Next
हुबळी आणि धारवाड
BOI
Wednesday, January 23, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ या सदरातील कर्नाटक राज्याच्या सफरीत आज आपण पाहू या हुबळी आणि धारवाड परिसरातील पर्यटनस्थळे...
............
दीर्घ प्रवासातील विश्रांतीची जागा असा धारवाड या शब्दाचा अर्थ आहे. हा शब्द द्वारवटा या संस्कृत शब्दाशी साधर्म्य सांगतो. द्वार म्हणजे दरवाजा आणि वता/वटा किंवा वाडा म्हणजे गाव असा त्याचा अर्थ आहे. काहींच्या मते विजयनगर राजवटीदरम्यान धारव (इसवी सन १४२३) नावाचा एक शासक होता. त्याच्या नावावरून धारवाड हे नाव पडले असावे, असे म्हणतात. गदगजवळील एका गावात हनुमान मंदिरात सापडलेल्या शिलालेखावरून सन १२००पासून या गावाचा संदर्भ असल्याचे दिसून येते. १२व्या शतकात चालुक्यांनी धारवाडवर राज्य केले होते. त्या वेळी भास्करदेव नावाचा राजा होता. बहामनी सुलतानांनी हा भाग घेतला. तो विजयनगरच्या स्थापनेनंतर त्यांच्या ताब्यात (सन १४०३) गेला आणि तेथे त्यांनी किल्लाही बांधला. विजयनगरच्या पाडावानंतर येथे काही काळ स्थानिक सरदारांची सत्ता होती. त्यानंतर १५७३मध्ये हा भाग पुन्हा विजापूर सुलतानाच्या आधिपत्याखाली गेला. त्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत हा भाग त्याच्या अमलाखाली होता. त्यानंतर मराठे, नंतर टिपू सुलतान आणि नंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता. ब्रिटिश राजवटीत हुबळी आणि धारवाड या दोन नगरपालिका अस्तित्वात आल्या. स्वातंत्र्यानंतर या जुळ्या शहरांची मिळून एक महापालिका निर्माण करण्यात आली. हुबळी हे दक्षिण-मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन ब्रिटिशांनी उभारले. 

धारवाड म्हटले, की हमखास आठवतो तो खुसखुशीत धारवाडी पेढा. हा पेढा खमंग, खरपूस भाजलेल्या खव्यापासून तयार करतात. गंगूबाई हनगल आणि पंडित मल्लिकार्जुन मन्सूर या गायन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती या गावातीलच. गंगूबाईंचा जन्म हावेरी जिल्ह्यातील हनगल येथे झाला; पण त्यांचे शिक्षण हुबळीमध्ये झाले. प्रसिद्ध अभिनेते गिरीश कार्नाड यांचा जन्म माथेरान येथील असला, तरी त्यांचे शिक्षण धारवाड येथे झाले. 

या शहरात प्रामुख्याने फर्निचर, कातडी वस्तू, तांदूळ, विडी, हातमागावरील कापड, दुग्धजन्य पदार्थ यांचे प्रमुख उद्योग आहेत. आता हे एक शैक्षणिक ठिकाण बनले आहे. येथे वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती, दंतवैद्यकशास्त्र असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हुबळी, धारवाड शहरात पुढील पर्यटनस्थळे आहेत. - कर्नाटक विद्यापीठ, कृषी विज्ञान विद्यापीठ, किल्ल्याची दोन मुख्य प्रवेशद्वारे, सोमेश्वराचे मंदिर (शाल्मला नदीचे उगमस्थान), दत्तात्रय स्वामी यांचे मंदिर, उनकल तलाव (तलावातील विवेकानंदांचा भव्य पुतळा), दुर्गा देवीचे मंदिर. इस्कॉन टेम्पल, इत्यादी. 

