Next
स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे-पाटील
BOI
Thursday, February 07, 2019 | 12:13 PM
15 0 0
Share this article:

स्टॉकहोम : मराठी मातीत मूळ असलेल्या नीला अशोक विखे-पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी फेरनियुक्ती झाली असून, या वेळी त्यांच्याकडे अर्थ, गृहबांधणी आणि वित्तीय बाजारपेठा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद सांभाळलेले दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांची नीला ही नात.

१८ जानेवारी २०१९ रोजी स्वीडनमध्ये सोशल डेमोक्रॅट आणि ग्रीन पार्टी यांच्या आघाडीतून बनलेल्या नव्या सरकारने कार्यभार स्वीकारला. के. स्टीफन लोफव्हन हे नवे पंतप्रधान असून, त्यांच्या सल्लागार म्हणून नीला काम पाहणार आहेत. ३२ वर्षांच्या नीला ग्रीन पार्टीच्या सदस्या असून, स्टॉकहोम महानगरपालिकेच्या सिटी कौन्सिलच्या निर्वाचित सदस्याही आहेत.

‘गृहबांधणी आणि अर्थखाते या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असून, देशाचा मध्यवर्ती अर्थसंकल्प, तसेच कररचना यांची जबाबदारी नीलावर असेल,’ अशी माहिती नीला यांचे वडील डॉ. अशोक विखे-पाटील यांनी दिली. ‘नीलाची ही फेरनियुक्ती असून, आधीच्या सरकारमध्ये तिने लघू व मध्यम उद्योग, सामाजिक विकास, लिंगभाव धोरण आदी विभागांची जबाबदारी सांभाळली होती,’ असेही त्यांनी सांगितले. 

डॉ. अशोक विखे-पाटील हे डॉ. विखे-पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष असून, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. कामाच्या निमित्ताने स्टॉकहोमच्या दौऱ्यावर असताना त्यांची इव्हा लिल यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी झालेल्या विवाहानंतर नीला यांचा जन्म झाला. नीला यांचा लहानपणातील शिक्षणापूर्वीचा काळ महाराष्ट्रात, अहमदनगरमध्ये गेला आहे. त्यानंतर त्यांच्या आईसोबत त्या स्वीडनला गेल्या. त्यांचे बहुतांश शिक्षण युरोपमध्येच झाले. ‘गटेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस’मधून त्यांनी व्यवस्थापनातील पदवी घेतली असून, अर्थशास्त्र, कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. स्पेनमधील माद्रिदच्या विद्यापीठातून त्यांनी एमबीए ही पदवीही घेतली आहे. 

अगदी तरुण वयापासूनच नीला यांचा राजकीय प्रवास सुरू झाला असून, ग्रीन पार्टीच्या विविध उच्च पदांवर त्यांनी याआधी काम केले आहे. आता तर त्या सरकारचाच एक भाग झाल्या आहेत. अधूनमधून त्या महाराष्ट्रात येत असतात. जून २०१८मध्येही त्या इकडे येऊन गेल्या होत्या. डॉ. अब्दुल कलाम आपले आदर्श असल्याचे त्या सांगतात. 

महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे नीला यांचे काका असून, त्यांचे पणजोबा डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला होता. आपल्याला असलेला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील वारसा नीलाही पुढे चालवत आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search