Next
ज्येष्ठ महिला यू-ट्यूबर शेफ बनते, त्याची गोष्ट...!
BOI
Monday, October 01, 2018 | 01:07 PM
15 0 0
Share this article:

माधुरी गद्रे आणि जयराम गद्रे

यू-ट्यूब, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर तरुणांचंच राज्य दिसतं; पण वयानं ज्येष्ठ असल्या तरी मनानं तरुण असलेल्या व्यक्तीही मनात आणलं तर यावर राज्य करू शकतात. पुण्यातल्या माधुरी जयराम गद्रे या त्यापैकीच एक. मुलं-सुनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि पतीच्या सहकार्याने त्यांनी मराठी रेसिपींचं यू-ट्यूब चॅनेल सुरू केलं. दीड वर्षात त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या १५ हजारांवर पोहोचलीय. पदार्थांच्या रेसिपीमध्ये तर त्या माहीर आहेतच; पण या वयात त्यांनी व्हिडिओनिर्मिती आणि सोशल मीडियाची तांत्रिक ‘रेसिपी’ही पूर्णपणे शिकून घेऊन त्यावर प्रभुत्व मिळवलं आहे. आज (एक ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन. त्या निमित्ताने ही एक वेगळी यशोगाथा...
................ 
‘नमस्कार, मी माधुरी गद्रे. यू-ट्यूबवर रेसिपींचं चॅनल चालवते. माझ्या चॅनेलचं नाव आहे माधुरी जयराम. माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ पहा, ते पदार्थ तयार करा आणि तुम्हीही आनंद लुटा. हो, चॅनेल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका हं...’ यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राइब करण्याची ही विनंती एखाद्या तरुणीची किंवा मध्यमवयीन महिलेची असेल असं सहजच तुमच्या मनात आलं असेल; पण ती कोणाची आहे हे वाचलंत तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. त्या आहेत माधुरी जयराम गद्रे नावाच्या ज्येष्ठ महिला. वाटलं ना नवल? पण हे खरंय. स्वयंपाकाची आवड, पती, मुलं-सुनांचा पाठिंबा आणि नव्या गोष्टी शिकण्याची जिद्द या बळावर या सामान्य मध्यमवर्गीय गृहिणीने यू-ट्यूब चॅनेल तर काढलेच, पण त्यावर १५ हजार सबस्क्रायबर्स मिळवले आणि ‘यू-ट्यूब पार्टनर’ हे स्टेटसही त्यांच्या चॅनेलला मिळालं आहे. त्यांचीच ही गोष्ट.

पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या माधुरी गद्रे यांना स्वयंपाक करून सर्वांना खायला घालण्याची खूप आवड. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्या निरनिराळ्या पाककृती शिकल्या. हौसेसाठी शिकलेल्या या पाककृतींचा फायदा भविष्यात यू-ट्यूबर शेफ होण्यासाठी होईल हे त्यांच्या गावीही नव्हतं. पती जयराम गद्रे पुण्यातल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. मुलांची लग्नं झाल्यानंतर दोघांनीही भरपूर प्रवास केला. या प्रवासात माधुरी यांनी मोबाइलवर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी केली. तंत्रज्ञानातल्या या हौसेचाच त्यांना नंतर उपयोग झाला. 

माधुरी गद्रे

मुलगा मिलिंदकडे कॅलिफोर्नियाला गेल्यावर काय करायचं हा प्रश्न होता. तिथं त्यानं एक टॅबलेट देऊन आई-बाबांना चित्रपट, यू-ट्यूब बघायचा सल्ला दिला. ‘माधुरी जयराम’ या यू-ट्यूब चॅनेलची मुहूर्तमेढ नकळत इथं रोवली गेली. स्वयंपाकाची आवड असणाऱ्या माधुरी यांनी यू-ट्यूबवरही स्वाभाविकपणे रेसिपींचे व्हिडिओ बघितले. या व्हिडिओंमध्ये किचन कशी असतात, कोण कशी पाककृती सांगतं, पदार्थांसाठी किती प्रमाणात पदार्थ घ्यावे लागतात याचं निरीक्षण त्यांनी केलं. अमेरिकेतील स्थलदर्शन, टीव्हीवरचं मनोरंजन यानंतरही बराच वेळ मोकळा होता. त्यांनी मुलाला विचारलं, ‘काय करायचं मोकळ्या वेळाचं?’ तो सहजच म्हणाला, ‘आई, तू आता यू-ट्यूब चॅनेल पाहतेसच. तुझ्या रेसिपींचं एखादं चॅनेल काढ.’ त्यांना वाटलं मुलगा चेष्टा करतोय; पण मिलिंद आणि सून पूनम यांनी आग्रह कायम ठेवला. 

