Next
‘बंधुतेशिवाय स्वातंत्र्य, समता अर्थहीन’
डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत
BOI
Thursday, December 20, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this story

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सत्कारावेळी (डावीकडून) डॉ. अशोक पगारिया, प्रकाश रोकडे, उल्हासदादा पवार, डॉ. श्रीपाल सबनीस, चंद्रकांत वानखेडे, प्रकाश जवळकर व डॉ. अशोक शिंदे

पुणे : ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या चार मूलभूत तत्वांवर भारताचे संविधान आधारले आहे. त्यातील केवळ स्वातंत्र्य व समता या दोन गोष्टींवरच अधिक भर दिला गेल्याने बंधुतेला दुय्यम स्थान मिळाले. परिणामी आज जाती-धर्म, गरीब-श्रीमंत अशा वर्गीय संघर्षात आपण अडकलो आहोत. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य व समतेला अर्थ नाही. त्यामुळे संविधानाची मूलभूत तत्वे प्रत्यक्षात आणून मानवता रुजवायची असेल, तर समाजात बंधुता पेरण्याची आणि रुजविण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांचा ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.   महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, काषाय प्रकाशनचे संचालक व कवी चंद्रकांत वानखेडे, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे उपस्थित होते. 

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘या चारही मूल्यांना सामान महत्व मिळायला हवे. जगभरातील आजची स्थिती पाहता बंधुता रुजविण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. बंधुतेचा विचार काळजाला भिडला, तरच बंधुतेचा नकाशा आपल्याला कायम ठेवता येईल. दहशतवाद, नक्षलवाद आणि इतर अशा संकटाना सामोरे जाण्यासाठी बंधुता मोलाची ठरणार आहे. साहित्य क्षेत्रातील काही मंडळींनी आपले स्वतःचे कंपू बनवून स्वार्थ साधला. मात्र, बंधुतेचा विचार पेरण्याचे काम प्रकाश रोकडे आणि त्यांचे सर्व सहकारी करीत आहेत. त्यांच्या कार्यात जात-धर्म, स्त्री-पुरुष असा भेदाभेद नाही. त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापेक्षाही जास्त आनंद बंधुता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर वाटतो आहे.’

उल्हास पवार म्हणाले, ‘वैचारिक मतभिन्नतेनंतरही परस्परांत आपुलकी जपण्याचा विचार बंधुतेमुळे रुजतो. आज भारतासह जगाला बंधुता जोपासण्याची गरज आहे. तसे झाल्यास खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळाल्याची भावना जनमनात निर्माण होईल. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ‘आम्ही भारतीय’ ही भावना आपल्या प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी एकोणिसाव्या शतकात मांडलेले विचार आजही आदर्शवत आहेत. त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे.’

अध्यक्षीय भाषणात  प्रकाश रोकडे म्हणाले, ‘सगळ्या धर्मातील तत्वज्ञान मार्गदर्शक आहे. बंधुतेचा विचार घेऊन गेली अनेक वर्षे कार्य करताना माणूस जोडत गेलो आहे. तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बंधुता साहित्याचे उगमस्थान आहेत. त्यांचा विचार घेऊन आपण प्रत्येकाने माणूस म्हणून जगले पाहिजे.’

डॉ. सबनीस यांच्या सत्कार सोहळ्याबरोबरच प्रबोधनयात्री कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुंबईचे संदीप कांबळे, दौंडचे बबन धुमाळ, ठाण्याचे विजय जाधव, पुण्याचे डॉ. भीम गायकवाड, संतोष घुले या कवींचा सहभाग होता. डॉ. अशोककुमार पगारिया यांनीही आपले विचार मांडले. 

प्रास्ताविक प्रकाश जवळकर यांनी केले. सूत्रसंचालन संगीता झिंजुरके यांनी केले. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link