Next
आणखी एक प्रश्न सुटला होता...
BOI
Tuesday, May 08, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:


दररोज साळ काढून तांदळाचा भात बनवायचा हे आता हंग्रूममधील आदिवासींना अवघड होत होते. त्यांच्यासाठी सायकल वापरून भात सडायचे यंत्र बनवता आले, तर बरे होईल असे वाटत होते. एखादे ध्येय गाठायचे झाल्यास, आपला मार्ग आपोआप प्रशस्त होत जातो, हे मला हंग्रूमच्या अनुभवातून समजले होते. या वेळीही असेच झाले होते.... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभव कथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’ या लेखमालिकेचा हा नववा भाग...  
.......................................
हंग्रूमला असताना तेथील वयस्कर महिलांनी मला विनंती केली होती, ‘मामा, हम लोग अभी बुढा टोरटा है, हम रोज ओखली मे हान से धान का भुसा निकालते है. हम कमजोर हो रहा है. कोई ऐसी मशीन बनाव, की हमारी मेहनत बच जाय और धन का भुसा भी निकले..’ त्यांची तक्रार योग्य होती. शेतीव्यतिरिक्त इतर काही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे गावातील तरुण उद्योगधंद्यासाठी बाहेर जात असत. भात हे त्यांचे एकमेव अन्न. साळ रोज काढल्याशिवाय तांदूळ मिळणार नाही आणि या वयात आता तांदूळ काढायची शक्ती नाही. यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार मनात सतत घोळत असे. 

हंग्रूममध्ये एकाकडे डिझेलवर चालणारी भाताची गिरणी आहे; पण डिझेल महाग, त्यात ते ८० किलोमीटरवरून आणावे लागत असे. ते परवडत नव्हते, म्हणून ती गिरणी बंद पडली होती. मध्यंतरी ‘थ्री इडियट्स’ सिनेमामध्ये स्कूटरवर चालणारी पिठाची गिरणी, सायकल वापरून लोकर कापण्याचे यंत्र वैगरे पाहिले होते. असेच काहीतरी करायचे मनात घोळत होते. सायकल वापरून भात सडायचे यंत्र बनवता आले, तर बरे होईल असे वाटत होते. 

एखादे ध्येय गाठायचे झाल्यास, आपला मार्ग आपोआप प्रशस्त होत जातो, हे मला हंग्रूमच्या अनुभवातून समजले होते. या वेळीही असेच झाले होते. वृत्तपत्रात लेखन करणारी सायली आठल्ये नावाची पुण्याची एक मुलगी आहे. एकदा झालेल्या लेखकांच्या कार्यक्रमात योगायोगाने सायलीची भेट झाली. सायलीचे वडील शिरीष आठल्ये हे ‘मॉडर्न टेक्निकल सेंटर’मध्ये काम करत होते. हे सेंटर चंद्रकांत पाठक चालवत असत. ग्रामीण भागात सायकल व बैलांचा वापर करून चालवता येणारी शेतीसाठी उपयुक्त अवजारे ते तयार करत. त्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे सन्मानितही करण्यात आले आहे. आठल्येंनी मला ‘मॉडर्न टेक्निकल सेंटर’मध्ये तयार होणाऱ्या अवजारांचे कॅटलॉग आणून दिले. ते पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, पाठकसाहेब मला माझ्या कामासाठी मार्गदर्शन करू शकतील. 

त्यांनी केलेले कार्य पाहून पहिल्या भेटीतच माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. मी त्यांना माझ्या आसाममधील कार्याचा परिचय करून दिला. आदिवासींसाठी मी करत असलेले कार्य पाहून, तेही प्रभावित झाले व सायकलवर चालणारे तांदूळ सडायचे यंत्र तयार करून देईन, असा त्यांनी विश्वास दिला; पण दुर्दैवाने त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यानंतर ‘मॉडर्न टेक्निकल सेंटर’ची धुरा त्यांचे सुपुत्र केदार पाठक यांच्याकडे आली. केदार यांनीही मग मला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्याकडे सायकल युनिट तयार होते. भाताचे यंत्र व ते बसवण्याचा सांगाडा तयार करावा लागणार होता. पुण्यात भाताच्या यंत्राची चौकशी केली. ते ११ हजार रुपयांना असल्याचे समजले. हे यंत्र पुण्याहून गुवाहाटीला पाठवायचा खर्च वेगळा. त्यापेक्षा गुवाहाटीला भाताचे यंत्र  घेण्याचे ठरवले. 

संपूर्ण भाताच्या गिरणीचा खर्च अंदाजे २० हजार रुपये होणार होता. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. म्हणून तुळशीबागेसमोरील वैद्य जोशींच्या प्रमुख ठमा आजींना भेटलो. त्यांना माझे प्रयोजन सांगितले. त्यांनी लगेच पाच हजार रुपये दिले, तसेच त्यांचे बंधू अच्युतदादा फडके यांनीही पाच हजार रुपये दिले. पाटसकरांचे स्नेही, त्यांनीही पाच हजार दिले. अशी पैशांची जुळवाजुळव झाली. केदार पाठक यांनी सायकलचा भाग रेल्वेने गुवाहाटीला पाठवला. ‘उत्तर पूर्वांचल जनजाती सेवासमिती’चे विश्व हिंदू परिषदेचे गुवाहाटीचे सचिव सूर्यप्रकाश राव यांनी हे पार्सल आपल्या ताब्यात घेऊन परिषदेत ठेवले. 