पुण्यात आल्यावर मुलगा मंदार आणि सून डॉ. अमृता यांनीही माधुरी यांना खूप पाठिंबा दिला आणि चॅनेल सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला. याबद्दल माधुरी म्हणाल्या, ‘मुलं, सुना, पती जयराम सगळेच पाठिंबा देत होते; पण मी म्हणायचे ‘अरे, चॅनेल चालवणं म्हणजे काय गंमत आहे का? ते सगळं किचकट आहे. व्हिडिओ शूट करायचा, अपलोड करायचा. हे रोज कुठं जमणार आहे?’ मुलांनी पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर १० एप्रिल २०१७ रोजी ‘माधुरी जयराम’ या नावानं मी यू-ट्यूब चॅनेल सुरू करून सोशल मीडियाच्या जगतात प्रवेशकर्ती झाले.’स्वयंपाकाची बाजू पक्की
आई आशालता सोहोनी यांच्याकडून माधुरी अनेक पदार्थ शिकल्या होत्या. लग्नानंतर मोठी नणंद शैलजा वेलणकर यांनीही त्यांना अनेक पदार्थ शिकवले. सोसायटीतील ‘फनफेअर’मध्ये खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणे, छोट्या-छोट्या प्रदर्शनांत सहभागी होणे, केटरिंगच्या लहान-लहान ऑर्डर करून देणे हा सगळा आधीचा अनुभव पाठीशी होता. त्यामुळे त्यांची स्वयंपाकाची बाजू पक्की होती.

सादरीकरणाची तयारी
यू-ट्यूब चॅनेल जगभर बघितलं जाणार, हे मुलांनी सांगितलेलं वाक्य माधुरी यांच्या मनात घर करून राहिलं. त्यामुळे पाककृतींच्या सादरीकरणासाठी त्यांनी भरपूर तयारी केली. घरातलंच किचन, घरातलीच भांडी, साधा-नीटनेटका पेहराव, शूटिंगपूर्वी तो पदार्थ करण्याचा एकदा सराव आणि लेनोव्होचा स्मार्टफोन अशा साहित्यासह या व्हिडिओ शूटिंगचा श्रीगणेशा झाला. आज ११५ व्हिडिओ अपलोड केल्यानंतरही प्रत्येक व्हिडिओच्या शूटिंगपूर्वी त्या तो पदार्थ करून पाहतात. पदार्थांचं प्रमाण लिहून काढतात आणि मगच व्हिडिओ शूट करतात. 

‘...नातिचरामि’
शूटिंग आणि एडिटिंगच्या नव्या इनिंगबद्दल जयराम म्हणाले, ‘मला कॅमेरा हँडलिंगचा सराव होता. त्यामुळे शूटिंग मीच करतो. टीव्हीवरच्या रेसिपींचे व्हिडिओ पाहून मी शूटिंग करायला शिकलो. आता आम्ही एका रेसिपीसाठी १४-१५ छोटे-छोटे व्हिडिओ तयार करतो आणि नंतर ते एडिट करतो. आम्ही अनुभवातून शिकलेल्या या पद्धतीला व्हिडिओ शूटिंगच्या अभ्यासक्रमात ‘शॉट डिव्हिजन’ म्हणतात हे मला नंतर कळलं. पहिले ३० व्हिडिओ मंदारने एडिट करून दिले. ते पाहून मी एडिटिंग शिकलो, नंतर माधुरी शिकली आणि पुढचे ८५ व्हिडिओ तिनेच एडिट केले. सबटायटलिंगसाठीही पदार्थांची नावं गुगलवरून शोधणं, सबटायटलिंग करणं हे सगळं ती पूनमच्या साथीनं सहज करते.’

