Next
नोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल
BOI
Sunday, January 20, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

आल्फ्रेड नोबेलविविध क्षेत्रांत महान कार्य करणाऱ्या व्यक्तींना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराचे जनक आल्फ्रेड नोबेल, त्यांनी केलेले कार्य आणि पुरस्कार याबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात... 
............
शाळेत आम्हाला मराठी शिकवायला त्र्यं. ग. बापट नावाचे शिक्षक होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते आम्हा विद्यार्थ्यांना ‘अहो’ म्हणायचे. ‘रामायण कथा’ आणि ‘महाभारत कथा’ अशी प्रत्येकी सुमारे ४०० पानांची दोन पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ला नोबेल पुरस्कार मिळाला, याबाबत सर वर्गात एकदा बोलत होते - ‘एका भारतीय लेखकाला तो पुरस्कार मिळाला ही गोष्ट अभिमानाची आहेच; परंतु ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, रामदास यांनी ज्या रचना करून ठेवल्या आहेत, त्यांना शेकडो नोबेल दिले तरी ते अपुरेच ठरतील,’ असे त्यांचे म्हणणे होते. ही गोष्ट तर खरीच आहे. त्या संतमहात्म्यांनी ‘जगाच्या कल्याणा’ लेखनकार्य केलेले आहे. त्यांचा काळ तर जुना झाला. विसाव्या शतकातील महर्षी अरविंद यांचे ‘सावित्री’ महाकाव्य नोबेलसाठी नक्कीच पात्र होते. आतापर्यंत नऊ भारतीयांनी निरनिराळ्या विषयांमध्ये ‘नोबेल पुरस्कार’ प्राप्त केले, तर काहींचे ते हुकले. या पुरस्काराचे जनक आल्फ्रेड नोबेल, त्यांनी केलेले कार्य आणि पुरस्कार याविषयीची माहिती प्रस्तुत लेखात घेऊ.

नोबेल हे स्वत: रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी मिळवलेल्या अफाट संपत्तीचा मोठा भाग ‘नोबेल पुरस्कार’ देण्यासाठी बाजूला ठेवण्यात आला. त्यातून मिळणाऱ्या व्याजातून त्याचा विनियोग करण्यात येतो. आल्फ्रेड यांच्या पाचव्या पुण्यतिथीला १० डिसेंबर १९०१ रोजी पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आले. सुरुवातीला ज्या पाच विषयांमधील असाधारण कार्याबद्दल/संशोधनाबद्दल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येत असे, ते असे - साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अथवा वैद्यकशास्त्र आणि जागतिक शांतता. सन १९६९पासून त्यात ‘अर्थशास्त्र’ या विषयाची भर घालण्यात आली. त्यासाठीचे नियम, प्रशासकीय व्यवस्था आणि पुरस्कार देण्याबाबतचे निकष यांची नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात सविस्तर नोंद करून ठेवली होती. ते स्वीडनचे नागरिक होते. सन १९००मध्ये तिथला राजा, कुटुंबीय, निधीचे विश्वस्त आणि पुरस्कारांसाठी व्यक्तींची निवड करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांनी पुढील वर्षीपासून समारंभपूर्वक सन्मान करण्याचा निर्णय घेतला.

‘साहित्या’चे पारितोषिक देण्याचा अधिकार ‘स्वीडिश अॅकॅडमी’कडे आहे. ‘शांतता पुरस्कार’ ‘नॉर्वेजियन नोबेल कमिटी’ ठरवते. तसेच भौतिक व रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्रातील निवड ‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ करते. ‘वैद्यक’ किंवा ‘जीवशास्त्रा’चे सर्वाधिकार ‘रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूट’कडे आहेत. या संस्था प्रसंगी बाहेरच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात; पण तो बंधनकारक नसतो. पुरस्कारासाठी आपले नाव स्वत:च सुचवता येत नाही. नाव सुचविण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्ती अशा -

नोबेल पारितोषिकआधीचे ‘नोबेल’ विजेते, पारितोषिक देणाऱ्या संस्थांचे सभासद, त्या-त्या क्षेत्रातील नामांकित प्राध्यापक, ‘साहित्या’च्या पुरस्कारासाठी लेखकांच्या प्रातिनिधिक संघटनांचे सभासद शिफारस करू शकतात. ‘शांतता पुरस्कारा’साठी काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संसदीय व इतर संस्थांचे सदस्य शिफारस करू शकतात. शिफारस फक्त व्यक्तीच करू शकतात, संस्था नव्हे; अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात. नोबेल समित्यांचे काम दर वर्षी एक फेब्रुवारीपासून सुरू होते आणि १५ नोव्हेंबरला अंतिम निर्णय झालेला असतो. त्याविरुद्ध कोठेही दाद मागता येत नाही.

