पुणे : शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘स्कायसायक्यू’, रोटरी क्लब ऑफ पुणे पौड रोड, भोर राजगड, वनराई, ९५ बिग एफएम या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘पक्षी संवर्धन- शोधनिबंध’ स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ १९ व २० जानेवारी २०१९ रोजी भोरमधील स्काउट गाइड प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.
पर्यावरण रक्षणार्थ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो निसर्गप्रेमी विद्यार्थी आणि शिक्षकांचा या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संस्था प्रमुख दीप्ती मोहन पुजारी यांनी दिली. विद्यार्थी, पालकांची उत्सुकता जागृत करणारे आणि त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे, हे अभिनव किलबिल संमेलन पक्ष्यांचे गाव या नावाने उदयास येत असलेल्या पिसावरे (भोर) गावी होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करून त्या पक्ष्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, स्पर्धेच्या निकषानुसार त्यांना आलेले अनुभव आणि सुचलेल्या उपाययोजना आपल्या शब्दांत लिहून तो शोधनिबंध संस्थेकडे सादर केला आहे.
या निबंधांपैकी निवडक निबंधाचे सादरीकरण विद्यार्थी या किलबिल संमेलनात करणार आहेत. यातील निवडक विद्यार्थ्यांना एकूण चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती स्कायसायक्यू संस्थेतर्फे दिली जाणार आहे. यासोबतच ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे, डॉ. गिरीश जठार, डॉ. संजीव नलावडे आदी या वेळी मार्गदर्शन करतील. हा चर्चासत्राचा कार्यक्रम सर्व पक्षीप्रेमींसाठी खुला आहे.