Next
‘वनराई’ करणार ‘बहिरवाडी’ गावाचा कायापालट
BOI
Wednesday, August 15, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना’ या गीतातील ओळी एकीचे बळ काय चमत्कार घडवू शकते हे सांगतात. याच प्रेरणेने एकत्र येऊन ‘वनराई’ आणि यूपीएस एससीएस या संस्थांनी पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी या गावाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या प्रकल्पासाठी यूपीएस एससीएस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आर्थिक मदत करणार असून, ‘वनराई’ ही संस्था या गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला बहिरवाडी हे ५५० ते ६०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे. गावामध्ये दारिद्र्यरेषेखालील आणि जमिनी नसलेली कुटुंब आहेत. शेती आणि दुग्धव्यवसाय हे येथील लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. गावात रोजगाराचे कायमस्वरूपी साधन नसल्याने लोकांनी रोजगारासाठी वेगवेगळ्या शहरांत स्थलांतर केले आहे. गावात पाणलोटाची कामे झाली नसल्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या या गावातील पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे गावात शेतीसाठीच्या आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे. या सगळ्या समस्यांवर उपाययोजना राबवण्याचे काम या दोन्ही संस्था करणार आहेत.

या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना ‘वनराई’चे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप म्हणाले, ‘एकंदरीत गावाच्या विकासासाठी आणि तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘वनराई’तर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये पाणलोट व्यवस्थापनाचे कार्य, पाणी अडविणे-मुरविणे, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारा, सलग समपातळी चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, विहिरींचे पुनर्भरण, तसेच वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. पशुधन विकासाच्या दृष्टीने जनावरांचे कृत्रिम रेतन करणे, चारा पिकांखालील क्षेत्र वाढविणे, दुभत्या जनावरांची संख्या वाढविणे इत्यादी बाबींवरदेखील विशेष भर देण्यात येणार आहे. सांडपाण्याचा निचरा, परसबागा तयार करण्याबरोबर वनीकरण, पाणलोट व्यवस्थापनासह शेती व पशुधन विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिरे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.’ 

‘हे सर्व उपक्रम राबविण्याकरिता यूपीएस एससीएस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे ३८ लाखांचा निधी ‘वनराई’ला देण्यात आला आहे,’ अशी माहिती जगताप यांनी दिली. 
यूपीएस एससीएस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आर्थिक मदतीसंदर्भात ‘वनराई’ला दिलेल्या पत्राची माहिती देताना ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, प्रभारी सचिव चंद्रकांत इंगुळकर, प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link