Next
सामाजिक कार्याचे धडे देणारा बिहारचा दुष्काळ
BOI
Sunday, November 25, 2018 | 12:45 PM
15 1 0
Share this article:

१९६७मध्ये बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी मदतीसाठी देशाच्या अनेक भागांतून कार्यकर्ते तिथे पोहोचले होते. महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्तेही त्यात होते. ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर हेही त्यात सहभागी झाले होते. ‘मी पुढे बरंच काही केलं. त्याचं काही, नव्हे बरंचसं श्रेय तरुणपणातल्या सामाजिक कार्याला नक्कीच द्यावं लागेल,’ असं ते म्हणतात. बिहारमधल्या त्या वेळच्या अनुभवांबद्दल रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरामध्ये लिहीत आहेत. त्या लेखाचा हा पूर्वार्ध...
...........
सन १९६७मध्ये बिहारला मोठा दुष्काळ पडला. तसा तो तीन-चार वर्षांनी पडतच होता; पण त्या वेळचे त्याचे स्वरूप भीषण होते. त्याच दरम्यान पुण्यात काही तरुण विद्यार्थी मंडळी एकत्र येऊन त्यांनी ‘यूथ ऑर्गनायझेशन’ नावाची संस्था स्थापन केली होती. (पुढे त्याचेच नामांतर ‘युक्रांद’ असे झाले.) उद्देश हाच, की काही सामाजिक-सांस्कृतिक कार्य करावे. आणि त्याच वेळी बिहारच्या भयानक बातम्या येऊ लागल्या. अतिश्रीमंत व अतिगरीब असे दोनच वर्ग तिथे होते. (आता परिस्थिती खूप बदलली आहे.) गरीब लोकांकडे जमिनीचा छोटासा तुकडा असला तर किंवा त्यांना शेतमजूर म्हणून अत्यल्प पैशात काम करावं लागे. दोन वर्षं पाऊस न झाल्यानं शेतं उजाड झाली होती. अन्नधान्याचं उत्पादन बंद आणि खाण्याची भ्रांत! उपासमारीमुळे गरिबांचे मृत्यू सुरू झाले होते. अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी काही तरी ठोस उपाययोजना करण्याची गरज होती. त्या पार्श्व भूमीवर, लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ‘बिहार रिलीफ कमिटी’ची स्थापना झाली. बिहारमध्ये ठिकठिकाणे अन्नकेंद्रे सुरू झाली. जोडीला मोफत औषधोपचारही केले जात.

सिंहगडावर टिळक बंगल्यात आम्हा कार्यकर्त्यांचं दोन दिवस निवासी शिबिर झालं. तिथे ३५-४० जण हजर होते. संघटनेची ध्येय-धोरणं ठरली. मी त्या वेळी प्रत्येकाची संपूर्ण माहिती लिहून घेतली. शिक्षण, छंद, विशेष, प्रावीण्य इत्यादी समजल्यामुळे कोणाचा कुठे उपयोग होऊ शकेल, हे समजलं. बिहारला जाऊन प्रत्यक्ष मदतकार्य करावं, असा विचारही तिथे झाला. नंतर होणाऱ्या सभांमध्ये कामाची रूपरेषा ठरवली. चांगला निधी गोळा करण्याची आवश्यकता होती. डेक्कनवर, निळूभाऊ लिमये यांचं ‘पूनम हॉटेल’ होतं. एक दिवस तिथे वेटर म्हणून काम करायचं, ग्राहकांना त्याचं प्रयोजन सांगायचं आणि मिळणारी ‘टिप’ बिहारसाठी वापरायची, असा कार्यक्रम ठरला. सर्वांचं चांगलं सहकार्य मिळालं. त्याच वेळी मी आणि एका मित्रानं डेक्कन जिमखाना बसस्टॉपवर (सध्या आहे त्याच जागी त्या वेळी होता) बूटपॉलिशचा उद्योग केला. आवश्यक साहित्य खरेदी केलं. पुठ्ठ्यावर एक छोटा फलक तयार केला. एकानं तो धरायचा आणि दुसऱ्यानं पॉलिश करायचं. लाज वाटण्याचा काही प्रश्नच नव्हता. मला वाटतं, १७-१८शे रुपये जमा झाले. ‘पूनम’मध्ये चार-पाच हजार गोळा झाले.

