Next
‘तरुणांनो लष्करात भरती व्हा’
प्रेस रिलीज
Wednesday, March 21, 2018 | 05:45 PM
15 0 0
Share this story

‘सिर्फ’ संस्थेतर्फे लेफ्टनंट ओम पैठणे व डॉ. अरुण दातार यांचा संस्थेचे अध्यक्ष योगेश चिथडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुणे : ‘लढणे हे मराठी माणसाच्या रक्तातच आहे, मराठी मुले लष्करात आली पाहिजेत. कोणाबरोबर आणि कसे लढायचे हे समजून घेणे आवश्यक आहे. रस्त्यावरची भांडणे करत बसू नका तर देशाच्या खऱ्या करण्यासाठी आर्मीत सामील व्हा’, असे आवाहन कॅब चालक ते लष्करी अधिकारी असा जिद्दीचा यशस्वी प्रवास करणाऱ्या लेफ्टनंट ओम पैठणे याने तरुणांना केले. 

 ‘सिर्फ’ (सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन) तर्फे आयोजित ‘सर्व्हिस बिफोर सेल्फ’ या कार्यक्रमात लेफ्टनंट ओम पैठणे व महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिव छत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. अरुण दातार यांचा सन्मान करण्यात आला.  त्यावेळी ओम पैठणे बोलत होते.  ‘सिर्फ’चे अध्यक्ष योगेश चिथडे यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना स्मृतीचिन्ह व श्रीफळ देऊन सन्मानित केले. डॉ.आरती अरुण दातार आणि लेफ्टनंट ओम पैठणेचे आई-वडील यांनाही ’सिर्फ’ तर्फे सन्मानित करण्यात आले.

‘सिर्फ’च्या सचिव सुमेधा चिथडे यांनी सैन्य दलाचे जीवन, कार्यपद्धती, देशाप्रती असलेली निरपेक्ष सेवा;तसेच समाजातील अधिकाधिक तरुण-तरुणींनी सैन्यदल हे आपले करिअर म्हणून निवडावे यासाठी मार्गदर्शन केले. सियाचीन बेसकॅम्पला ‘सिर्फ’ ऑक्सिजन सिलेंडरचा प्रकल्प उभारणार असल्याचेही सुमेधा चिथडे यांनी सांगितले.

ओम पैठणे याने आपल्या मनोगतात त्याचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडला. ‘मला कोणाचीही सहानुभूती नको आहे. मी कुठून आलो हे महत्वाचे नाही तर मी कुठे चाललो आहे हे महत्वाचे आहे, असे सांगून ओम म्हणाला, ‘परिस्थितीला कधीही शरण जाऊ नका. प्रत्येकाच्या जीवनात एक ‘टर्निंग पॉइंट’ येत असतो. आयुष्यात पैसे सर्वचजण कमावतात परंतू, आदर मिळत नाही. त्यामुळे मी हा मार्ग निवडला. आपल्यातील क्षमतेला कधीही कमी लेखू नका, तुम्ही ज्यावेळी स्वत:ला कमी लेखता त्यावेळी तुम्ही हरलेला असता. त्यामुळे काहीही होऊ दे,कितीही परिस्थिती वाईट असली तरी तिला शरण जाऊ नका, सकारात्मक विचार करणार्यात व्यक्तींच्या संपर्कात राहा. जेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा सकारात्मक विचार असणारे लोक तुम्हाला वर खेचून काढतात’. 
‘आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावर खूप प्रभाव पडत असतो. संगत चांगली असेल तर आपण निम्मी लढाई जिंकलेली असते. आर्मीमध्ये आल्यानंतर मला कळले की मी काहीतरी वेगळा आहे.’असे ही त्याने नमूद केले.

डॉ. अरुण दातार म्हणाले, ‘चारही बाजूने भारतावर घाला घालण्यासाठी शत्रू राष्ट्र तयार आहे. त्यासाठी तरुणांनी लष्करात भरती होणे आवश्यक आहे. आपली उंची कमी भरल्याने भारतीय वायुदलात भरती होण्याचे स्वप्न अधुरे राहिले असे सांगून डॉ. दातार म्हणाले, ‘रक्षक’ हा रक्षण करण्याची इच्छा असलेल्यांसाठीचा कोर्स त्यानंतर आपण सुरु केला. त्यातून अनेक जण लष्करात गेले. आर्मी हे चांगले करिअर आहे हे सांगणारे लोक फार कमी आहेत. बॉलीवूड आणि क्रिकेटर हेच तरुणांचे ‘आयडॉल्स’ आहेत. परंतु खरे ‘आयडॉल्स’ हे भारतीय जवान आहेत’. शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्काराच्या  रकमेतील  एक लाखाची रक्कम ‘सिर्फ’ला देत असल्याची घोषणा डॉ. दातार यांनी या वेळी केली. तर, प्रकाश  केळकर यांनी पन्नास हजार  रूपये रक्कम देण्याची घोषणा केली.

‘सिर्फ’ ही संस्था १९९३ पासून सैनिक परिवारासाठी कार्यरत आहे. शहीद परिवारातील पत्नी, मुले यांचे शिक्षण, त्यांना मानसिक आधार देऊन सर्वतोपरी सहकार्य करून त्यांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने कार्यरत आहे. शहीद परिवाराच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांची नेमकी गरज लक्षात घेऊन त्यांना मदत,मार्गदर्शन करणे आणि या कुटुंबाशी आपले  नाते दृढ करणे यासाठी झटत आहे. विद्यार्थ्यांना सैनिक परिवाराशी जोडण्यासाठी प्रतिवर्षी राख्या, तिळगूळ, फराळाचे पदार्थ सीमारेषेवरील सैनिकांसाठी पाठवत आहेत. आपल्या कौटुंबिक समारंभात सैनिक परिवारातील सदस्यांना सन्मानपूर्वक बोलावून त्यांचा सन्मान करण्यास प्रवृत्त केले जाते. विद्यार्थी व त्यांचे पालकही आनंदाने सहभागी होतात. विविध उपक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक लोकांचा या कार्यात सहभाग घेऊन त्यांना सैन्यदलाशी जोडण्याचा आणि सैन्यदलाविषयी समाजात कृतज्ञता, आदराची भावना रुजविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमाला माजी उपमहापौर दीपक मानकर, कर्नल बिपीन शिंदे (निवृत्त), सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, प्रकाश केळकर, चंदूकाका सराफ पेढीचे अतुल शेठ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्वामीकृपाचे योगेश देसाई यांचेही अनमोल सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
R Y Bhosale About 337 Days ago
Interested to help S. I. R. FOR.
0
0

Select Language
Share Link