एप्रिल २०१४मध्ये मी गुवाहाटीला गेलो. आता भाताची गिरणी व त्याला आधार देणारा स्टँड तयार करून संपूर्ण यंत्राची जोडणी करायची होती. हाफलांगहून आराबाबांना बोलावून घेतले. पुढे त्यांनाच ते यंत्र हाताळायचे होते, म्हणून त्याच्या जोडणीपासून त्यांनी ते पाहिलेले असावे असा उद्देश होता. म्हणजे पुढे त्यात काही समस्या आली, तर त्यांना पुण्याहून मार्गदर्शन करणे सोपे होईल. गुवाहाटी मला तसे नवीन असल्याने, तिथे चांगला फॅब्रिकेटर देण्याची मी राव यांना विनंती केली. त्यांनी मला विश्व हिंदू परिषदेचे कार्यवाह मोहनलालजी अग्रवाल यांचे चिरंजीव आदित्य यांना भेटायला सांगितले. ते गुवाहाटीतले खूप मोठ्या स्टेनलेस स्टील कंपनीचे मालक आहेत. त्यांचा अनेक घरगुती गोष्टींचा मोठा उद्योग आहे. 

आदित्यजींना भेटून मी माझा प्रकल्प सांगितला. त्यांनाही तो खूप आवडला. त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सुशील रॉय यांची गाठ घालून दिली. त्यांच्याकडे पुण्याहून आणलेले सायकल युनिट पोहोचवले. आता भात गिरणी शोधायला सुरुवात केली. त्यांच्या ओळखीने गिरणीही मिळाली. सुशीलजींच्या वर्कशॉपमध्ये यंत्र आकार घेत होते. जोडणी पूर्ण झाली. सायकलवर चालणारे यंत्र पाहून सर्वांनाच कौतुक वाटत होते. यंत्राची शक्ती वाढवण्यासाठी आपण थोडे मोठे चाक लावू या, असे सुशीलजी म्हणाले अशा प्रकारे भाताचे यंत्रही देणगी म्हणून मिळाले. सुशीलजींच्या वर्कशॉपमध्ये भात सडायचे यंत्र सायकलवर चालायला लागले. 

आता यंत्राची चाचपणी घ्यायची होती; पण साळ कुठेच मिळेना. शेवटी अराबाबांनी हाफलांगहून पाच किलो साळ मागवली. ती तिसऱ्या दिवशी गुवाहाटीला आली. गंमत म्हणजे यंत्र कसे लागले, याची माहिती कोणालाच नव्हती. मी तिथून केदार पाठक यांना विचारणा केली व त्यांनी सांगितल्याप्रमाणे बांधणी करू लागलो. बऱ्याच प्रयत्नांनंतर यंत्र व्यवस्थित काम करू लागले. मी सुशीलजींचे अभिनंदन केले व आभारही मानले. यंत्राचा स्टँड व इतर खर्च जवळपास सहा हजार रुपये आला. मी आदित्यजी व अर्चना मशिनरीमध्ये भेट देऊन त्यांचेही आभार मानले. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र स्त्री-पुरुष, मुले-मुली कोणीही चालवू शकते. साधारण ११ मिनिटांत एक किलो तांदूळ कांडला जातो. 

विश्व हिंदू परिषदेच्या पांचजन्य भागामध्ये ‘राणी माँ गायदेन्त्यू’ यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासंदर्भात एक मीटिंग होती. त्याला रामकुइंगजी, ‘राणी माँ’वर पुस्तक लिहिणारी लेखिका तासिले आदी व्यक्ती आल्या होत्या. त्यांना सुशीलजींच्या वर्कशॉपमध्ये नेऊन यंत्र दाखवले. सर्वांनाच ते खूप आवडले व अशाच यंत्राची आता गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आता यंत्र हाफलांगला न्यायचे होते. तीन-चार दिवसांत ते यंत्र पार्सलने हाफलांगला पोहोचले. आराबाबा म्हणाले, की त्यांना यंत्राची गरज आहे. म्हणून त्यांनी थोडेसे पैसे देऊन ते यंत्र आपल्याकडे ठेवले आहे. 

मी केलेल्या कामाचे जसे कौतुक होत होते, तसेच मला विरोधकही निर्माण होत होते. त्यांची माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागली होते. मी एक गोष्ट कटाक्षाने पाळत होतो. कोणाकडून मी फार मोठ्या अपेक्षा बाळगून नव्हतो. आपण ईशान्य भारतातील कार्य आपल्या मनाने स्वीकारले आहे. जोपर्यंत शरीर साथ देत आहे, तोपर्यंत काम करायचे. नंतर आपण केलेले काम आठवून जे समाधान मिळेल, ते नक्कीच छान असणार आहे, हा विश्वास कायम ठेवला..
                                                                          
(क्रमशः)    
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी  ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search