एवढी रक्कम पुरेशी नव्हती. ओळखीच्या लोकांनी थोडी-थोडी मदत केली. मग आम्ही लोणावळा-खंडाळ्याकडे मोर्चा वळवला. बंगले असलेल्या विभागात जाऊन, मालकांना दुष्काळाची माहिती दिली. काहींनी पिटाळून लावलं. बऱ्याच जणानी औदार्य दाखवलं. कोणी २०-२५ रुपये, कोणी ५० रुपये दिले. एका बंगल्यात एक वयस्कर जोडपं होतं. त्यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले, ‘मुलांनो, तिथे पैशापेक्षा स्वयंसेवकांची गरज आहे. जयप्रकाशांमुळे खूप मदत गोळा होत आहे.’ त्यावर त्यांची बायको म्हणाली, ‘त्यांना प्रोत्साहन द्या. शिवाय ही मुलं तिकडे जाणार आहेतच.’ मग श्रीयुतांनी १०० रुपये काढून दिले. १९६७मध्ये १०० रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. (आजचे १० हजार रुपये) ते गृहस्थ कोण होते हे सांगितलं, तर तुम्हाला आश्च र्य वाटेल. साहित्य अकादमी आणि पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे, ‘कूली’, ‘अनटचेबल’ इत्यादी कादंबऱ्या इंग्रजीत लिहिणारे ख्यातनाम भारतीय लेखक मुल्क राज आनंद! आम्ही त्यांना भेटलो तेव्हा ते ६२ वर्षांचे होते आणि ९९ वर्षांचं दीर्घायुष्य (मृत्यू : २००४) त्यांना लाभलं. असे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात, समृद्ध करतात.

आता या घटनेला ५१ वर्षं होऊन गेली. आमच्याकडे अंदाजे २० हजार रुपये जमा झाले असतील. तो मे महिना होता. म्हणजे बिहारमध्ये तापमान ४७-४८ अंश सेल्सिअस. कडक उन्हाळा! पहिल्या बॅचमध्ये कोण-कोण जाणार याचा विचार झाला. कोणत्याही कामात उत्साहानं पुढाकार असल्यामुळे माझा त्यात समावेश झाला. चार जणांची निवड झाली. पहिला अनिल अवचट. त्या वेळी तो डॉक्टर झाला नव्हता. परीक्षेला बसला होता. दुसरा अनिल दांडेकर. हा त्या वेळी नूमवि शाळेत शिक्षक होता. पुढे तो ‘सिम्बायोसिस’मध्ये गेला. त्यानं नंतर भरपूर प्रवास केला, खूप लेख लिहिले आणि पुस्तकंही बरीच झाली. तिसरा होता अरुण फडके - उंचीला बेताचा, पण व्यायामपटू. बिहारमध्ये लहान मुलांना ‘बुतरू’ म्हणतात. अरुण आमच्यातला ‘बुतरू’ होता - आणि चौथा मी. मी पुढे बरंच काही केलं. त्याचं काही, नव्हे बरचसं श्रेय तरुणपणातल्या सामाजिक कार्याला नक्कीच द्यावं लागेल. अनुवाद क्षेत्रात पदार्पण करण्यातही बिहारचा मोठा हातभार आहे. कसा ते पुढे येईलच.

