Next
सूर आणि ताल : संगीतरथाची दोन चाकं
BOI
Tuesday, January 01, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this story


रागनिर्मितीसाठी सूर हवा, तर रागचित्रांत रंग भरण्यासाठी ताल हवा. राग सुरांच्या चौकटीत फिरतो, तर ताल त्या चौकटीला नक्षीदार फ्रेम लावून खुलवतो. रागाचा स्वरविस्तार कापडाच्या ताग्यासारखा, तर ताल त्याला आकर्षक रेडिमेड कपड्याचं रूप देतो. रागाचे सूर मनाला अलगद तरंगत नेतात, तर ताल आपल्याला डौलदार बग्गीतून फिरवून आणतो. अशी ही ‘राग आणि ताल’ यांची जोडी. रागनिर्मितीबद्दल आपण याआधी जाणून घेतलं आहे. ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी पाहू या ‘ताल’ या संकल्पनेबद्दल...
................................
जन्मत:च आपल्याला नकळत उमगतो, तो ऱ्हिदम. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत बालकाला रिझवलं जातं. टाळीच्या इशाऱ्यावर त्याच्या नजरेला खेळवलं जातं. बोबड्या बोलांमध्ये बालगीतं गाऊन दाखवली जातात. 
अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, 
रूप्याचा वाळा, तान्ह्या बाळा तीट लावू.
खरं तर या शब्दांना काही अर्थ असतो, असं नाही; पण त्यातला ऱ्हिदम डोलायला लावतो. पडत धडपडत पावलं टाकून झाली, की चालायला सुरुवात होते. तीसुद्धा एक-दोन एक-दोन अशी ऱ्हिदममध्ये. अगदी सहजपणे, अगदी नकळत. एका विशिष्ट लयीत पडणारी कुणाचीही पावलं... काय दाखवतात? तर आपल्यात जन्मजात भिनलेला ऱ्हिदम. कुणी हळू चालेल, तर कुणी जलद; पण दोन-तीन पावलं सावकाश, लगेच दोन-तीन पावलं भरभर, अशी विषम लयीत चालणारी व्यक्ती कुणी पाहिलीय?

बैलगाडीतून जाताना बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा लयबद्ध नाद ऐकू येतो, टांग्यात बसून जाताना घोड्याच्या टापांचा अनोखा ऱ्हिदम आपल्याला गुणगुणायला लावतो, तर झुकझुक गाडीचा दमदार ठेका आपल्याला नकळत गाणं म्हणायला लावतो. आपल्या दिलाची धडकन, म्हणजेच हृदयाचे ठोके जोपर्यंत ठक् ठक् ठक् ठक् असे एका लयीत चालू असतात, तोपर्यंत प्रकृतीला काही धोका नसतो; पण तीच लय जर का बिघडली, तर लगेच डॉक्टरकडे जावं लागतं. तर असा हा ऱ्हिदम, संगीताच्या भाषेत यालाच ‘ताल’ म्हणता येईल.

ताल म्हणजे गाण्याचं घड्याळ. कालमापनाचं परिमाण. घड्याळात जसे सेकंद, तशा तालात मात्रा (बीट्स). हे तालचक्र कधी कमी मात्रांचं, लहान, तर कधी जास्त मात्रांचं, मोठं असतं. तालाचं एक आवर्तन, एक चक्र जेवढं लहान, तेवढं सर्वसामान्यांना समजायला सोपं. म्हणूनच सिनेसंगीतातील उडत्या चालींची, समूह नृत्यांची गाणी ही चार मात्रांच्या केरवा तालातली (फोर बीट्स ऱ्हिदम), तर गरब्यासारख्या समूहनृत्याचा ताल दादरा/खेमटा हा सहा मात्रांचा. अभंग, भक्तिगीत यांसाठी आठ मात्रांचा भजनी ठेका. अशी छोटी आवर्तनं म्हणजे कॅची ऱ्हिदम.. कोणालाही त्यात सहजपणे जुळवून घेता येईल असे ताल. लोकसंगीतातही असेच ताल वापरले जातात; पण मग यापेक्षा जेव्हा अधिक मात्रांचे ताल वापरले जातात, तेव्हा मात्र शिकून, समजून घ्यावे लागतात. 

रूपक (७ मात्रा), झपताल (१० मात्रा), एकताल (१२ मात्रा), आडा चौताल, दीपचंदी (१४ मात्रा), त्रिताल (१६ मात्रा). संगीतामध्ये हे ताल निरनिराळ्या गतींमध्ये (स्पीड), लयींमध्ये वापरले जातात. विलंबित (स्लो), मध्य (मीडियम), द्रुत (फास्ट) अशा तीन लयींमध्ये निरनिराळे गीतप्रकार गायले, वाजवले जातात. ताल शिकवता येतो, पण लय शिकवता येत नाही. लय ही वरूनच घेऊन यावी लागते.

