Next
अर्थव्यवस्थेचा विकासदर गाठणार तीन वर्षांचा उच्चांक
जीडीपी ७.२ टक्क्यांनी वाढण्याचा सांख्यिकी विभागाचा अंदाज
BOI
Wednesday, January 09, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली :  उत्पादन, कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीमुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) वर्तवला आहे. तेवढी पातळी गाठल्यास हा विकासदर गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक असेल. जागतिक बँकेनेही    भारताचा विकासदर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ७.३ टक्के आणि त्यापुढील दोन वर्षे ७.५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. 

केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) नुकत्याच जाहीर केलेल्या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या अंदाजात ही अपेक्षा व्यक्त केली आहे; मात्र रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या ७.४ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हा दर कमीच आहे. गेल्या वर्षी ६.७ टक्के विकासदर नोंदवण्यात आला होता. २०१६-१७ या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी) वाढ ७.१ टक्के दराने, तर २०१५-१६मध्ये ८.२ टक्के दराने झाली होती.

जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस्’ या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबद्दल सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे.  खप आणि गुंतवणूक यातील वाढीच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपली वाटचाल सुरू ठेवेल, असेही यात नमूद केले आहे. 

‘ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (जीव्हीए) सात टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी यात ६.५ टक्के दराने वाढ झाली होती,’ असे सांख्यिकी विभागाने म्हटले आहे.

या वर्षी पहिल्या तिमाहीमध्ये ८.२ टक्के आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये ७.१ टक्के विकासदर नोंदवण्यात आला होता. तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी २८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. 

या क्षेत्रांत विकासदर वाढणार

या विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कृषी, वने आणि मासेमारी या क्षेत्रांचा विकासदर गेल्या वर्षीच्या ३.४ टक्क्यांवरून ३.८ टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा आहे. उत्पादन क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या ५.७ टक्के दरापेक्षा यंदा ८.३ टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज आहे. वीज, गॅस, पाणी पुरवठा आणि इतर उपयुक्त सेवा क्षेत्राचा विकासदर गेल्या वर्षीच्या ७.२ टक्क्यांवरून ९.४ टक्के होण्याचा अंदाज आहे. बांधकाम क्षेत्रही ५.७ टक्के विकासदरावरून ८.९ टक्के विकासदर गाठण्याचा अंदाज आहे. आर्थिक, बांधकाम आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राचा विकासदर ६.६ टक्क्यांवरून ६.८ टक्के होण्याचा अंदाज आहे. 
 
या क्षेत्रांत विकासदर घटणार

व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, दळणवळण आणि सेवा क्षेत्रात गेल्या वर्षीच्या आठ टक्के दरावरून यंदा ६.९ टक्के दरापर्यंत घसरण होण्याचा अंदाज आहे. खाणकाम क्षेत्रातही २.९ टक्के दरावरून ०.८ टक्के दरापर्यंत घसरण होण्याचा अंदाज आहे. संरक्षण, तसेच लोकप्रशासन या क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या दहा टक्क्यांवरून ८.९ टक्क्यापर्यंत घसरण होण्याचा अंदाज आहे. 

दरडोई उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढणार 

या विभागाच्या अंदाजानुसार, देशातील दरडोई उत्पन्नात ११.१ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील प्रतिव्यक्ती उत्पन्न एक लाख २५ हजार ३९७ रुपये होईल. गेल्या वर्षी ते एक लाख १२ हजार ८३५ रुपये होते. त्यामध्ये ८.६ टक्के वाढ झाली होती.

‘जीडीपी’चा आकार

या वर्षी ‘जीडीपी’चा (सकल राष्ट्रीय उत्पादन) आकार १३९.५१ लाख कोटी रुपयांचा होईल. २०१७-१८मध्ये देशाचा जीडीपी १३०.१० लाख कोटी रुपयांचा होता.

पहिला अंदाज विविध क्षेत्रांतील सात महिन्यांच्या आकडेवारीवर आधारित काढला जातो. खासगी कंपन्यांच्या निकालावरही यात विचार केला जातो. या आकड्यांच्या आधारावरच सरकार नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करते. यंदा एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Darshana Shah About 218 Days ago
Nice information
0
0

Select Language
Share Link
 
Search