Next
‘कृती, लोकसहभागातूनच खेडी स्वयंपूर्ण होतील’
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 11:36 AM
15 0 0
Share this article:पुणे : ‘उपलब्ध संधी आणि झगमगाट यांमुळे शहरे ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे खेडी ओस पडत आहेत. खरी समृद्धता, श्रीमंती खेड्यांमध्ये असूनही त्याकडे आपण नकारात्मक भावनेने पाहतो. खेडी शहरावर अवलंबून आहेत, असे चित्र आपल्याला दिसते. हे बदलायचे असेल आणि खेडी स्वयंपूर्ण व्हायला हवी असतील, तर शहरातील नोकरदार वर्गाने खेड्यात जाऊन कृती करणे आणि लोकसभाग घेणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त आणि ‘झिरो पेंडन्सी’चे प्रणेते चंद्रकांत दळवी यांनी केले.

डीपर आणि सर फाउंडेशन व साद माणुसकीची फाउंडेशन यांच्या वतीने ‘सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही खेडी स्वयंपूर्ण का नाहीत?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कुडाळ येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, ‘जडण-घडण’चे संपादक डॉ. सागर देशपांडे, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी भाग घेतला. ‘रूरल रिलेशन्स’चे प्रदीप लोखंडे यांनी परिसंवादाचे संचलन केले. आयोजक हरीश बुटले, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दळवी म्हणाले, ‘सरकारी योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवायच्या असतील, तर लोकसभाग महत्त्वाचा असतो. नोकरी-व्यवसायानिमित्त गाव सोडलेल्या सुशिक्षितांनी गावाच्या विकासासाठी अ-राजकीय व्यासपीठ उभारून कृती केली पाहिजे. कोणतीही अभिलाषा न बाळगता प्रामाणिकपणे गटाने काम केल्यास गावातले लोक स्वीकारतात. त्यातून विकासकामे होतील व खेडी स्वयंपूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळेल.’डॉ. देवधर म्हणाले, "खेड्यांमध्ये, तेथील माणसांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्याचा उपयोग करून घेण्याचे कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे. बायोगॅस, शेळीपालन, कोंबडीपालन अशा जोडधंद्याला चालना मिळावी. स्वयंसेवी संस्था लढाईचे घोडे बनण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्त्यांनी वास्तव समजून घेऊन काम केले पाहिजे. प्रशासनाने खेड्यांकडे बघण्याची वृत्ती बदलायला हवी. ‘जुगाड’ करून नवे काहीतरी निर्माण करणाऱ्यांना सरकारने पाठिंबा द्यायला हवा.’

मालकर म्हणाले, ‘खेड्यातील लोकांची आर्थिक क्षमता आणि क्रयशीलता वाढविल्याशिवाय खेडी स्वयंपूर्ण होणार नाहीत. आधीदी इंग्रजांनी आणि नंतर शहरवासीयांनी खेड्यांना ओरबाडले आहे. गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून राजकारणी आणि प्रशासन यांनी खेडयांना आपली संपत्ती बनविली. तिथल्या लोकांना आज नागरिक म्हणून त्याचे हक्क मिळावेत. कोणाचे उपकार अथवा दान मिळू नये.’

डॉ. देशपांडे म्हणाले, ‘शहरातील ग्लॅमरमुळे खेडी ओस पडताहेत. तेथे तसे ग्लॅमर आणि पायाभूत सुविधा उभारण्याची आज गरज आहे. तंत्रज्ञानामुळे खेडी आधुनिक होताहेत; पण मूलभूत सुविधा नसल्याने तरुण वर्ग स्थलांतरित होत आहे. या खेड्यांचे वैभव परत मिळविण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या गावासाठी वेळ दिला पाहिजे.’

हरीश बुटले यांनी स्वागत प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search