Next
पुणे-नाशिक प्रवास आता केवळ दीड तासांचा
फेब्रुवारी २०१९पासून कामाला पुण्यातून होणार सुरुवात
BOI
Friday, December 21, 2018 | 04:37 PM
15 0 0
Share this story

नाशिक : रेल्वे खात्याने प्रवाशांना गुणवत्तापूर्ण प्रवास करायला मिळावा यासाठी निरनिराळ्या योजना आखल्या असून, पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्ग हा त्याचाच एक भाग आहे. या लोहमार्गाचे काम फेब्रुवारी २०१९पासून सुरू होणार आहे. २३१ किलोमीटरच्या हायस्पीड लोहमार्गाचे काम झाल्यानंतर पुण्याहून नाशिकला येण्यासाठी केवळ दीड तासाचा अवधी लागणार आहे.

पुणे ते नाशिक हायस्पीड लोहमार्ग होण्यासाठी २००५च्या रेल्वे अर्थसंकल्पापासून लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. बजेट मोठे असल्याने हा लोहमार्ग करणे शक्य नव्हते; मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली असून, यासाठी साडेसातशे कोटींचा खर्च केंद्र शासन करणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल) या कंपनीची स्थापना केंद्र शासनाने केली असून, याचे कार्यालय सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. पुण्यात या कंपनीचे कार्यालय सुरू करण्याचा शासनाचा मानस असून हायस्पीड लोहमार्गाचे काम फेब्रुवारीत सुरू करण्याआधी हे कार्यालय पुण्यात सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुणे ते नाशिक प्रवास करण्यासाठी एक नवीन लोहमार्गाची निर्मिती करण्यात येणार असून, यासाठी तेराशे हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. पुणे-नाशिक हा मार्ग पुणे जिल्ह्यातील वाघोलीपासून सुरू होऊन आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि नाशिक असा प्रवास करणार आहे. यात २१ स्थानके केली जाणार आहेत. या गाडीचा वेग ताशी १८० ते २०० किमी असून, पुण्याहून नाशिकला अवघ्या दीड ते पावणेदोन तासांत प्रवासी पोहोचू शकणार आहे. शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, नोकरदारांना हा लोहमार्ग ऊर्जितावस्था देणार आहे.

सध्या रस्त्याने पुण्याहून नाशिकला येण्यासाठी सुमारे पाच ते सहा तासांचा अवधी लागतो. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्याने यात वाढही होते. शिक्षण आणि नोकरीनिमित्त पुण्याला गेलेले अनेक विद्यार्थी, नोकरदारांना तिथेच राहावे लागते. अशा विद्यार्थी, शेतकरी, नोकरदारांसह सामान्य प्रवाशांचा हा हा वनवास वाचावा या उद्देशाने हा लोहमार्ग तयार करण्यात येणार आहे. एका दिवसात जाऊन येऊन केवळ तीन ते चार तास एका प्रवाशाला लागू शकतात असा अंदाज रेल्वेच्या हायस्पीड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने व्यक्त केला आहे.

या लोहमार्गासाठी साडेसातशे कोटींचा निधी खर्च होणार असून, केंद्र शासन यात पंधराशे कोटी, राज्य शासनाकडून पंधराशे कोटी आणि गुंतवणूकदारांकडून कर्ज आणि वित्तीय संस्थांकडून चार हजार पाचशे कोटींचा आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. हा प्रकल्प फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असल्याचा अंदाज ‘महारेल’कडून वर्तविण्यात आला आहे.

लोहमार्गाचे काम तीन ते चार वर्षांत होणार असून, सामान्य प्रवाशांसाठी विशेष सुविधा म्हणून रेल्वे खात्याने या मार्गाची तरतूद केली आहे. या विशेष रेल्वे लोहमार्गामुळे वेळ वाचणार असून, याचा फायदा नाशिककरांना आणि पुणेकरांना होणार आहे. यामुळे दळणवळण, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक घडामोडींनाही उर्जितावस्था मिळणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link