पहिल्या व्हिडिओची गोष्ट
‘पारंपरिक महाराष्ट्रीय शाकाहारी पदार्थांचे व्हिडिओ अपलोड करायचे हे आम्ही आधीच निश्चित केलं होतं. पूनमनं सूचना केली, की परदेशांतल्या व परराज्यांतल्या प्रेक्षकांना समजण्यासाठी इंग्रजी सबटायटल्स हवीत. म्हणून पहिल्या व्हिडिओपासून आम्ही सबटायटल्स दिली. व्हिडिओ शूट करायची बाजू माझे पती जयराम अतिशय संयमानं सांभाळतात. मी कॅमेरासमोर काय बोलायचं याचं प्रत्येक वाक्य लिहून काढलं. वाटली डाळ करून पाहिली. प्रत्येक पदार्थाचं प्रमाण निश्चित केलं. दोन एप्रिल १७ रोजी आम्ही वाटली डाळ तयार करण्याचा पहिला व्हिडिओ शूट केला. मंदारने तो ‘मायक्रोसॉफ्ट मूव्ही मेकर’मध्ये एडिट केला आणि १० एप्रिल २०१७ रोजी तो अपलोड केला,’ माधुरी उत्साहाने सांगत होत्या. विशेष म्हणजे ‘शूट’, ‘एडिट’, ‘अपलोड’, ‘सबस्क्राइब’, ‘लाइक’, ‘वॉच टाइम’ या सगळ्या संकल्पना त्यांना व्यवस्थित माहीत आहेत आणि अगदी तरुण वापरतात त्याच सहजतेने त्या हे शब्द वापरतात. 

‘यू-ट्यूब पार्टनर’पर्यंत धडक
यू-ट्यूब चॅनेल सुरू करणं सोपं असतं; पण जाहिराती मिळवण्यासाठी यू-ट्यूब पार्टनर होणं आवश्यक असतं. पहिला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर महिनाभरातच जगभरातून व्हिडिओ पाहिल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे प्रेरणा मिळाली आणि व्हिडिओंची संख्या वाढत गेली. जानेवारी २०१८मध्ये यू-ट्यूबने चॅनेलला जाहिराती दिल्या; पण त्या काही दिवसांतच बंद झाल्या. नंतर फेब्रुवारीत यू-ट्यूबने ई-मेलद्वारे कळवलं, की चॅनेल सुरू केल्यापासून कॅलेंडरनुसार एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम झाला तरच ‘मॉनेटायझेशन’ सुरू होईल. म्हणजे ही अट पूर्ण केली, तरच तुमच्या चॅनेललला यू-ट्यूबकडून जाहिराती मिळतील आणि त्याबद्दल तुम्हाला पैसे (डॉलर) देण्यात येतील. गद्रे दाम्पत्याच्या चॅनेलला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी साधारण दीड महिन्याचा अवधी होता. त्यातच २६० सबस्क्रायबर आणि २७०० तासांचा वॉच टाइम वाढवण्याचं नवं आव्हान उभं राहिलं. पैसे कमावणं हा मूळचा हेतू नव्हता. वेळ घालवणं, हौस भागवणं हा हेतू होता; पण आव्हान उभं राहिल्यावर दोघांनीही कंबर कसली. माधुरी यांनी आपले नातेवाईक, समवयस्क मैत्रिणी, परिचितांना आपलं चॅनेल पाहून सबस्क्राइब करायला सांगितलं. तोंडी प्रचारावर जोर दिला. मग सबस्क्राइब म्हणजे काय असतं, ते कसं करायचं हे सगळं समजवून सांगितलं. दुसरीकडे वॉच टाइम वाढवण्याच्या लक्ष्यासाठी दोघांनीही व्हिडिओंची संख्या वाढवली. 

