Next
कठीण कठीण कठीण किती...
BOI
Tuesday, January 23, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आज, २३ जानेवारी २०१८पासून नाटककार, कवी राम गणेश गडकरी यांचं स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झालंय. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातल्या ‘कठीण कठीण कठीण किती, पुरुषहृदय बाई...’ या पदाचा...
...............
श्रोत्यांच्या आवडीच्या गाण्यांचा फोन इन कार्यक्रम सादर करताना एका श्रोतीची आवर्जून आठवण येते. ‘हॅलो! नमस्कार! आपली आवड या फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत आहे!’ असं म्हणून श्रोत्याशी संवाद साधत त्यांच्या आवडीचं गाणं प्रसारित करण्याचा आनंद गेले काही वर्षे मी अनुभवते आहे. ध्वनिमुद्रणाची वेळ कधी सुरू होते आणि कधी संपते हे कळतच नाही. एकामागून एक फोन येत असतात. श्रोत्यांनी अधीरतेनं म्हटलेल्या ‘हॅलो’ किंवा ‘नमस्कारा’त फोन लागल्याचा अतीव आनंद असतो. त्यांनी सांगितलेल्या आवडीच्या गाण्यावर आमचा संवाद सुरू होतो. हल्ली मात्र नेहमी येणारा फोन येत नाही. ‘प्रतिमाताई नमस्कार, मी लक्ष्मी देशपांडे बोलतेय. मला किनई एक नाट्यगीत ऐकायचंय.’ ‘हो, अवश्य सांगा,’ असं म्हटलं की गाण्याचे बोल सांगण्याऐवजी किनऱ्या आणि वृद्धापकाळाने किंचित कापऱ्या आवाजात गाणंच ऐकू यायचं ‘कठीण कठीण कठीण किती...’ लक्ष्मीताई गाण्याची ओळच म्हणून दाखवायच्या. आम्ही सारे उद्घोषक त्यांच्या आवडीचं नाट्यगीत अतिशय प्रेमानं लावायचो. फोन ठेवता ठेवता त्या आवर्जून गोड आग्रह करायच्या ‘या एकदा घरी. मला तुम्हाला भेटायचंय हो. मी अंथरुणाला खिळलेय. बाहेर कुठं जाता येत नाही; पण आकाशवाणी सदैव माझी सोबत करते. या ना एकदा घरी. तुम्हाला बघायचंय हो मला. तुमचा आवाज मी रोज ऐकते. नाट्यगीतांच्या कार्यक्रमाची वेळ वाढवा हो जरा.’ असं त्यांनी म्हटल्यावर माझ्या मनात गाण्याची ओळ तयार व्हायची... ‘कठीण कठीण कठीण किती, घड्याळ असे बाई, पळणाऱ्या वेळेला अशी कशी घाई...’

लक्ष्मीताई देशपांडे आज हयात नाहीत; पण त्यांना आवडणारी राम गणेश गडकरी यांची ही चिरंजीव पदरचना जेव्हा जेव्हा ऐकू येते, तेव्हा त्या रसिक भगिनीची आठवण येतेच. एखादी कविता अशा अनेक आठवणींना उजाळा देत असते. 

मराठी साहित्यशारदेच्या दरबारात आजपासून, म्हणजे २३ जानेवारी २०१८पासून नाटककार, कवी राम गणेश गडकरी यांचं स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झालंय. त्यांच्या स्मृती जागवताना ‘भावबंधन’ या नाटकातलं ‘कठीण कठीण कठीण किती, पुरुषहृदय बाई...’ हे पद पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतंय. आशा भोसले यांच्या आवाजातली फिरत रसिकजनांच्या काळजात अशी वर्षानुवर्षं मुरत मुरत चाललीय असं वाटतं.

स्त्री जाती प्रति झटता अंत कळत नाही... 

