Next
सफर वासोट्याची...
BOI
Monday, January 01, 2018 | 06:34 PM
15 0 0
Share this article:


गडावर गेलो, तेव्हा काका म्हणाले, ‘हे बघा जावळीचं खोरं..’ कानावर विश्वासच बसला नाही. काय..? पुस्तकातलं जावळीचं खोरं हेच का? जाम भारी वाटलं.! काही तरी मिळवल्यासारखं.. महादेवाचं मंदिर, महालाचा पाया, मारुतीचं मंदिर, पाण्याच्या टाक्या, चुना दळायचे चाक. असं काही-बाही उरलं होत गडावर.. पण गडाचा इतिहास या अवशेषांपेक्षा जास्त काही सांगत होता.... ‘मैत्री ग्रुप’च्या चमूने साताऱ्याजवळ असलेल्या ‘किल्ले वासोटा’ या किल्ल्याच्या सफरीचा शब्दबद्ध केलेला हा अनुभव...
.................................................
जावळीचं सौंदर्य फक्त पुस्तकात ऐकलं होतं आणि काल्पनिक अनुभवलं होतं. तिथे कधी असा अचानक जाण्याचा योग येईल असं वाटलं नव्हतं. पण एकाच्या केवळ एखाद्या वाक्याने प्लॅन तयार झाला. ऑफिसमधूनच पाठीवर बॅगा घेऊन आम्ही वासोट्याला जाण्यासाठी गाडीत बसलो. कोणालाच रजा मिळाली नव्हती, नशीब एवढंच, की आम्हा सगळ्यांची आठवड्याची सुट्टी एकाच दिवशी असते. 

रात्री आठच्या सुमारास आम्ही पुणे शहर सोडलं. आपल्याला तिथे एका बामणोली गावात जाऊन आज मुक्काम करायचा आहे एवढंच माहित होतं. तो कसा आणि कुठे याची पुसटशीही कल्पना मी कोणाला होऊ दिली नव्हती. रस्त्यातच जेवणं  उरकली. अस्सल गावराण चिकनवर ताव मारला. काही जण गाडीतच पेंगले, आम्ही मात्र गप्पांचा चांगलाच फड रंगवला होता. यामध्ये वैचारिक संभाषणापासून अगदी अर्थहीन विनोदांपर्यंत बोलणी सुरू होती. अशाच गप्पा करत आम्ही रात्री सव्वा एकच्या सुमारास बामणोलीला पोहचलो. 

गावात गेल्यानंतर खऱ्या अर्थाने साधं कुत्रसुद्धा आमच्या स्वागताला आलं नाही. थंडीमुळे अख्खा गाव गाढ झोपला होता. गाव डोंगराच्या कुशीत असल्याने बोचरा वाराही चांगलाच झोंबत होता. एव्हाना सगळ्यांना कळून चुकलं होतं, की आपल्या राहण्याची काहीच व्यवस्था झालेली नाही. पण असं असलं तरी किमान तोंडावर तरी मला कोणीही शिव्या घातल्या नाहीत. समोर एक मोठं मंदिर दिसलं, जिथे एक मोठा मंडप होता. यावेळी जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.. हे गाणं आपोआप डोक्यात फिरायला लागलं. ड्रायव्हर दादाला म्हटलं, बाबा तू झोप गाडीत आम्ही जातो मंदिरात. पांघरायला आणलं होतं, तेच अंथरलं अन उरलेलं पांघरलं. चार वर्षांची शुभ्रा मात्र थंडीनं चांगलीच कुडकुडत होती. पण शेवटी आई-बाबांनी कुशीत घेतल्यानंतर झोपली. या सगळ्यामुळे ‘मला एकदा तरी गावच्या देवळात झोपायचंय’, हे माझं स्वप्न नाईलाज म्हणून का होईना पूर्ण झालं.

जेमतेम दोन तास झोपल्यानंतर शिवसागर जलाशयाकडे फिरायला गेलो. पाण्याचा आवाज येत होता, वर आकाशात चांदणं विखुरलं होतं. कित्येक वर्षांनी तिन तिकीटनं, सप्तऋषी, मंगळ, ध्रुवतारा पाहायला मिळाले. लहानपणीसारखं अगदी अधाशीपणे, ते बघ.. ते बघ.. म्हणत सगळं पाहिलं. उजाडल्यानंतर आवरून (अर्थात अंघोळ न करताच... हा देखील आमच्या मनाचा मोठेपणाच) बोटीत बसलो. बोट शिवसागर जलाशयातून (कोयना धरणाचा जलसाठा) वासोट्याकडे निघाली. हे अंतर सुमारे १९ कि. मी. आहे त्यामुळे जवळपास दीड तास नौकानयन म्हणजे बोटिंग करून वासोट्याच्या पायथ्याशी पोहचलो. पुस्तकात पाहिलेलं जंगल प्रत्यक्ष पाहताना छोट्या शुभ्राला जेवढं भारी वाटत होतं, तेवढच आम्हालाही. उंच झाडं, त्यावर पसरलेल्या वेली, पक्षांचे आवाज, पानांनी झाकलेली वाट, रस्त्यात लागणारे ओढे, त्याच्या बाजूला असेलेले गुळगुळीत गोटे, झाडांच्या जाळीतून डोकावून पाहणारा सूर्यप्रकाश सगळं कसं चित्रातल्यासारखं होतं.

