Next
नायगावमध्ये ‘सावित्री सृष्टी’ उभारणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
BOI
Monday, January 07, 2019 | 06:28 PM
15 0 0
Share this story


सातारा : ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहुर्तमेढ रोवली, त्यांच्यामुळेच राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करू, असे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करून पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पाहणी केली. त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.


या वेळी पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार मनिषा चौधरी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, नायगावचे सरपंच निखिल झगडे उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात परिवर्तन आणले. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणात भरीव कामगिरी करून त्यांनी सनातनी समाजाला झणझणीत उत्तर दिले. आज या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी त्या काळी या गोष्टी खूप कठीण होत्या. हे कार्य करताना समाजाचा मोठा रोष त्यांना सहन करावा लागला. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजातील वंचितांपर्यंत विकास आणि महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम यशस्वीपणे केले. त्यांनी महिलांसाठी आणि विधवांसाठी मोठा लढा उभा केला. समाजातील वंचित घटकांच्यामागे उभे राहण्याचे काम या दाम्पत्याने केले. जातीभेद मिटविण्यासाठी तसेच स्त्रीमुक्तीसाठी मोठा लढा त्यांनी उभा केला. महात्मा फुलेंच्या कामाची प्रेरणा घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचे काम केले.’

महिलांच्या मुक्तीसाठी आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगावला ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ प्रस्ताव पाठवावा अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. ‘ नायगावमध्ये `सावित्रीसृष्टी` उभारणीसाठी मान्यता देऊ;तसेच पुणे शहरातील ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारणीचा प्रश्न कायदेशीर कचाट्यात अडकला आहे, मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभे करण्याचे काम सरकार करेल’, असे आश्वासन त्यांनी दिले. 

‘या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची क्षमता लवकरच वाढविण्यात येणार असून, नायगाव ते मांढरदेवी हा रस्ताही लवकरच करण्यात येईल. नीरा-देवधर धरण लाभक्षेत्रातील योजनांची कामे मार्गी लावून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवू. तसेच लीफ्ट इरिगेशन प्रकल्पांची ८१ टक्के वीज बिले सरकार भरणार आहे, तर केवळ १९ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यामुळे वीज बिलाअभावी कोणतीही लिफ्ट इरिगेशन योजना बंद पडणार नाहीत,’असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘देशातील महिला व वंचितांसाठी फुले दांपत्याने भरीव काम केले आहे. फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून, राज्य सरकार या विषयी केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. संत सावता माळी यांचे जन्मगाव असणाऱ्या अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून, तेही काम वेगाने मार्गी लावले जाईल,’ असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.


या वेळी नायगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आर्या देशपांडे, जनाबाई हिरवे, यशस्वी साळुंखे आणि प्रांजल साळुंखे या मुलींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच निखिल झगडे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link