कठीण या शब्दाचा राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला त्रिवार पुनरुच्चार आणि मा. दीनानाथ मंगेशकरांनी यमनकल्याण रागात बांधलेली चाल कित्येक पिढ्यांना मंत्रमुग्ध करतेय. ज्यांनी ‘भावबंधन’ हे नाटक वाचलं असेल किंवा पाहिलं असेल, त्यांना या पदरचनेतली गंमत आणखीनच कळेल. मुलगी, वडील, मैत्रीण, प्रियकर यांच्यातले भावबंध आणि या भावबंधाला आपल्या कुटील कारस्थानानं जटील फासात रूपांतरित करण्याच्या प्रयत्नात असलेला एक खलपुरुष आपल्याला नाटकात दिसतोच. त्याचबरोबर राम गणेश गडकरी यांच्या लेखणीतून उतरलेली विनोदी पात्रेही आपल्याला भेटतात. गुणी आणि सालस मालतीचा पिता धुंडीराज, आईविना पोरकी पण सुविद्य, स्वतंत्र विचारांच्या, आत्मसन्मानाची जाणीव असणाऱ्या लतिकेचा धनाढ्य पिता धनेश्वरपंत. ‘इंग्रजी राज्यात सूर्य कधी मावळत नाही, त्याप्रमाणे मदनाच्या राज्यात चंद्र कधी मावळत नाही. समोर मुखचंद्र असेल, तर विचारायलाच नको,’ असं म्हणणारा, मुखचंद्राच्या विरहात तळमळणारा असा वधूसाठी अधीर झालेला लग्नाळू महेश्वर, लतिकेवर जीव जडलेला प्रभाकर, कुरुप काळ्या इंदू-बिंदू, मूर्ख मोरेश्वर आणि कटकारस्थानाचा शिरोमणी घन:श्याम अशा अनेक पात्रांभोवती गुंफलेलं ‘भावबंधन’ हे नाटक म्हणजे राम गणेशांच्या कल्पनेची उत्तुंग भरारी, शब्दवैभवानं सजलेलं रत्नभांडार, कथा आणि संवादलेखनातलं सामर्थ्य खरोखर डोळे दीपवणारं! उपमा-उत्प्रेक्षांचे अलंकार, पल्लेदार वाक्यांनी नटलेले संवाद ही सारी गडकऱ्यांच्या नाटकांची वैशिष्ट्यं. उदात्त आणि विशाल कल्पनांनी त्यांच्या कविता जशा ओतप्रोत भरलेल्या तशीच त्यांची नाटकंही. ‘भावबंधन’ या नाटकात राम गणेशांच्या वाङ्मयनिर्मितीचा त्रिवेणी गोफ विणलेला दिसतो. कथानकाला पुढे नेणाऱ्या नाट्यमय घटना, प्रसंग आणि त्याच्यातून शिगेला पोहोचणारी उत्कंठा, भाषावैभवाचा उत्कृष्ट आविष्कार सांभाळतात राम गणेश गडकरी; विनोदाची झालर, हास्याची कारंजी फुलवतात बाळकराम आणि ‘कठीण कठीण’सारख्या पदरचना करणारा कवी ‘गोविंदाग्रज’ ही राम गणेशांची तिन्ही रूपं पाहायची असतील, तर ‘भावबंधन’ या नाट्यकृतीचा आस्वाद घ्यावा.

रंगुनी रंगात मधुर मधुर बोलती।
हसत हसत फसवुनी हृद्बंध जोडिती।। 
कठीण कठीण कठीण किती... 

मालती, मोरेश्वर, लतिका आणि प्रभाकर यांच्या छान मैत्रीचा बंध; पण तो अबोध आणि मुग्ध प्रेमाची हळुवार भावना जोपासणारा असा भावबंध. गप्पा रंगलेल्या असतात. लतिका स्पष्ट आणि परखड विचारांची, वडिलांनी ठरवलेल्या श्रीमंत, पण मूर्ख मुलाशी लग्न नाकारणारी, वडिलांच्या अयोग्य निर्णयाला ठाम नकार देणारी लतिका प्रभाकरावर मात्र जीव टाकत असते. प्रभाकराचंही तिच्यावर प्रेम असतं; पण उघड कोणीच बोलत नाही. एकमेकांना ते खोटं खोटं चिडवत असतात. चिडवता चिडवता भांडणात रूपांतर होतं. लटका राग, रुसवा गाण्यातून लतिका व्यक्त करते. असेच असतात पुरुष, गोड गोड बोलतात, हसत हसत आम्हाला फसवतात. खरंच कठीण आहे बाई हे पुरुषहृदय!

कठीण कठीण कठीण किती पुरुषहृदय बाई... 

