Next
‘स्वयंशिस्त ही यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली’
प्रदीप राठी यांचे मत; आंत्रप्रेन्युअर्स दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान
BOI
Tuesday, July 30, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘स्वयंशिस्त ही यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे उद्योग उभारताना आपले आरोग्य, कुटुंब आणि व्यवसाय या क्रमाने प्राधान्य द्यावे. आरोग्य चांगले नसेल, कुटुंबातील लोक समाधानी नसतील, तर उद्योग वाढविताना व्यावसायिक समस्यांबरोबरच आरोग्य आणि कौटुंबिक अडचणींनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे स्वतःला शिस्त लावत इतरांचे व्यवस्थापन करण्याची कला नवउद्योजकांनी आत्मसात करावी,’ असे मत सुदर्शन केमिकल्सचे अध्यक्ष प्रदीप राठी यांनी व्यक्त केले.

भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या आंत्रप्रेन्युअर्स दिनी उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशीप पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी प्रदीप राठी बोलत होते. 

आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल ट्रस्ट, आंत्रप्रेन्युअर्स क्लब ऑफ पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी आणि बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात रेणुका इंजिनीअर्सचे महेंद्र पाटील (आंत्रप्रेन्युरशीप), नागपूर येथील ज्ञान फाउंडेशनचे पेटंटमॅन अजिंक्य कोट्टावार, (रिसर्च अँड इनोव्हेशन), राणा हॉस्पिटॅलिटीच्या संचालिका भाग्यश्री जाचक (सर्व्हिस इंडस्ट्री), सांगलीतील ए-वन रोझ हायटेक अॅग्रो फार्मचे तानाजीराव चव्हाण (अॅग्रीकल्चर), क्रस्ना डायग्नोसिस्टच्या पल्लवी जैन (सोशल रिलेव्हन्स), ‘इकोस’च्या मानसी करंदीकर व केतकी घाटे (ग्रीन एंटरप्राइज) यांच्यासह हिंदुस्थान कॅटल फीड्सचे सचिन माने (आंत्रप्रेन्युअर्स क्लब, बारामती) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मानपत्र व मोगऱ्याचे रोप असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या एसएमई आणि स्टार्टअप एक्स्चेंजचे प्रमुख अजय ठाकूर, आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल ट्रस्टचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, सचिव डॉ. आशिष तवकर, खजिनदार सुनील थोरात, पीसीएमसी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र कुलकर्णी, बारामती क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब तुपे, पुणे फर्स्ट क्लबचे अध्यक्ष सुभाष माईणकर, निगडी क्लबचे अध्यक्ष सागर दाणी आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रदीप राठी
प्रदीप राठी म्हणाले, ‘उत्तम आरोग्य, समाधानी कुटुंब आणि नियोजनपूर्वक काम केले, तर व्यवसाय जोमाने वाढेल. भविष्यातील यशापेक्षा वर्तमानातील वाटचाल चांगली कशी होईल, यावर विचार करावा. उद्योग करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना खंबीरपणे करावा. आपण जे काम करतो, ते मन लावून केले, तर समस्या सहज सुटतात. अलीकडच्या काळात लघु आणि मध्यम व्यवसाय उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे काही प्रमाणात अडथळे आले, मात्र त्यातून उद्योगांची भरभराट व्हायला भविष्यात मदत होईल.’

अजय ठाकूर म्हणाले, ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) नोंदणीबाबत लघुउद्योजक उदासिन दिसतात. १४३ वर्षाच्या या संस्थेत भारतातून फक्त सुमारे पाच हजार कंपन्यांचीच नोंदणी आहे. खरेतर एकट्या महाराष्ट्रातून पाच हजार कंपन्या नोंदणी करू शकतील एवढी संभाव्यता आहे.’

‘बीएसई’मध्ये नोंदणी करणे लघुउद्योजकांना फायद्याची असून, उद्योगाचा प्रचार-प्रसार होण्यासह सदस्य असल्याने समाजात प्रतिष्ठाही मिळते, उत्तम कौशल्य त्या व्यवसायात आकर्षित करू शकता. दोन-तीन कोटीपासून वार्षिक उलाढाल असलेल्या, सलग तीन वर्षे व्यवसायात असणाऱ्या कंपन्या ‘बीएसई’ नोंदणी करू शकतात. लघुउद्योजकांनी ‘बीएसई’मध्ये नोंदणी करण्याला प्राधान्य द्यावे,’ असेही ठाकूर यांनी नमूद केले.

‘अनेक समस्यांचा धैर्याने सामना करीत उद्योग उभारला. जिद्द, मेहनत आणि सातत्य व्यवसाय करताना महत्त्वाचे आहेत,’ असे महेंद्र पाटील म्हणाले. 

‘विद्यार्थ्यांना आनंददायी असे शिक्षण देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. शिक्षण व्यवस्थेत नाविन्यपूर्ण बदल होण्यासाठी प्रयत्नशील असून, मुलांमध्ये कुतूहल जागृत करून त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढावी यासाठी सोनम वांगचुक यांच्यासारख्या बरोबर काम करण्याचा आनंद मोठा आहे,’ असे अजिंक्य कोट्टावार यांनी नमूद केले. 

भाग्यश्री जाचक म्हणाल्या, ‘कोणतीही पार्श्वभूमी नसताना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उद्योग उभारला आहे. त्याला पर्यावरणपूरक वातावरणाची जोड दिली आहे. व्यवसायात स्वतःशीच स्पर्धा असते, याची जाणीव ठेवून काम करावे.’ 

‘प्लॅस्टिक फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फुलांची शेती करणाऱ्यांचे मार्केट ९० टक्क्यांनी कमी झाले आहे. फुलशेतीला चालना मिळण्यासाठी नागरिकांनी नैसर्गिक फुलांचा वापर करायला हवा,’ अशी अपेक्षा तानाजी चव्हाण यांनी व्यक्त केली. 

‘मध्यमवर्गीयांना आरोग्य तपासण्या अल्पदरात करता येतील, तसेच अखिल भारतीय स्तरावर ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून, हिमाचल प्रदेशातील छोट्या गावात सुरू केलेला व्यवसाय विविध राज्यांमध्ये पोहोचल्याचा आनंद आहे,’ असे पल्लवी जैन यांनी सांगितले.

‘नैसर्गिक जैवविविधता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे,’ असे केतकी घाटे यांनी सांगितले. 

अतुल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सागर दाणी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. आशिष तवकर यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search