Next
भूमी माता की पिता - एक जर्मन समस्या
BOI
Monday, March 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

आपल्या मायदेशाला किंवा जन्म झालेल्या देशाला मातृभूमी म्हणणे हे आपल्या इतके अंगवळणी पडले आहे, की त्याऐवजी दुसरा एखादा शब्द असू शकतो हेच आपल्या पचनी पडत नाही. परंतु जगातील अनेक देशांमध्ये हीच संकल्पना वेगळ्या प्रकारे मांडलेली असते. नंतर आधुनिक जगाच्या बदलत्या संकल्पनेनुसार त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभी राहतात आणि कसोटीचे क्षण निर्माण होतात. सध्या ही परिस्थिती जर्मनीत उद्भवली आहे. त्याबद्दलचा हा लेख...
..............
आपल्या मायदेशाला किंवा जन्म झालेल्या देशाला मातृभूमी म्हणणे हे आपल्या इतके अंगवळणी पडले आहे, की त्याऐवजी दुसरा एखादा शब्द असू शकतो हेच आपल्या पचनी पडत नाही. परंतु जगातील अनेक देशांमध्ये हीच संकल्पना वेगळ्या प्रकारे मांडलेली असते. नंतर आधुनिक जगाच्या बदलत्या संकल्पनेनुसार त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभी राहतात आणि कसोटीचे क्षण निर्माण होतात. सध्या ही परिस्थिती जर्मनीत उद्भवली आहे. गेल्या आठवड्यात जर्मनीच्या समानता खात्याच्या आयुक्तांनी असाच एक वाद उभा केला. आधुनिक काळानुसार लैंगिक संतुलन राखण्याच्या दृष्टीने थेट जर्मनीच्या राष्ट्रगीतातच बदल करण्याची मागणी त्यांनी केली.

गेल्या सोमवारी क्रिस्टिन रोज-मोहरिंग यांनी कौटुंबिक व्यवहार मंत्रालयाच्या एका अंतर्गत परिपत्रकात या बदलाचे सूतोवाच केले. जर्मनीच्या राष्ट्रगीतातील ‘पितृभूमी’ (फाटरलांड) या शब्दाऐवजी तिथे ‘जन्मभूमी’ (हाईमाट) हा शब्द वापरावा, अशी सूचना त्यांनी या परिपत्रकात केली होती. त्याचप्रमाणे ‘हृदय आणि हाताने बंधुभाव’ याऐवजी ‘हृदय आणि हाताने धैर्य’ असा बदल करण्याचीही त्यांनी सूचना केली आहे. भाषेतील लिंगसंतुलन कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रियाने अशाच प्रकारे आपल्या राष्ट्रगीतात बदल केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रियाचीही भाषा जर्मन हीच आहे आणि त्या देशाने २०१२मध्ये आपल्या राष्ट्रगीताच्या काही भागांमध्ये ‘मुले’ या शब्दाऐवजी ‘मुली व मुले’ अशी शब्दयोजना केली आहे. अशा प्रकारे बदल करणारे केवळ हेच देश नाहीत. कॅनडानेही गेल्या महिन्यात आपल्या राष्ट्रगीतातील पुरुषवाचक शब्द काढून टाकण्याचे जाहीर केले होते. तेथे ‘तुझी सर्व मुले’ या शब्दांऐवजी ‘आपण सर्व’ असे शब्द घालण्यात आले आहेत. 

जर्मन आयुक्तांच्या या सूचनेला स्वतः महिला असलेल्या चान्सेलर आंगेला मेर्केल यांनीच खोडा घातला. ‘मेर्केल या सध्याच्या राष्ट्रगीतावर समाधानी आहेत,’ असे त्यांचे प्रवक्ते स्टीफन सेबर्ट यांनी म्हटले आहे. मेर्केल यांच्या सीडीयू पक्षाच्या जूलिया क्लेकरनर यांनीही या प्रस्तावाला विरोध केला. ‘राष्ट्रगीत बदलण्यापेक्षा महिलांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या अन्य अनेक गोष्टी आहेत,’ असे त्या म्हणाल्या. ‘सीडीयू’च्या सरचिटणीस अॅनेग्रेट क्रॅम्प-कारेनबाउयेर यांनीही या प्रस्तावाला नाक मुरडले. ‘मी एक स्वतंत्र स्त्री आहे आणि या गाण्यातून मला वगळल्याचे मला कधीच वाटले नाही,’ असे त्या म्हणाल्या.