राम गणेशांनी लिहिलेली ही कविता म्हणजे स्त्रीमनाचा आरसाच. स्त्रीमनाच्या लटक्या रुसव्याचं प्रतिबिंब! खरं म्हणजे त्यांच्यातला कवी, नाटककाराच्या हातात हात घालूनच संचार करत असणार. त्यांच्या इतर नाटकांची पदं जरी त्यांनी लिहिली नसली, तरी ‘भावबंधन’ आणि ‘पुण्यप्रभाव’मधली त्यांची पदं म्हणजे सुरेख कविताच आहेत. प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यास (अपूर्ण) या त्यांच्या पाच नाटकांमध्ये राम गणेशांचं बोट धरून चाललेले ‘गोविंदाग्रज’ रसिकांना दिसतातच. ‘भावबंधन’मधल्या ‘कठीण कठीण’ या कवितेतल्या ओळीच ऐकू या ना. लतिकाच्या तोंडी असलेली पुरुषांबद्दलची लटकी तक्रार...
 
हृदयाचा सुंदरसा गोफ गुंफिती।
पदर पदर परि शेवटी तुटत तुटत जाई।।
कठीण कठीण कठीण किती... 

हृदयाचा सुंदर गोफ विणून शेवटी काय, तर एक एक पदर सुटत जाणार, तुटत जाणार. याची पुरुषांना काय तमा? काय त्यांना पर्वा... इथं आमच्या जिवाचे हाल काय होतात, हे त्यांना समजणार? त्यांचा खेळ होणार पण आमचा जीव... प्रीतीच्या  विश्वांतले हे खेळ राम गणेशांच्या कविमनानं चांगलेच जाणले होते. ‘प्रेमाचे शाहीर’ असं त्यांना म्हणत असत. प्रीतभावनेचा आविष्कार असणाऱ्या कितीतरी कविता त्यांनी लिहिल्या. ‘वाग्वैजयंती’ हा एकुलता एक, पण शतगुणांनी संपन्न झालेला त्यांचा काव्यसंग्रह मराठी साहित्यशारदेच्या गळ्यातील कौस्तुभमणी आहे असं म्हटलं जातं. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा, मग पुढे’ अशा प्रकारच्या चिरंजीव प्रेमाची महती सांगणारी ‘प्रेम आणि मरण’ ही त्यांची कविता असो, की 

खडक बुडाले गर्वाचे। विरले डोंगर रागाचे।
खंदक चिरले द्वेषाचे। कडे मोडले त्वेषाचे।
जीव कोंडला आशेचा। श्वासचि बंद निराशेचा।
प्रेमजलाचा, हृदय रसाचा, सागर करी तांडव नाच।
प्रलय काल तो बा हाच।

असा प्रेमाचा ‘प्रलयकाळ’ ते वर्णन करतात, तर कधी प्रेमाचा गोफ असा विणतात, की त्या गोफातील काव्यसौंदर्य आपण स्तिमित होऊन पाहतच राहतो.

पदर आणिले तुझे काही तू, माझे आणि मीही तसा
हासत खेळत गोफ गुंफिला, कळले नाही कधी मला।।

पुढे कवितेचा गोफ गुंफता गुंफता ते लिहितात - 

कुणी निंदिले, कुणी वंदिले, कुणी हसले, रडलेही कुणी
नाही पाहिले आम्ही तिकडे, विश्व बुडाले प्रेमगुणा।।

राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रजांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या समग्र साहित्याचा गोफ एका वर्षात न्याहाळणं कठीण आहे. तूर्त आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी ‘भावबंधन’ या नाटकात लिहिलेल्या आणि मा. दीनानाथ मंगेशकरांच्या स्वरसाजानं मोहरलेल्या काव्यरचनेचा आनंद घेऊ या. ही रचना अनेक कलाकारांनी उत्कृष्टतेने गायलेली आहे; पण आशाताईंच्या मधुर आणि लटका राग व्यक्त करणाऱ्या लाडिक स्वरांमधून ऐकण्याची गंमत निराळीच. पुन्हा पुन्हा ऐकू या... 

कठीण कठीण कठीण किती... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

(राम गणेश गडकरींच्या ‘गुणी बाळ असा’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search