Next
रांगोळ्यांमधून साकारला संभाजी महाराजांचा इतिहास
श्रीरंग कलादर्पण संस्थेतर्फे मृत्युंजय छत्रपती प्रदर्शनाचे आयोजन
BOI
Monday, January 14, 2019 | 04:13 PM
15 0 0
Share this article:


पुणे : छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, त्यांना झालेला मातृशोक, जिजाऊंनी त्यांच्यावर केलेले संस्कार, आग्य्राहून सुटका, संगमेश्वरी झालेली फितुरी अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील जन्मापासून मृत्यूपर्यंतचे विविध प्रसंग भव्य रांगोळ्यांमधून जिवंत झाले होते. निमित्त होते श्रीरंग कलादर्पण संस्थेतर्फे आयोजित मृत्युंजय छत्रपती रंगावली प्रदर्शनाचे. पं. नेहरू सांस्कृतिक भवनामधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन  भरवण्यात आले असून, सोमवार,१४ जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत  सुरू राहणार आहे. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनदेखील येथे मांडण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रंगावली कलाकार अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या ५० विद्यार्थ्यांनी या रंगावली साकारल्या आहेत. 


या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ रंगावली कलाकार जगदीश चव्हाण, इतिहास अभ्यासक श्रीनिवास पेंडसे, दिनकर थोपटे, अक्षय शहापूरकर उपस्थित होते. या प्रदर्शनात अक्षय शहापूरकर यांनी ‘टू इन वन’ रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, पाण्यावरील व पाण्याखालील रांगोळी अशा विविध प्रकारच्या रंगावली साकारल्या आहेत. त्यांच्यासह जयंत गुरव, प्रतीक अथने, कौस्तुभ वर्तक, मानसी बिडलान, नीता पवार, अनिता खांदवे, अश्विनी ववले यांनी प्रदर्शनाचे संयोजन केले आहे. 


‘संभाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग रांगोळीतून अत्यंत जिवंत साकारण्यात आले आहेत. परंतु, त्यांच्या चरित्रातून आपण काहीतरी शिकण्याची गरज आहे. केवळ शिवाजी महाराज की जय.. आणि संभाजी महाराज की जय.. असे म्हणण्यापेक्षा त्यांच्या चरित्राचा अभ्यास करा,’ असे आवाहन मृणाल कुलकर्णी यांनी या वेळी केले. 

चारुदत्त आफळे म्हणाले, ‘व्यक्त होण्यासाठी केवळ शब्द हीच भाषा नसून, अशाप्रकारे रंगावलीच्या माध्यमातूनदेखील व्यक्त होता येते. हे या प्रदर्शनातून सिद्ध झाले आहे.’


अक्षय शहापूरकर म्हणाले, ‘संभाजी महाराजांचे चरित्र जनमानसापर्यंत पोहोचावे यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.’  

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ रांगोळी कलेसाठी कार्यरत असलेले ज्येष्ठ रंगावली कलाकार महादेव गोपाळे यांना ‘श्रीरंग कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search