Next
कल्लाप्पाण्णा आवाडे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
अजय कांडरना साहित्यरत्न, तर गुलाबराव यादवांना शेतकरीराजा पुरस्कार
BOI
Thursday, December 13, 2018 | 03:58 PM
15 0 0
Share this story

कल्लाप्पाण्णा आवाडेजयसिंगपूर (कोल्हापूर) : शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील ग्रामस्थ, साहित्य सुधा मंचातर्फे प्रतिवर्षी दिले जाणारे तीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. इचलकरंजीचे माजी खासदार, सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना समाजरत्न पुरस्कार, कणकवलीचे (जि. सिंधुदुर्ग) ज्येष्ठ कवी अजय कांडर यांना पी. बी. पाटील साहित्यरत्न पुरस्कार आणि येळावी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी गुलाबराव यादव यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शेतकरीराजा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या २२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल.

अजय कांडरनिमशिरगाव येथे गेली २२ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. यामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग असतो. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यसंमेलन होत आहे. सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कथाकथन आणि काव्यमैफल असे या संमेलनाचे स्वरूप आहे. निमशिरगावचे सुपुत्र असलेल्या पद्मश्री दे.भ.प. डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात महत्त्वाची भागीदारी असणारे इचलकरंजीचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवडे यांची या पुरस्कारासाठी निवड समितीने निवड केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक पी. बी. पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा साहित्यरत्न पुरस्कार कलमठ-कणकवली येथील आघाडीचे कवी अजय कांडर यांना देण्यात येणार आहे. कांडर यांचे ‘हत्ती इलोरे’ यासह अनेक काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. ते पत्रकारही आहेत. येळावी येथील गुलाबराव यादव यांची शेतकरी राजा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यादव देशी गायीपासून ४४ प्रकारचे हर्बल प्रॉडक्ट्स तयार करतात. त्यांच्या कार्याची नोंद केंद्र सरकारनेही घेतली आहे.

गुलाबराव यादव‘या समारंभाला खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, वैभव नायकवडी, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, रावसाहेब पाटील-बोरगावकर, अनिलराव बागणे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संमेलनाचे संयोजक पद्माकर पाटील यांनी दिली.

या वेळी रावसाहेब पुजारी, प्रा. शांताराम कांबळे, सचिव गोमटेश पाटील, विजयकुमार बेळंके, सरपंच सौ. बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगोंडा पाटील, बी. एल. कांबळे, अजित सुतार, निवृत्ती साजणे (गुरूजी), राजगोंडा पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, पोलिस पाटील सुजित साजणे, प्रा. गौतम माने आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link