Next
‘पुलोत्सवा’तील सामाजिक कृतज्ञता पुरस्कार डॉ. हेडगेवार प्रकल्पाला
BOI
Monday, December 10, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this story

पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मनोज देसाई यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. हेडगेवार स्मृती प्रकल्पाचे व्यवस्थापक एकनाथ सावंत.

रत्नागिरी :
रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या ‘पुलोत्सवा’त विविधरंगी कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कृतज्ञता सन्मानही प्रदान करण्यात आला. माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाचे व्यवस्थापक एकनाथ सावंत यांनी ‘आर्ट सर्कल’चे मनोज देसाई यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. आठ डिसेंबर २०१८ रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सोहळा झाला. श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह आणि धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‘आर्ट सर्कल’सोबतच डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या माऊली प्रतिष्ठाननेही प्रकल्पाला धनादेश दिला. निवड समितीचे सदस्य सुहास विद्वांस या वेळी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यंदा पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पुलसुनीत’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत माऊली प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारी १० हजार रुपयांची रक्कम वाढवून १५ हजार करण्यात आली, तर ‘आर्ट सर्कल’तर्फे प्रति वर्षी देण्यात येणारी ११ हजार रुपयांची रक्कम वाढवून २१ हजार रुपये करण्यात आली. 

एक झुंज वाऱ्याशी..
पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर पु. ल. देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाचा प्रयोग झाला. रशियन नाटककार व्हॅलदलीन दोझोत्सेव यांच्या ‘दी लास्ट अपॉइंटमेंट’ या रशियन नाटकाचे हे रूपांतरण. महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित आणि सचिन जोशी दिग्दर्शित या नाटकातील कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. उत्कृष्ट संवादफेक, सहजसुंदर वावर, आवाजाचा उत्तम वापर याच्या जोडीला देखणे नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाशयोजना, साजेसे संगीत या सगळ्यामुळे रसिकांना एका सर्वांगसुंदर कलाकृतीची अनुभूती घेता आली.

डॉ. हेडगेवार प्रकल्पाविषयी...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये १९८९ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या सेवा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. स्थानिक पातळीवर रोजगारांची निर्मिती होऊन नागरिकांना अर्थार्जन करता यावे, यासाठी हा प्रकल्प कार्यरत आहे. फळप्रक्रिया उद्योग, जैविक शेती, ससेपालन, गोपालन, कंपोस्ट आणि गांडूळ खतनिर्मिती, भाजीपाला उत्पादन या गोष्टींबरोबरच संगणक प्रशिक्षणासारखे कोर्सेसही संस्थेमार्फत शिकविले जातात. त्याचा उपयोग स्थानिक नागरिकांना होत आहे. या प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी http://www.hedgewarprakalp.org/ या वेबसाइटला भेट द्यावी. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link