सदाकत आश्रम, पाटणापुण्याहून पाटण्याला जायचं होतं. गाडी मुंबईहूनच घ्यायची होती. आम्ही चौघं मुंबईला गेलो. ‘कलकत्ता मेल व्हाया पाटणा’ ही रेल्वे संध्याकाळी होती. आम्हाला निरोप द्यायला तीन-चार जण आले होते. त्यात एक डॉ. सुनंदा होती. अनिल अवचटची (भावी) बायको. त्या दोघांनी पुढे ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ स्थापन केलं. तिसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास आम्ही पाटण्याला पोहोचलो. प्लॅटफॉर्मवर एका सरदारजीकडून चौघांचा फोटो काढून घेतला. पाटण्यात सदाकत आश्रमाची मोठी इमारत होती. ‘बिहार रिलीफ कमिटी’चं कार्यालय तिथेच थाटलेलं होतं. आम्ही स्टेशनवरून सरळ तिथे दाखल झालो. आमची माहिती दिली. सुखरूप पोहोचल्याची तार पुण्याला पाठवायची होती. कार्यालयात पुण्याचा पत्ता आणि मजकूर दिला. तारेसाठी पैसे द्यायला लागलो. तिथला व्यवस्थापक म्हणाला, ‘ठीक आहे, आम्ही बघतो. इथे संपूर्ण भारतामधून लोक सेवाकार्यासाठी आले आहेत. पोस्टाची खास सोय केलेली आहे.’ तारेचा खर्च पाच-सहा रुपये असेल. गोष्ट छोटी होती; पण संस्थेचा दृष्टिकोन व्यापक होता. आमच्यासाठी तो एक धडा होता.

बाबा श्रीचंदराज्यभर ठिकठिकाणी ‘रसोडे’ (अन्नछत्र) चालू होते. तिथे ५०० ते एक हजार जणांना (शक्यतो स्त्रिया आणि मुले) एका वेळेला जेवण दिलं जाई. आम्ही चार जण स्वतंत्रपणे एखादं केंद्र चालवू शकत नव्हतो. म्हणून आम्हाला असं सुचवण्यात आलं, की ‘मदतीची रक्कम कार्यालयात जमा करा. तुम्हाला एका ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतो.’ म्हणजे त्या ठिकाणी तांदूळ, डाळ, गूळ इत्यादी पुरवणे, स्वयंपाकासाठी बायका-पुरुष देणे आणि राहण्यासाठी योग्य ती जागा. फार विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. बाजार-मास्तर म्हणून आम्हाला काम करायचं नव्हतं. आमच्यासाठी गया जिल्ह्यातलं ‘रजौली’ हे गाव निवडण्यात आलं. तिथे गुरुनानक यांचे ज्येष्ठ पुत्र बाबा श्रीचंदजी यांचा आश्रम (गुरुद्वारासदृश) होता. अन्नकेंद्र चालवण्यासाठी प्रशस्त जागा होती. राहण्याची काहीच अडचण नव्हती. एक मोठी विहीर होती. उन्हाळा प्रचंड असल्यामुळे आंघोळीला गरम पाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या रजौली गावाकडे आम्ही दुसऱ्या दिवशी रवाना झालो.

बुद्धगयामु. पो. रजौली, ता. नवादा, जि. गया

गयाप्रसाद सिंह हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ, वयोवृद्ध नेते होते. रजौली हे त्यांचं गाव. कुटुंब खूपच मोठं. हजारो एकर शेती त्यांच्याकडे होती. गया या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचं पक्ष कार्यालय होतं. तिथे आम्ही त्यांना आधी भेटलो. त्यांनी प्रेमानं विचारपूस केली आणि काही अडचण आल्यास त्यांच्या गावातल्या घरी जाण्यास सांगितलं. पुढे बस पकडून आम्ही रजौलीला पोचलो. गाव अगदीच लहान होतं. बाबा श्रीचंद धर्मशाळा जवळच होती. तिथे एक अपंग गृहस्थ कायमचे राहत होते. पोलिओमुळे दोन्ही पाय गेलेले. सर्व हालचाली बसल्या बसल्या सरकत करायच्या. गावातल्या मुलांना ते शिकवत. त्यामुळे मास्टरजी असं नाव पडलेलं. त्यांनी आमचं स्वागत केलं. आम्हाला स्वत: चहा करून दिला. त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. आमच्या एकूण चार तुकड्या तिकडे कामासाठी गेल्या. पहिली आमची. या सगळ्यांचा त्याच जागी मुक्काम असणार होता. प्रत्यक्ष अन्नकेंद्र दोन दिवसांतच सुरू झालं.

(या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prathamesh Kale About 227 Days ago
मी या लेखाचे दोन्ही भाग वाचले. खूपच छान. काही वर्षांपूर्वी मराठी तरुणांनी बिहारला जाऊन नैसर्गिक विपत्ती काळात मदत केली होती ही गोष्ट वाचून अभिमान वाटतो.
0
0

Select Language
Share Link
 
Search