Next
‘मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही’
मराठी सक्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणाचे साहित्यिकांच्या शिष्टमंडळाकडून स्वागत
प्रेस रिलीज
Wednesday, June 26, 2019 | 02:32 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमांतून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,’ अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या २४ संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने २४ जून रोजी विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाने मराठी भाषा सक्तीच्या धोरणाचे स्वागत करून, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. या शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्य‍िक मधू मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले-पाटील, नागनाथ कोतापल्ले, दादा गोरे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर आदींचा समावेश होता. या वेळी मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मेधा कुलकर्णी, हेमंत टकले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.  

फडणवीस म्हणाले, ‘अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्र अनुदानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे. डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमांतून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. इंग्रजी माध्यमासह अन्य शाळांमध्ये गेलेली मुले या उपक्रमांमुळे मराठी शाळांमध्ये परतली आहेत. राज्याकडे शालेय शिक्षणासाठी संसाधनांची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आणि यापुढेही ती भासू दिली जाणार नाही; पण त्याचबरोबर शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध व्हावी यासाठी कालबद्धरित्या असे प्रयत्न केले जातील. या प्रयत्नांसाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, मराठी भाषा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कायद्यांबाबत सकारात्मक असेच प्रयत्न केले जातील.’

मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री तावडे म्हणाले, ‘मराठी भाषा संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीत सहभाग वाढावा अशीच अपेक्षा आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी या सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे स्वागतच आहे.’

या वेळी झालेल्या चर्चेत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा सक्ती, मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा, मराठी भाषा भवन, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न याबाबतही चर्चा झाली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 106 Days ago
You can take a hose to the water --- . It is environment which makes people to do something . Of course , government can help to create suitable environment.
0
0

Select Language
Share Link
 
Search