सुरुवात जोमाने झाली. आमच्या ग्रुपमधला महिलावर्गही काही कमी नव्हता. आमचे गाईड मोरे काका, आम्हाला सगळं.. म्हणजे शुभ्रा विचारेल त्यासहित सगळं सांगत होते. पुढे-पुढे चढ लागला. मी-मी म्हणणारे ट्रेकर्स दमले. शेवटी कसंबसं काका म्हणत होते तसं पाच मिनीट, पाच मिनीट करत तब्बल दोन ते अडीच तासाच्या चढाईने आम्ही गडावर पोहोचलो. अर्थात शुभ्रा कधीच पोहचली होती. गडावर गेलो, तेव्हा काका म्हणाले, हे बघा जावळीचं खोरं.. कानावर विश्वासच बसला नाही. काय..? पुस्तकातलं जावळीचं खोरं हेच का? जाम भारी वाटलं.! काही तरी मिळवल्यासारखं.. महादेवाचं मंदिर, महालाचा पाया, मारुतीचं  मंदिर, पाण्याच्या टाक्या, चुना दळायचे चाक. असं काही-बाही उरलं होत गडावर...पण गडाचा इतिहास या अवशेषांपेक्षा जास्त काही सांगत होता. या गडाला शिवरायांनी व्याघ्र गड म्हणून नाव दिले होते. गडावर रसद, दारुगोळा मठेवली जात व तुरुंग म्हणूनही या गडाचा वापर करत. कारण येथून कैदी सुटला तरी जंगलाच्या वाघांना सापडेल ही खात्री होती. शिवरायांनी हातचा एक राखीव किल्ला म्हणून याला ठेवले होते. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईतसुद्धा नोंद आहे. 

अफझलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठ-दहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

याच वासोट्याला लागून जुना वासोटा आहे. तो यापेक्षाही दुर्गम पण काही पर्यंटकांच्या अती उत्साही कारनाम्यांमुळे त्याची हानी होऊ लागली. म्हणून पर्यटकांना आता तिथे बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही अल्याडच्या कड्यावरुनच पल्याडचा वासोटा पाहिला.

जाताना ज्या झऱ्याला बघून, आम्ही ‘हे पाणी स्वच्छ नाही मोरे काका तुम्ही कसं पिता,’ असं म्हणणारे आम्ही व इतर अनेकांनी गड उतरताच, ‘काका कुठयं झरा म्हणत अगदी जिवाच्या आकांताने ओढा गाठला.’ झऱ्याचं पाणी व त्याचा आवाज बस.. यानेच अर्धी तहान भागली होती. आवाजाच्या दिशेने झरा गाठला. बुट काढत थेट पाय थंड पाण्यात. तोपर्यंत दादानं जरा झऱ्याच्या वरच्या बाजूला जाऊन स्वच्छ पाणी आणलं. नको नको म्हणणारे सारे त्या पाण्यावर तुटून पडले. त्यावेळी कळलं स्वर्ग सुख म्हणतात ते हेच. त्याला मरायची गरज नाही. पोटभर पाणी प्यायलो आणि परतीच्या प्रवासासाठी होडीत बसलो. जेवण तिथचं उरकलं होतं. वाटेत जागा मिळेल तशी आणि तिथे झोप काढली. पाण्याचा अन बोटीचा आवाज, लाटेवर झुलणारी बोट अन निसर्ग शांतता, त्यात येणारी झोप हे दुसरं निसर्ग सुख अनुभवून आम्ही परत बामणोली गावात पोहचलो. सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा असला, तरी आजच्या फेरफटक्याचं समाधान होतं. ‘परत इथे यायचं पुन्हा-पुन्हा... ही इच्छा मनात घेऊन डोंगर व खऱ्या जंगलातून माणसांच्या व इमारतींच्या जंगलात पुन्हा परतलो... नंतर कधी तरी परत जाण्यासाठी.. 

- नरेंद्र साठे (सदस्य, मैत्री ग्रुप)

('मैत्री ग्रुप'च्या चमूचा या सफरीदरम्यानचा एक व्हिडीओ सोबत देत आहोत.)

 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search