Next
‘दूध उत्पादकांच्या मदतीसाठी केंद्राकडे मागणी करणार’
BOI
Monday, June 18, 2018 | 11:19 AM
15 0 0
Share this story

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी आणि पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मान्यवर.

सोलापूर : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे’, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी आणि पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील, अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी, गुलबर्गा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुवर्णा मल्लाजी, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन १८ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

खोत म्हणाले, ‘ऊस उत्पादकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी साखरेचा विक्री दर निश्चित केला.  त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना मदत देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना अनुकूल ठरेल, असे निर्यात धोरण राबवण्यावर केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारच्या दरबारी मांडत आहोत.’

‘कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी आणि उत्पादक यांच्यात दुवा तयार होतो. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होते.  त्यांना नवीन माहिती मिळते यासाठी कृषी प्रदर्शन भरवणे आवश्यक आहे,’ असे खोत म्हणाले.

या वेळी कृषी विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपसंचालक रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषी विकास अधिकारी बेंदगुडे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link