उनकल तलाव

उनकल तलाव :
हे हुबळीमधील सहलीचे सुंदर ठिकाण आहे. सुमारे ११० वर्षांपूर्वी बांधलेला हा तलाव २०० एकर जमिनीवर पसरलेला आहे. स्वामी विवेकानंदांचा पुतळा हे येथील प्रमुख आकर्षण आहे. यात मुलांसाठी मनोरंजन सुविधा आहेत. आपण येथे बोटसफरीचा आनंद घेऊ शकता. उनकल तलावाजवळील चंद्रमौलीश्वर मंदिर सुमारे ९०० वर्षांपूर्वीचे, चालुक्य शैलीतील मंदिर आहे. बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल मंदिरे याच सुमारास बांधली गेली होती. हे मंदिर राष्ट्रीय प्राचीन पुरातन कायद्यांतर्गत संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

चंद्रमौलीश्वर मंदिर

हुबळीचा भाग धारवाडच्या २० किलोमीटर आग्नेय भागात आहे, उत्तर कर्नाटकचे हे प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. आसपासच्या भागात कापूस आणि शेंगदाणे भरपूर प्रमाणात पिकवले जातात. त्यामुळे या दोन गोष्टींसाठी हे एक प्रमुख व्यापार केंद्र आहे. तसेच कारवार येथून काजू, मसाले व सागरी खाद्यपदार्थ हुबळी येथे विक्रीसाठी येतात. 

चंद्रमौलीश्वर मंदिर

रायरा हुबळी :
या ठिकाणाला एलिया पुरावा हल्ली किंवा पूरबली असेही म्हटले जाते. तेथे भवानीशंकर मंदिर आणि जैनबासडी आहे. सन १६७३मध्ये शिवाजी महाराजांनी हे ठिकाण काबीज केले होते. मुघलांनी रायरा हुबळीवर विजय मिळविला आणि नंतर त्याला सवणूरच्या नवाबच्या शासनाखाली ठेवण्यात आले, ज्याने मजीदपुरा भागाचा नवीन विस्तार केला. नंतर व्यापारी बसप्पा शेट्टर यांनी दुर्गादाबेल (किल्ला मैदाना) भागाजवळ नवीन हुबळी बांधली. 

अमरगोल येथील बनशंकरी मंदिर

अमरगोल येथील नागरशैलीतील बनशंकरी मंदिर जक्कनचार्य यांनी १३व्या शतकात बांधले. हे मंदिर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून, ते हुबळीजवळील नवनगर भागात आहे. 

सवाई गंधर्वांचा वाडा, कुंदगोळ

हुबळी-धारवाडच्या आसपासची ठिकाणे :
कुंदगोळ : हे सवाई गंधर्वांचे जन्मठिकाण आहे. त्यांचे येथे घरही आहे. ११व्या शतकात बांधलेले चालुक्य श्रीशंभूलिंगेश्वर मंदिर बघण्यासारखे आहे. या मंदिरातील छत अतिशय सुंदर आहे. त्याचे सर्व खांब पॉलिश केलेले आहेत. हे ठिकाण हुबळीपासून १४ किलोमीटरवर आहे. 

शंभूलिंगेश्वर मंदिर, कुंदगोळ

अन्नीगेरे :
हे आद्य कन्नड कवी पम्प यांचे जन्मस्थळ आहे. तसेच कल्याणी चालुक्य शैलीत बांधलेले (सन१११५)काळ्या पाषाणातील अमृतेश्वर हे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. ७६ स्तंभांवर आधारित असलेले हे मंदिर पौराणिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बसवकल्याण येथे राष्ट्रकूटांनी हल्ला केल्यावर चालुक्यांनी आपली राजधानी अन्नीगेरे येथे हलविली. अन्नीगेरे येथे बनशंकरी, बसप्पा, गजिनाबसप्पा आणि हनुमान यांना समर्पित मंदिरे आहेत. रेल्वे स्टेशनजवळ एक प्राचीन लिंगायत मंदिर आहे. अन्नीगेरे हे पूर्वीचे एक महत्त्वाचे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होते. आद्य कवी पम्प यांनी जैन पुराणातील कथा, तसेच महाभारतातील कथाही कन्नडमध्ये काव्यरूपात लिहिल्या. हे ठिकाण धारवाडपासून ५५ किलोमीटरवर आहे.