आल्फ्रेड नोबेल यांचा अल्प परिचय :
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे २१ ऑक्टोबर १८३३ रोजी त्यांचा जन्म झाला. संशोधक, व्यावसायिक, इंजिनीअर, रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अलौकिक प्रसिद्धी मिळवली. सामाजिक कार्य आणि विविध संस्थांना प्रचंड आर्थिक मदत यासाठी ते सतत पुढाकार घेत. डायनामाइटचा (सुरुंग) शोध त्यांनीच लावला. ते अमाप संपत्तीचे धनी बनले. नोबेल पारितोषिकाची स्थापना हे तर त्यांचे सर्वोच्च कार्य म्हणता येईल. त्यांच्याकडे एकूण ३५५ पेटंट्स होती. ‘नोबेलियन’ हे सिंथेटिक रासायनिक मूलद्रव्याचे नाव नोबेल यांच्या गौरवाप्रीत्यर्थ देण्यात आलेले आहे.

आल्फ्रेड हा आठ भावंडांमधला तिसरा. त्यातले चार जण लहानपणीच दगावले. वडिलांकडून आल्फ्रेडला बालपणीच स्फोटक पदार्थांचे ज्ञान मिळाले आणि त्यातच पुढे आवड निर्माण झाली. अनेक व्यवसायांमध्ये अपयश आल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सन १८३७मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे स्थलांतर केले. तिथे यांत्रिक भाग आणि स्फोटकांच्या निर्मितीमध्ये त्यांना भरपूर यश मिळाले. आल्फ्रेडने तिथे अभ्यासात खूपच प्रगती केली. विशेषत: रसायनशास्त्र आणि भाषांवर त्याने प्रभुत्व मिळवले. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश आणि रशियन या भाषा त्यांनी आत्मसात केल्या. तरुणपणी त्याने निकोलस झिनिन नावाच्या रसायनशास्त्रज्ञाबरोबर काम केले. सन १८५० मध्ये तो पॅरिसला गेला. ‘नायट्रोग्लिसरीन’ या स्फोटकावर त्याने संशोधन केले. पुढे तो एक वर्ष अभ्यासासाठी अमेरिकेला गेला. तिथूनच त्याने पेटंट मिळवायला सुरुवात केली. घरच्या कारखान्यांमध्ये लष्करी शस्त्रे बनवणे चालूच होते. नोबेल कुटुंब पुन्हा स्वीडनला परतले. तिथे आल्फ्रेडने १८६३ मध्ये ‘डिटोनेटर’चा शोध लावला. ‘डायनामाइट’चा शोध त्याने १८६७मध्ये लावला आणि इंग्लंड-अमेरिकेत त्याचे पेटंट मिळवले. खाणकामांमध्ये त्याचा प्रचंड वापर सुरू झाला. नंतर पेटंट्सच्या संख्येत भराभर वाढ होत गेली आणि त्याचबरोबर संपत्तीतही.

१८८४मध्ये ५१ व्या वर्षी नोबेल यांची ‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी’चे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. १८९३ साली उप्पसला विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी मिळाली. ते स्वत: शांततावादी असूनही त्यांनी २० देशांत लष्करी शस्त्रनिर्मितीचे ९० कारखाने सुरू केले. १० डिसेंबर १८९६ रोजी ६३व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी नोबेल पारितोषिकासाठी नियमावली आणि भक्कम आर्थिक तरतूद करून ठेवली. स्टॉकहोममध्येच त्यांचे दफन करण्यात आले. त्यांनी युरोप आणि उत्तर अमेरिकेत व्यवसायाच्या निमित्ताने अखंड प्रवास केला. पॅरिससह अनेक शहरांमध्ये त्यांची निवासस्थाने होती. जन्मभर ते अविवाहित राहिले. परंतु तीन जणींशी त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यातली दुसरी, बॅरोनेस बर्था सटनर हिला १९०५ साली तिच्या जागतिक शांततेसाठी केलेल्या अथक कार्याबद्दल शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

आल्फ्रेड यांनी भाषांबरोबर इंग्रजी कविता करण्यातही मान्यता मिळवली. एक चार अंकी नाटकही त्यांनी लिहिले. २७ नोव्हेंबर १८९५ रोजी त्यांनी आपल्या अखेरच्या मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली. आपल्या ९४ टक्के संपत्तीचा वापर पाच क्षेत्रांमध्ये ‘नोबेल पारितोषिक’ देण्यासाठी व्हावा, असे त्यात नमूद केले होते. अर्थशास्त्राचा समावेश नंतर झाला.

