परिस्थितीने गांजलेल्या फोटोग्राफरला कॅमेरा भेट देऊन नवजीवन
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाचा हृद्य उपक्रम
BOI
Sunday, August 19, 2018 | 05:21 PM
1500
Share this story
सोलापूर : ‘एक छायाचित्र हजार शब्द बोलते,’ असे म्हटले जाते. सोलापूरमधील फोटोग्राफर राजू स्वामी उर्फ शिवबाबा यांचे सोबतचे छायाचित्रही तसेच बोलके आहे. काही कारणामुळे सर्वस्व हरवून उपासमारीची वेळ आलेल्या या ज्येष्ठ फोटोग्राफरची दैना न पाहवून त्यांना जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून कॅमेरा भेट देण्यात आला. त्यामुळे त्यांना नवे जीवन सुरू करता येणार आहे. पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाने अत्यंत संवेदनशीलपणा दाखवून अनोख्या पद्धतीने छायाचित्रण दिन साजरा केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेवते (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील राजू स्वामी यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात एक काळ चांगलाच गाजवला होता. शिवबाबा फोटोग्राफर म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. असा गाजलेला फोटोग्राफर या क्षेत्रातून अचानक गायब झाला. त्याची हुरहुर पंढरपूर तालुक्यातील छायाचित्रकारांना लागली होती. काहींनी शोध घेतला, तेव्हा त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्यामुळे ते एकटे पडल्याचे समोर आले. घरदार सोडून भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली. या काळात त्यांना एक वेळच्या खाण्याचेही वांदे झाले होते. अशा प्रकारे हाल-अपेष्टा सहन करत उपाशीपोटी रात्र काढणारा हा कलाकार अंगावर मळकट कपडे, वाढलेली दाढी, खोलवर गेलेले डोळे अशा अवतारात भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावरून अनवाणी फिरत असल्याचे पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाचे बशीर शेख, श्रीकांत लव्हेकर, विनायक देवकर, श्रीकांत बडवे, बापू कदम, सचिन कुलकर्णी आदींनी दिसले. तेव्हा त्याची ही दुरवस्था पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. त्याच क्षणी या माणसाला संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय सर्वांनी घेतला.
त्यांचा प्राण कॅमेऱ्यातच आहे. त्यामुळे त्यांना कॅमेरा घेऊन देण्याचा एकमुखी निर्णय झाला. मंचाच्या वतीने राजू स्वामी यांना जागतिक छायाचित्रण दिनाचे (१९ ऑगस्ट २०१८) औचित्य साधून नवीन कपडे आणि निकॉन कंपनीचा उत्तम डिजिटल कॅमेरा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे स्वामी यांना भरून आले. ‘खऱ्या अर्थाने माझा आत्मा मला परत मिळाला,’ अशी भावना व्यक्त करून स्वामी यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ‘पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या सदस्यांनी मला जगण्याचे बळ दिले आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या वेळी ज्येष्ठ छायाचित्रकार लालासाहेब खिस्ते, मिलिंद गाताडे, ‘कला व्हिडिओ’चे शशिकांत भोसले, ‘विजया कलर लॅब’चे नागेश कामत, गोविंद गाडे आदी मान्यवरांबरोबर पंढरपूर शहर व तालुक्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘राजू स्वामींना आमची ही भेट नक्कीच स्वाभfमानाने जगण्यासाठी उपयोगी ठरेल,’ अशी भावना पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाचे बशीर शेख यांनी व्यक्त केली.