जी गायली जाते, ती बंदीश म्हणजे गीत/ख्याल. जी वाद्यावर वाजवली जाते ती बंदीश म्हणजे गत. विलंबित लयीत गायला जातो, तो विलंबित ख्याल किंवा बडा ख्याल आणि वाजवली जाते ती मसीतखानी गत. मध्य किंवा द्रुत लयीत गायला जातो, तो द्रुत ख्याल किंवा छोटा ख्याल आणि वाजवली जाते, ती रजाखानी गत. कोणत्याही तालाचा आरंभबिंदू, पहिली टाळी हिला ‘सम’ म्हणतात, तर तालाचा मध्यबिंदू हा ‘काल’ असतो.

तालचक्र हे घड्याळाप्रमाणे वर्तुळाकार मानलं, तर बाराच्या जागी सम आणि सहाच्या जागी काल येतो. आणि मध्ये-मध्ये तालाच्या इतर टाळ्या येतात. मैफलीमध्ये गायक-वादकानं सम पकडणं हा प्रत्येक वेळी मोठा आनंददायी अनुभव असतो. कलाकाराबरोबरच जाणकार श्रोत्यांना या समेचा अचूक अंदाज येतो आणि उत्स्फूर्ततेनं तो व्यक्त केला जातो. ‘हं...’ ‘वाहवा...!’, ‘क्या बात है!’, अशा उद्गारांनी कलाकारास समेवर दाद मिळते. कथ्थकसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारांतही ही सम अनुभवता येते. विशेष म्हणजे, त्यात सम गाठल्यानंतर नर्तकाची विशिष्ट आकर्षक मुद्रा किंवा पोझ ही फारच मनमोहक असते.

शास्त्रीय गायनात तबला हे तालवाद्य साथीला वाजवलं जातं, तर धृपद - धमार गायनासाठी मृदंग/पखवाज हे वाद्य वाजवतात. पंढरपूरच्या दिंडीतील वारकरी गळ्यात मृदंग अडकवून वाजवतात. त्याच्या जोडीला टाळ, चिपळ्या ही तालवाद्यं वाजवली जातात. लावणीच्या साथीला ढोलकी असते, तर डफ - तुणतुणं यांच्या साथीनं शाहीराचा पोवाडा रंगतो. सिनेसंगीत, सुगम संगीतासाठी तर अनेक प्रकारची तालवाद्यं आणि पूरक तालवाद्यं (साइड ऱ्हिदम) वाजवली जातात. बोंगो, कोंगो, मिरॅकस, ट्रॅंगल, घुंगरू, टाळ, झांज, ढोल, ड्रम सेट अशी अनेक प्रकारची वाद्यं गीताचा ठेका उचलून धरतात. आता तर ‘ऑक्टोपॅड’सारखं आधुनिक वाद्य, आठ निरनिराळ्या तालवाद्यांचा इफेक्ट देऊ शकतं. कर्नाटक संगीतात मृदंगम्, घटम्, मंजिरी ही तालवाद्यं साथीला दिसून येतात. 

पं. झाकीर हुसैनगायन-वादनाच्या मैफलींमध्ये मुख्य कलाकाराच्या बरोबरीनं साथसंगत करणाऱ्या कलाकारांना मान मिळू लागला, ही खरोखरच फार महत्त्वाची गोष्ट आहे. तबला, मृदंग या साथसंगतीच्या तालवाद्यांनी आता स्वतंत्र वादनातही स्थान मिळवलं आहे. त्यामुळे देशातील आणि परदेशातील रसिकांमध्ये आता तबला सोलो लोकप्रिय झाला आहे. पं. आमीर हुसेन खाँ साहेब, पं. अल्लारखाँ, पं. अहमद जान तिरखवाँ यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांनी तबल्याला प्रतिष्ठा मिळवून दिली, तर उस्ताद झाकीर हुसेन, पं. सामता प्रसाद, पं. चतुरलाल, पं. आनिंदो चटर्जी, पं. सुरेश तळवलकर, पं. योगेश समसी अशा दिग्गजांनी तालवाद्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. 

फजल कुरेशी, शिवमणी, त्रिलोक गुर्टू यांसारख्या कलाकारांनी आपल्या फ्युजन म्युझिकद्वारे, ड्रमसारख्या तालवाद्यांच्या सादरीकरणाला एक वेगळाच आयाम प्राप्त करून दिला. असा हा ताल.... कलाकार ‘बेताल’ होऊन चालत नाही... खरंच. कुठल्याही अर्थानं.. हेच खरं.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link