महात्मा गांधीजींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी दोनदा विचार झाला; पण तो देण्यात आला नाही. डॉ. जगदीशचंद्र बोस यांचेही ‘नोबेल’ हुकले. हिटलरच्या दहशतीमुळे तीन जर्मन शास्त्रज्ञांनी पारितोषिक नाकारले. तसेच रशियन लेखक बोरिस पास्तरनाक यांनीही सरकारची अवकृपा टाळण्यासाठी तोच मार्ग अनुसरला. होमी भाभांचे नाव चार वेळा सुचवण्यात आले; पण त्याचा स्वीकार झाला नाही. एकूण नऊ भारतीयांना ‘नोबेल’ मिळाले. त्यातील काही मूळ भारतीय वंशाचे, परंतु अन्य देशांमध्ये राहणारे होते. त्यांची थोडक्यात माहिती घेऊ.

- रवींद्रनाथ टागोर - साहित्यासाठी - सन १९१३ - ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला पुरस्कार.

- सर चंद्रशेखर व्यंकटरमण - भौतिकी - सन १९३० - प्रकाश या विषयावर संशोधन. आकाश आणि समुद्राचे पाणी निळे का दिसते, याचे स्पष्टीकरण.

- हरगोविंद खुराणा - शरीरशास्त्र/औषधी विज्ञान - सन १९६८ - जनुकीय क्षेत्र आणि ‘आनुवंशिक कोडे’ यावरचे काम.

- मदर तेरेसा - शांतता - सन १९७९ - अनाथ, आजारी, दीन-दुबळ्यांची भारतात सेवा.

- चंद्रशेखर सुब्रह्मण्यम - भौतिकी - सन १९८३ - ताऱ्यांची रचना, कृष्णविवर, सापेक्षता यावर संशोधन.

- अमर्त्य सेन - अर्थशास्त्र - सन १९९८ - कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक. ‘थिअरी ऑफ हाउसहोल्ड’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक .

- व्ही. एस. नायपॉल - साहित्य - सन २००१ - देशाच्या सांस्कृतिक चालीरीतींवर लेखन.

- व्यंकटरमण रामकृष्णन - रसायन - सन २००९ - ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’मध्ये संशोधन.

- कैलाश सत्यार्थी - शांतता - सन २०१४ - बालहक्क आणि बालमजुरी उच्चाटन यासाठी मोठे काम. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे १५० देशांमधील ८३ हजार बालमजुरांची मुक्तता झाली.

‘नोबेल पुरस्कारा’साठी सन १९००मध्ये बाजूला ठेवलेल्या निधीत, व्याजामुळे गेल्या १२० वर्षांत भरपूर वाढ झाली आहे. सध्या ‘नोबेल’ची रक्कम प्रत्येक विषयासाठी सुमारे १० कोटी रुपयांच्या घरात जाते. जागतिक पातळीवर भारतीयांच्या संशोधनाची दखल घेतली जात आहे. आपल्याला ‘नोबेल’ मिळण्याचे प्रमाण कमी असले, तरी सर्व क्षेत्रांतील इथल्या संशोधनाचा दर्जा कमी आहे, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी अनुकूल वातावरण, आवश्यक सुविधा आणि पुरेशी आर्थिक तरतूद झाली, की आपले शास्त्रज्ञ उच्च प्रकारचे संशोधन करून, देशाला प्रतिष्ठा मिळवून देत राहतील, याविषयी शंकाच नाही. 
 
रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
A V Moharir About 216 Days ago
Dr Hargobind Khurana, Dr S Chandrashekhar, Dr V S Naipaul and Dr V Ramakrishnan, though of Indian Origin are not Indian citizens when they were awarded the Nobel Prize. Therefore we cannot claim them as Indian Nobel Prize Winners. Mother Teressa adopted Indian citizenship much before she was awarded the prize and she can be counted as Indian.
0
0

Select Language
Share Link
 
Search