त्याबाबत माधुरी म्हणाल्या, ‘आधी आम्ही वेळ मिळेल तसा आठवड्यातून एखादा व्हिडिओ अपलोड करायचो. नंतर आठवड्यात तीन-चार व्हिडिओ अपलोड करू लागलो. पाककृती सांगताना मी स्वयंपाकातलं कोणतंही गुपित राखून ठेवलं नाही. अगदी माझी मुलं-मुली, शिकायला घरापासून दूर राहिलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी हा व्हिडिओ पाहतील असं समजून सोप्या पद्धतीने पदार्थांची कृती सांगितली. मग साध्या चटण्यांपासून अवघड पुरणपोळीपर्यंतचे पदार्थ त्यात आले. प्रतिक्रियांमधून मागणी व्हायला लागली. त्यानुसार पदार्थही बदलले. एक महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या नावात ‘रेसिपी’ हा शब्द घातल्यानं खूप मोठा फरक पडला. सर्चमध्ये खूप मागे असलेला माझा व्हिडिओ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आला. गेल्या वर्षी गणपतीपूर्वी टाकलेला उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ १४ मिनिटांचा आहे; पण तो सगळे जण पूर्ण पाहतात आणि त्यातून मला निम्मे पैसे मिळाले.’ 

‘या सगळ्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि चॅनेलला वर्ष होण्यापूर्वीच आम्ही यू-ट्यूबचे पार्टनर झाल्याचा ई-मेल आला. आमच्या चॅनेलला जून २०१८पासून जाहिराती मिळणं सुरू झालं. चॅनेलला सव्वा वर्ष झाल्यावर जाहिरातींचे ३७० अमेरिकी डॉलरही आमच्या यू-ट्यूब खात्यात जमा झाले,’ असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास झळकत होता.

प्रतिक्रियांचा पाठिंबा आणि कौतुकाचा वर्षाव 
माधुरी यांच्या या प्रयत्नांबद्दल आणि यशाबद्दल नातेवाईक, मित्र-मैत्रिणी सर्वांनीच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यू-ट्यूबवर अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या मधुराज रेसिपीज, निशा मधुलिका, राजश्री रसोई यांनीही माधुरी यांचं चॅनेल सबस्क्राइब केलं. ‘तुम्ही दाखवलेले पदार्थ आम्ही आईच्या हातचे खाल्ले आहेत. त्यामुळे व्हिडिओ पाहून आईची आठवण झाली,’ अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या सुमेधा फडके, अलमास खान यांच्यासह अनेक पुरुषही या चॅनेलचे चाहते आहेत. व्हिडिओप्रमाणे गुलाबजाम केले आणि ते उत्तम झाल्याबद्दल विनोद गोडसे यांनी धन्यवादही दिले आहेत. 

गद्रे दाम्पत्याला या संपूर्ण डिजिटल प्रक्रियेचं एक अक्षरही माहिती नव्हतं; पण नवं शिकण्याची जिद्द आणि प्रयत्न या बळावर त्यांनी सोशल मीडियाच्या जगतात ‘यू-ट्यूब पार्टनर’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चॅनेलच्या सबस्क्रायबर्सची संख्या आता १५ हजारांवर पोहोचली आहे. माधुरी यांना ही नवी डिजिटल ओळख सांगताना खूप अभिमान वाटतो. 

माधुरी यांच्या चॅनेलची लिंक : https://www.youtube.com/c/madhurijayram

अमोल अशोक आगवेकर
ई-मेल : amolsra@gmail.com

(माधुरी आणि त्यांचे पती जयराम गद्रे यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. वैविध्यपूर्ण पाककृतींबद्दलचे बाइट्स ऑफ इंडियावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mrs. Anjali Purandare About 148 Days ago
खूप छान वाटलं! तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळत राहो ही सदिच्छा. मी दोनच दिवसांपूर्वी तुमचं चॅनेल सबक्राइब केलं आहे. बरेचसे व्हिडियोज् बघितले. खास आपले पण आता काहीसे विस्मरणात गेलेले पदार्थ बघून खूपच आनंद झाला! असेच चांगले चांगले पदार्थ बघायला मिळोत.
0
0
रंजना खरे About 356 Days ago
मामी मस्त वाटले वाचून.. अशाच आम्हाला नवीन नवीन पदार्थ शिकवत रहा..
0
0
Amruta Apte About 357 Days ago
खूप छान 👌
1
0

Select Language
Share Link
 
Search