Next
ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न
महिमतगडाच्या स्वच्छतेसाठी संगमेश्‍वर तालुक्यातील निगुडवाडीकरांचा पुढाकार
संदेश सप्रे
Monday, January 07, 2019 | 04:36 PM
15 0 0
Share this story

महिमतगड सफाई मोहिमेत सहभागी झालेले निगुडवाडी समन्वय समिती मुंबई आणि स्थानिक कमिटीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ.

देवरुख : एकीकडे राज्यभरातील शिवकालीन ठेव्यांची दुर्दशा, पडझड होत असतानाच दुसरीकडे मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील निगुडवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत शिवकालीन महिमतगडाची संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानीही वेळ काढून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. निगुडवाडी ग्रामस्थांचे हे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे.

ऑक्टोबर २०१८पासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. संगमेश्‍वर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतराजींवर प्रचितगड आणि महिमतगड असे दोन किल्ले आहेत. दोन्ही गडांची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली होती. यातील महिमतगडाची बांधणी दक्षिणकडे स्वारीवर जाणार्‍या मावळ्यांना विश्रांतीसाठी करण्यात आली होती. पाहुण्यांच्या विश्रांतीची जागा म्हणून मेहमान गड मात्र, त्याचा अपभ्रंश होऊन गडाचे नाव महिमतगड पडले. गडाची तटबंदी अजूनही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. प्रवेशद्वार, घोडेतलाव, गोड्या पाण्याचा तलाव, भुयार, भवानीमातेसह अन्य देवतांची मंदिरे, तोफा आदी ऐतिहासिक ऐवज गडावर आहे.

प्रचितगडाच्या तुलनेत चढण्यास सोपा असलेल्या या गडाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याच्या दृष्टीने निगुडवाडी ग्रामस्थ गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत; मात्र त्याला शासनाने दाद दिली नाही. अखेर गावाजवळ असलेले ऐतिहासिक वैभव आपणच संवर्धित करायचे या हेतूने ग्रामस्थ प्रेरित झाले. मुंबई निगुडवाडी समन्वय समितीचे अध्यक्ष महेश गुरव, सरचिटणीस सुनील जाधव यांच्या माध्यमातून मुंबई आणि स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी या शिवकालीन गडाचे संवर्धन करण्याचा एकमुखी ठराव केला आणि तसे नियोजन करण्यात आले आहे.

गडाकडे जाणारा रस्ता साफ करताना ग्रामस्थ.

मुंबईतून युवकांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने प्रत्येक महिन्याचे दोन दिवस अंगमेहनत करून गडावर योगदान देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १० आणि ११ ऑक्टोबर, १५ व १६ नोव्हेंबरला चाकरमान्यांसह स्थानिकही या मोहिमेत सहभागी झाले. गडाकडे जाणारी वाट साफ करण्यात आली, शिवाय प्रवेशद्वार स्वच्छ करण्यात आले. गडाकडे जाणार्‍या मार्गावर दिशादर्शक फलक उभारण्यात आला. झाडा-झुडपांनी, वेलींनी वेढलेल्या भिंतीनी मोकळा श्वास घेतला. १०० पेक्षा अधिक जण या कामात गुंतले होते. आता १९ आणि २० जानेवारी २०१९ला ही मोहीम राबविण्यात येणार असून, ती मे महिन्यापर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, निगुडवाडी समन्वय समितीतर्फे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच, स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांना महिमतगड संवर्धनाबाबत निवेदन देण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मोहिमेत शासनानेही सहकार्य करण्याची अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

संपर्क : महेश गुरव- ९८१९० ६५७७१
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link