असून, स्वत:ची मते व्यक्त करण्यास प्रवृत्त केले आहे. प्रत्येक विषयासाठी लिंक दिली आहे. ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम असून, गटाने अभ्यास करण्याची पद्धत विकसित केली आहे. संकल्पनात्मक आणि संशोधनात्मक अभ्यास यामुळे विद्यार्थी चिकित्सक आणि सर्जनशील बनेल. अंतर्गत मूल्यमापन बंद झाल्याने आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित होईल.’

डॉ. जोशी म्हणाल्या, ‘वाचन, आकलन आणि निरीक्षण याला आता अधिक महत्त्व येणार आहे. आपल्याला मराठी विषयाचा नाही, तर मराठी भाषेचा अभ्यास करायचा आहे, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. पारंपरिक आणि वाचिक उत्तरांपेक्षा अनुभवजन्य लिहिण्याला प्राधान्य द्यावे. लेखन सराव अतिशय महत्त्वाचा असून, पालकांनी त्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे.’

मार्गदर्शन करताना शकुंतला काळे.डॉ. विधाते म्हणाल्या, ‘विज्ञान विषयाचा अभ्यास करताना प्रात्यक्षिकांवर भर दिला पाहिजे. तार्किक विचार, कार्यकारणभाव, नवनिर्मिती आणि चिकित्सक प्रवृत्ती जोपासत विज्ञान समजून घेतले पाहिजे. संश्लेषण, वर्गीकरण, विश्लेषण आणि तुलना या गोष्टी आपल्या अभ्यासात असाव्यात. बहुधीश विचारांना प्राधान्य, सृजनशील, कृतिशील विचारपद्धतीवर भर दिला आहे. त्याचे मूल्यांकनही त्याच पद्धतीने आहे.’

डॉ. लिमये म्हणाल्या, ‘इतिहासाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल आहेत. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारा आणि स्वमत प्रकट करण्याला प्रोत्साहित करणारा असा अभ्यासक्रम आहे. ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन वाचून त्यावर विचार करून ते असे का झाले असेल, याविषयी लिहायचे आहे. त्यामागचा तार्किक भाव आपल्या शब्दात मांडण्याची मुभा या अभ्यासक्रमात आहे.’

प्रा. नीता शहा यांनी प्रास्ताविक केले. भालचंद्र अत्रे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link