जर्मनीत अतिउजवा गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्टरनेटिव्ह फ्यूर डॉयट्शलांड (एएफडी) या पक्षाने गेल्या काही वर्षांत मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे जर्मन अस्मितेचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. याच पक्षाने या सूचनेवर ट्विटरवरून हल्ला चढविताना म्हटले होते, ‘आम्ही आमची पितृभूमी कोणालाही देणार नाही!’ जर्मन भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून राज्यघटनेत समाविष्ट करण्याची मागणी ‘एएफडी’ने अलीकडेच केली होती.

जर्मनीचे गीत म्हणून ओळखले जाणारे हे राष्ट्रगीत ऑगस्ट हाइनरिश हॉफमन यांनी १८४१मध्ये लिहिले असून, जोसेफ हेडन यांनी त्याला संगीत दिले आहे. गेली ७६ वर्षे म्हणजे १९२२पासून ते जर्मनीचे राष्ट्रगीत आहे. अगदी नाझी जर्मनीच्या काळातही हेच गाणे राष्ट्रगीत म्हणून वापरले जात होते; मात्र जर्मनीचे एकीकरण झाल्यानंतर १९९१मध्ये त्याचे केवळ तिसरे कडवे राष्ट्रगीत म्हणून गायले जात होते. यातील पहिल्या कडव्यात ‘जर्मनी सर्वांपेक्षा श्रेष्ठ’ असे शब्द असून, ते नाझींनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले होते. त्यामुळेच अनेकांच्या दृष्टीने ते वादग्रस्तही आहे. 

जर्मनी आणि फ्रान्समध्ये राजकीय जागृती मोठी असली, तरी शासनव्यवस्थेत आतापर्यंत पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे तेथील भाषा व राजकीय पदांवरही पुरुषांचाच पगडा राहिला आहे. वर ज्या चान्सेलर आंगेला मेर्केल यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्या कार्यकाळातच या चर्चांना अधिक वाव मिळाला आहे. मेर्केल यांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली, तेव्हा हा मुद्दा प्रथम चर्चेत आला. चान्सेलरसाठी जर्मन भाषेत Kanzeller हा शब्द असून, तो पुरुषवाचक आहे; मात्र आंगेल यांच्या निवडीच्या शक्यतेमुळे त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. आंगेल यांच्यासाठी (कान्त्सलरिन) Kanzellerin हा शब्द सुचविण्यात आला होता. तो स्त्रीवाचक आहे. त्यावरही अनेक भाषातज्ज्ञांनी आक्षेप घेतला होता. अखेर अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर हाच शब्द उपयोगात आणण्याचा निर्णय झाला व आता तोच वापरात येत आहे. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ताही त्यानुसार बदलण्यात आला.

याच प्रकारची समस्या फ्रान्समध्येही उद्‌भवली होती. अध्यक्षांना ‘ल प्रेसिंदेत’ (le président) म्हणण्याची तेथे प्रथा आहे. प्रेसिंदेत हा शब्द पुल्लिंगी असल्याने त्याला पुरुषवाचक आर्टिकल (उपपद) चालत असे; मात्र काही वर्षांपूर्वी सेगोलिन रॉयल यांनी अध्यक्षपदासाठी दमदार दावेदारी केली होती. त्या वेळी त्या निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या वेळी अध्यक्षांना ला प्रेसिंदेत (la président) असे म्हणण्याची वेळ आली होती. ला हे उपपद स्त्रीवाचक असल्याने शुद्ध भाषेच्या समर्थकांच्या भुवया वक्र झाल्या होत्या. रॉयल या तोपर्यंत स्वतःला ‘ल मादाम मिनिस्त्र’ (la madame ministré) असे म्हणवून घेत असत. अर्थात त्या निवडून आल्याही नाहीत आणि तो मुद्दा पुढे गेलाही नाही. 

या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या देशी भाषेतील शब्दांची महती पटू शकते. स्वदेशाला आपण नेहमीच मातृभूमी म्हटले आहे. अगदी आपला राष्ट्रपती हा शब्दही लिंगवाचक नाही. पत म्हणजे प्रतिष्ठा. राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष, ती राष्ट्रपती, असा आपला सरळ साधा हिशेब आहे. त्यामुळेच पंतप्रधान व राष्ट्रपती ही दोन्ही पदे महिलांनी भूषविली, तरी त्यांमध्ये बदल करण्याची गरज आपल्याला वाटली नाही. ‘नित्यनूतनम् सनातनम्’ याचा हा खरा आविष्कार आहे. 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kiran Gokhale About
An interesting article. What about the word 'राष्ट्रपिता' ? Why some of the birds and animals have their gender-specific names in Marathi ? e.g. कावळा, चिमणी, पारवा, कोल्हा, लांडगा, साप (नागीण हे फक्त एका प्रजातीचे स्त्रीरूप आहे), ससा इ.
0
0

Select Language
Share Link