अमृतेश्वर मंदिर, अन्नीगेरे

तांबूर येथील शिलालेखगरग : राष्ट्रध्वजासाठी हाताने विणलेल्या खादीची सुरुवात उत्तर कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील गरग या एका लहान गावात केली गेली. धारवाड तालुका क्षेत्रीय सेवा संघाच्या बॅनरखाली १९५४मध्ये काही स्वातंत्र्यसैनिकांनी गरग येथे एक केंद्र स्थापन केले आणि ध्वज बनविण्यासाठी परवाने प्राप्त केले. भारतातील हे एकमेव ठिकाण आहे, जेथे राष्ट्रध्वज बनलेले आहेत. तसेच गरग हे ठिकाण श्री गणेश, श्री गुरू मदिवालेश्वर मठ आणि मंदिर यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. गुरू मदिवालेश्वर शिशुनला शरीफ, सिद्धुरुधास्वामी आणि त्यांच्या काळातील इतर सुप्रसिद्ध संतांचे समकालीन होते. दर वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चदरम्यान येथे एक मेळावा आयोजित केला जातो. त्याला हजारो लोक येतात. मेळाव्यात रात्रभर प्रार्थना केली जाते आणि पर्यटकांना मोफत अन्न पुरवले जाते. 

तांबूर : या गावाच्या आसपास पूर्वीच्या काळी तांबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे गावाचे नाव तमरानगर, ताम्र आणि नंतर तांबूरमध्ये रूपांतरित झाले. तांबूर पश्चिम घाटात घनदाट जंगल असून वाघ, चित्ता, हत्ती, सारंग, कोब्रा आणि इतर वन्यजीव येथे आढळतात. याच्या आसपास तमबोर लेक, सातू शाहिद दर्गा, काली नदी, सुपा बांध इत्यादी ठिकाणे आहेत. येथील बसवाना मंदिर लिंगायतांसाठी तीर्थस्थळ आहे. येथे काही शिलालेखही सापडले आहेत. १२व्या शतकात चालुक्य आणि गंगाराजवंशांनी येथे राज्य केले. हे ठिकाण कलघटगीपासून ११ किलोमीटरवर आहे. 

नवलगुंद येथील मंदिरातील बायबलची प्रत

नवलगुंद येथील गणपती मंदिरनवलगुंद : याचा अर्थ मोरांचा पर्वत असा होतो. नवलगुंद हे गाव ब्लँकेटसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक महिला हातमाग चालवितात. सध्या असे काम करणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे, तरीही या गावाची ती ओळख आहे. या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे नागलिंगस्वामी मंदिरामध्ये बायबलची एक प्रत असून, तिची पूजाअर्चा होते. ही प्रत कन्नड भाषेत असून, जर्मनीचे मिशनरी, लंडन आणि वेस्लेयन मिशनरी सोसायटीज यांच्या समितीने ती प्रकाशित केली होती. ही प्रत १८६५मध्ये मंगलोर येथे छापली होती. नवलगुंद येथे श्री गणपतीचे सुंदर मंदिरही आहे. 

कसे जाल कोठे राहाल?
हुबळी हे दक्षिण-मध्य रेल्वेचे मुख्य ठिकाण आहे. चेन्नई, मुंबई, दिल्ली, बेंगलोर या शहरांशी हे ठिकाण रेल्वेने जोडलेले आहे. जवळचा विमानतळ बेळगाव (१२५ किलोमीटर). हुबळी हे ठिकाण मुंबई-बेंगळुरू महामार्गावर असून, गोवा कारवारही रस्त्याने जोडलेले आहे. येथे राहण्याची, जेवणाची चांगली सोय आहे. हे ठिकाण पावसाळा सोडून कधीही जाण्यासारखे आहे. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

शंभूलिंगेश्वर मंदिर, कुंदगोळ

शंभूलिंगेश्वर मंदिर, कुंदगोळशंभूलिंगेश्वर मंदिर, कुंदगोळ


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shashank Chothe About 265 Days ago
सर, खूपच छान. सविस्तर आणि सुंदर माहिती.
0
0
जयश्री चारेकर About 267 Days ago
छान माहिती .फारच छान आहे
0
0

Select Language
Share Link
 
Search