Next
मंगेश पाडगावकर, माधव देशमुख
BOI
Saturday, March 10 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे; तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे....मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ असं म्हणणारे लोकप्रिय भावकवी मंगेश पाडगावकर आणि समीक्षक माधव देशमुख यांचा दहा मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
................
मंगेश पाडगावकर

दहा मार्च १९२९ रोजी वेंगुर्ल्यात जन्मलेले मंगेश पाडगावकर हे अतिशय प्रतिभावंत कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आईमुळे त्यांना कवितेची गोडी लागली. त्यांची आई त्यांना केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता त्यांच्या लहानपणी वाचून दाखवत असे आणि ते बाळकडू मिळालेल्या पाडगावकरांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच कविता लिहायला सुरुवात केली होती.

त्यांच्या कविता मुख्यत्वेकरून प्रेम आणि निसर्ग याविषयीच्या असतात. हळुवार, स्वप्नील भाव त्यांच्या कवितेतून प्रकटतात. एकीकडे निसर्ग आणि प्रेमकविता लिहिणाऱ्या पाडगावकरांनी ‘सलाम’सारखी सामाजिक आणि राजकीय लांगुलचलनावर टीका करणारी कविता लिहिली आणि चक्क मिश्कील, झकास वात्रटिकासुद्धा लिहिल्या. कवितांबरोबरच त्यांनी बोलगाणी, गझल आणि भावगीतं हे प्रांत गाजवले. विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्याबरोबर त्यांचं छान ट्युनिंग जमलं आणि या तिघांनी गावोगावी दौरे करून जवळपास चार दशकं काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि गावोगावच्या लोकांना कवितांचा भरभरून आनंद दिला.

त्यांच्या कवितांना एक सुंदर नाद किंवा गेयता असे. उदाहरणार्थ -  
 
‘इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन
छेडणार जर होत आपण गीत नवे तर
हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर
धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण
इतुके आलो जवळ जवळ की.....’
किंवा

‘मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं...
तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं...’

कविता आणि गीतांखेरीज त्यांनी गद्यलेखनही केलं आहे. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले. बायबलसुद्धा मराठीत आणलं. शेक्सपिअरच्या ‘टेम्पिस्ट’ आणि ‘ज्युलियस सीझर’ नाटकांचे अनुवाद केले. कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारत ग्रंथाचं दोन खंडी भाषांतर केलं. काही बालसाहित्यही लिहिलं आणि समीक्षापर लेखनही केलं. 

२०१० साली भरलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्रभूषण पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

३० डिसेंबर २०१५ रोजी त्यांचं निधन झालं. 

(मंगेश पाडगावकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. पाडगावकर यांच्या काही कवितांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
..................

माधव गोपाळ देशमुख

१० मार्च १९१३ रोजी जन्मलेले माधव गोपाळ देशमुख हे समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. 

ते भारतीय राज्यघटना भाषांतर समितीचे तसंच साहित्य अकादमीचे सदस्य होते. 

मराठीचे साहित्यशास्त्र, भावगंध, साहित्यतोलन, नामदेव, ज्ञानेश्वरी अध्याय चौथा, अशी त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
२४ जून १९७१ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)  
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link